Friday, 31 August 2012

बाबा आमटे


बाबा आमटे

सर्वसामान्य माणूस दहा जन्मांतही जेवढे काम करू शकणार नाही, एवढे - व्याप्ती, उंची व खोली या सर्व दृष्टिकोनांतून - भव्यकार्य उभे करणारे श्रेष्ठतम समाजसेवक!

कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे आनंदवन आश्रमाची स्थापना करणार्‍या मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. १९३४ साली बी.ए. व १९३६ साली एल. एल. बी. ही पदवी त्यांनी संपादन केली. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रमही पूर्ण केला.


गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्र्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली, आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्र्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये भारत जोडोअभियान योजले होते. या अंतर्गत त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

असाध्य गोष्टींना स्वत:हून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. त्या अंत:प्रेरणेतून १९५१ साली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे काही असेल तर ते कुष्ठरोग्याचे आयुष्य. प्रत्येक कुष्ठरोग्याला आपल्या कुशीत सामावून घेऊन त्याची केवळ सेवा-सुश्रुषाच करण्याचीच नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळादेखील तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदी कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. (आजही ही केंद्रे कार्यरत आहेत.) देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’, या बा. भ. बोरकरांच्या ओळीचा देखणा प्रत्ययया प्रकल्पांच्या ठिकाणी येतो. घनदाट जंगल, दळणवळण - संपर्काची साधने नाहीत, प्रचंड पाऊस, पावसात मार्गच अडवून टाकणार्‍या नद्या-नाले, जंगली श्र्वापदांचा सुळसुळाट, अन्न-वस्त्र-निवार्‍याची कमतरता, काही वेळा शासनाचा असहकार, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली.

भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश व स्नुषा डॉ. मंदा आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे चालू आहेत. डॉ. प्रकाश व डॉ. सौ. मंदा आदिवासींना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवित आहेतच. हे कार्य बाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे.

पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, रेमन मॅगसेसे पुरस्कार, टेंपल्टन पुरस्कार, आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार, जे. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अशा असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्करांनी बाबांना गौरविण्यात आले.(प्रकाश व मंदा आमटेंनाही ऑगस्ट, २००८ मध्ये मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.) या महान जगावेगळ्या विराग्याने स्वत:ला मिळालेल्या पुरस्कारांची सर्व रक्कम (कोटयवधी रुपये) फक्त समाजकार्यासाठीच वापरली.

६ कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन याआधारे लावलेल्या रोपट्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. या कार्यात बाबांच्या पत्नी श्रीमती साधनाताई यांचाही त्याच तोडीचा वाटा आहे. साधनाताईंनी लिहिलेल्या समिधाया आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणार्‍या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो. समिधातून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्यासमोर येतो.

बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते. सतत कार्यरत असूनही त्यांनी ज्वाला आणि फुलेआणि उज्ज्वल उद्यासाठीहे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते. त्यांच्या विधायक कार्याला सौंदर्याचे परिमाण लाभले होते ते त्यांच्या प्रतिभेमुळेच! 'Our work is a Poem in action', असे स्वत: बाबा म्हणत असत.  

संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्र्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प कमालीचे यशस्वी केले. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली, उर्जा मिळाली. बाबा आनंदवनात मित्रमेळ्याचे आयोजन करत असत. या मेळ्यांना अनेक कलाकारांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहत असत. यातूनच असंख्य कार्यकर्ते घडले, कामांना दिशा मिळाली.

समाजाने नाकारलेल्या उपेक्षितांना मोठ्या अंत:करणाने, मायेने आपल्या पंखाखाली घेऊन,त्यांना  नवसंजीवनी देणारा हा महान कर्मयोगी  फेब्रुवारी, २००८ मध्ये अनंतात विलीन झाला. आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही (डॉ.प्रकाश, विकास आमटे व त्यांचे परिवार) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने, सातत्याने कार्यरत आहेत.

 

लोकमान्य टिळक


लोकमान्य टिळक

 

भारतीय जनतेत स्वराज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते स्वराज्य मिळवण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे राष्ट्रीय नेतृत्व !


स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील विलक्षण तेजस्वी आणि तर्डेंदार व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. १८५६ चा रत्नागिरीतल्या चिखलगावचा त्यांचा जन्म आणि १९२० चा मृत्यू. या कालावधीतील बाळ ते लोकमान्य असा त्यांचा प्रवास भारताला नवचैतन्य देऊन गेला.

टिळकांचे मूळ नाव केशव असले, तरी लोकव्यवहारात त्यांचे बाळ हे टोपणनावच रूढ झाले. त्यांच्या शालेय जीवनातली शेंगांच्या टर्रेंलाची घटना, गणित फळ्यावर लिहून हात खराब करून घेण्यापेक्षा गणिते तोंडी सोडवण्याचा उपाय, संत हा शब्द सन्त, संत किंव सन्‌त अशा तीन पद्धतीनं लिहिला तर बिघडते कुठे असा शिक्षकांना केलेला खडा सवाल-या सगळ्या घटनांमुळे टिळक हुशार, बुद्धिमान पण काहीसे हट्टी विद्यार्थी अशा सदरात मोडले जात.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारचअशी प्रतिज्ञा प्रचंड आत्मविश्र्वासानं करणारी टिळकांसारखी व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणूनच घडत गेली. कॉलेजमध्ये विद्येबरोबरच शरीरसंपत्ती मिळवण्यात त्यांना जास्त रस होता. यामुळेच कदाचित पुढचे शारीरिक, मानसिक कष्ट ते सोसू शकले. १८७६ ला बी.ए., पुढे गणितात एम. ए., व नंतर एल. एल. बी. अशी उत्तम शैक्षणिक कारकीर्द असलेले टिळक.

लोकमान्यांनी १८८० साली विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांसमवेत सुरू केलेले न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण नावाने सुरू केलेला छापखाना, केसरी आणि मराठा सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना- या सगळ्याच घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला.

पारतंत्र्यामुळं आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय बाबतीत सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही,’ अशी ठाम भूमिका लोकमान्यांची पर्यायानं केसरीची होती. नेमकी याविरुद्ध भूमिका आगरकरांची होती. त्यांच्या मते आधी सामाजिक सुधारणाच होणे गरजेचे होते. यामुळे केसरीतच नव्हे तर अवघ्या देशात वैचारिक संघर्ष सुरू झाला. याची परिणीती आगरकरांनी केसरी सोडण्यात झाली.

केसरीतून (मराठी) आणि मराठातून (इंग्रजी) होणारे लोकमान्य टिळकांचे लेखन स्‍फूर्तिदायी आणि दिशादर्शक होते. केसरीतून वेळोवेळी प्रसिद्ध होणारे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक, राजकीय परिस्थितीबाबत सजग करत राहिले. मराठासारखे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्यामागे-जो विचार केसरीतून  पोहोचवला जातो, तोच इंग्रजांपर्यंत आणि परप्रांतीय हिंदी लोकांपर्यंत जावा-ही भूमिका होती. रँडच्या खुनानंतर सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या केसरीतल्या अग्रलेखामुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला. स्वदेशी चळवळीबाबतचा गूळ का साखरहा लेख, राष्ट्रीय मनोवृत्ती ज्यातून निर्माण होईल, ते राष्ट्रीय शिक्षण अशी केलेली व्यापक व्याख्या, त्यावर लिहिलेले लेख- या सगळ्यांतून समाज प्रगल्भ होत गेला. त्यांच्या जहाल लेखनाचा प्रभाव क्रांतिकारकांवरही पडला. टिळकांच्या विचारांच्या प्रभावातून स्वातंत्र्यवीर सावरकर, न. चि. केळकर, कॉम्रेड डांगे यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडली.

लोकमान्यांच्या लेखनात बनावट, सजावट, अलंकाराची वेलबुट्टी नसायची, तर ते लेखन रोख-ठोक आणि अभ्यासपूर्ण असायचे. १९०० मध्ये प्रो. मॅक्सम्यूलर यांच्यावरचा त्यांचा अग्रलेख प्रसिद्ध झाला. जर विद्वान मनुष्य असेल, मग तो विलायती असला, तरी त्याचे गुण घ्यावेत ही त्यामागची भावना होती. लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचे वक्तृत्वही धारदार होते. सामाजिक सहभागाचे महत्त्व जाणणारे ते विलक्षण प्रभावी संघटक होते. समाज एकजूट होण्यासाठी त्यांनी सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा श्रीगणेशा महाराष्ट्रात केला. या उत्सवांची सुरुवात हे खरे तर त्यांच्या असंख्य संघटनात्मककामांपैकी एक काम. पण या एकाच कार्यातून त्यांच्यामधल्या अतिकुशल संघटकाची व द्रष्ट्याची जाणीव आपल्याला होते.

१९०६ साली सुरू झालेल्या वंगभंग चळवळीत लोकमान्य टिळकांचा मोठा सहभाग होता. मराठी व बंगाली लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत पेटवावी हा विचार घेऊन त्यांनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. कर्झनशाही विरुद्धची टीका, राष्ट्रीय सभेच्या कामासाठी लाल-बाल-पाल अशी एकत्र आलेली त्रयी, खामगाव-वर्धा-नागपूर-सोलापूर-मुंबई-मद्रास-कोलंबो असा टिळकांचा मोठा दौरा, कॉंग्रेस अधिवेशनातील अध्यक्षस्थान, होमरूल लीगची स्थापना, जहाल लेखांमुळे देशद्रोहाचे झालेले आरोप, तुरुंगवासाची शिक्षा या सगळ्यांमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली आणि त्यांची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढत गेली. स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतु:सूत्रीच्या साहाय्याने त्यांनी ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण केले व भारतीय जनतेत संघर्षाची भावना निर्माण केली.  ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात, अतिशय प्रतिकूल अशा हवामानात तब्बल ६ वर्षांची (१९०८-१९१४) शिक्षा भोगून परत आल्यानंतरही त्यांनी तेवढ्याच तडफेने कार्याला सुरुवात केली. राष्ट्रीय भावनेच्या विस्तारासह कॉंग्रेसच्या संघटनात्मक विस्तारातही त्यांचा शब्दश: सिंहाचावाटा होता. म्हणूनच त्यांचे कार्य म्हणजे केवळ टिळक यांची कारकीर्दनसून, ते भारताला स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या जवळ नेणारेलोकमान्य टिळक युगहोते.

अशा या लोकप्रिय व्यक्तीची सर्वात प्रिय जागा कुठली असेल, तर ती म्हणजे पुण्याजवळचा सिंहगड. एकांताची व चिंतनाची भूक लागली असता खराखुरा एकांतवास ते सिंहगडावरच अनुभवायचे. तेथेच मनन, चिंतन आणि लेखनही करायचे. लोकमान्यांनी जे ग्रंथ लिहिले, त्या प्रत्येकात एकेक गुणविशेष आहे. ओरायन मध्ये गणिती आणि ज्योतिषविषयक ज्ञान आहे. आर्यांचे वसतिस्थान मधून संशोधन व विश्र्लेषण दिसते, आणि मंडालेच्या तुरुंगवासात लिहिलेल्या गीतारहस्यातसखोल तात्त्विक विचार वाचायला मिळतो.

लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, लेखणीची व वक्तृत्वाची धार हिंदुस्थानभर पोहोचली. केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहिलेली त्यांची प्रतिमा प्रत्येक देशभक्ताला ताकद देत राहिली. जनतेने त्यांना लोकमान्यकेले. त्याचबरोबर ते हिंदुस्थानातील (ब्रिटिशविरोधी) अस्वस्थतेचे जनक मानले गेले. खरे तर राष्ट्राचा अभ्युदय व्हायचा, तर ते राष्ट्र नेहमी अस्वस्थच असायला हवे हे लोकमान्य टिळकांनी केव्हाच जाणले होते. याच सकारात्मक अस्वस्थतेचा साक्षात्कार आपल्याला त्यांच्या जीवनकार्यातून होतो.