Thursday, 31 January 2013

Ashi havi aamhala strimukti


अशी हवी आम्हांला स्त्री- मुक्ती
Posted in 
·         लेख

·         उषा अंभोरे
आज २१ व्या शतकात आपण प्रवेश केलेला आहे. संगणक युगात वावरत आहोत. स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मोठया चवीने विचार मंचावर करीत आहोत. स्त्री-मुक्ती चळवळी ठिकठिकाणी कार्यरत आहेत. हे विचार, ह्या चळवळी शहरापुरत्याच मर्यादित आहेत. अद्यापही किंवा पांढरपेशी, मध्ममवर्गीय आणि उच्चभ्रू स्त्रियांमध्ये बंदिस्त झालेली स्त्री मुक्ती चळवळ आज टीकेचा विषय झाली आहे.
दलित, आदिवासी, शोषित, पीडीत स्त्रियांना त्याही खेड्यात राहणाऱ्या स्त्रियांना (काही अपवाद वगळता) या चळवळीची सुतराम कल्पना नाही. खरं तर या चळवळीचे प्रतिनिधित्व दलित, आदिवासी स्त्रियांकडे असायला हवे. त्यांना पुढे घेऊन स्त्री मुक्ती चळवळ राबविली तर स्त्रियांचे प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागतील. त्यांना पुढे करायचे म्हणजे ही चळवळ खेड्यात गेली पाहिजे. दलित स्त्री पूर्वी आताही बरीच मुक्त आहे. पूर्वीच्या काळी ब्राह्मण बाईला तिचा पती वारल्यावर पतीसोबत `सती' जावे लागत असे. किंवा केशवपन करावे लागे, तिला दुसरा विवाह करण्यास बंदी होती. तिला घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. याउलट दलित स्त्रीला तसे बंधन नव्हते. या अर्थाने दलित स्त्री सवर्ण ब्राह्मण स्त्रीपेक्षा मुक्त होती. म्हणूनच डॉ. आंबेडकरांच्या सत्याग्रहात, आंदोलनात, जाहीर सभेत दलित स्त्री हिरिरीने भाग घेताना आढळते.
क्रांतिबा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमामुळे सवर्ण दलित स्त्रियांना शिक्षण मिळाले. काळानुरूप स्त्रीमुक्ती विषयीच्या कल्पना बदलत चालल्या आहेत. नवीन प्रश्न उपस्थित होऊ लागले. संगणक युगाकडे जाताना परत आपण पडताळणी करू लागलो. आम्हांला हव्या असलेल्या स्त्रीमुक्तीसाठी आम्ही लढायला सज्ज झालोत.
आता स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय ? प्रथम याचाच अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. स्त्री मुक्ती म्हणजे निव्वळ पुरुषांच्या विरोधात जाणे नव्हे तर `पुरुषप्रधान' संस्कृतीचा पगडा असलेल्या विशिष्ट पद्धतीचा विरोध करणारी चळवळ' अशी माझ्यापरीने मी व्याख्या केलेली आहे. किंवा `स्त्री मुक्ती म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीपासून मुक्तता !' पुरुष वर्चस्ववादी समाजाची गुलामगिरी झिडकारणे असा अर्थ अभिप्रेत आहे.
प्रश्न उपस्थित होतो की, पूर्वीची जाचक बंधने आज स्त्रियांवर नाहीत. पण याचा अर्थ स्त्री सर्वार्थाने मुक्त झाली असा होत नाही.
वरवरचे चित्र बघता आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीने शिरकाव केलेला आहे. याचा अर्थ आम्ही मुक्त झालो असा होतो का ? याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल.
पुरुषांनी आम्हांला मुक्त केले, मोकळीक दिली, स्वातंत्र्य दिले. त्यातून त्यांची मानसिकता किमान बदलली आहे. याहीपेक्षा महत्त्वाचे स्त्रिया म्हणून तुम्हांला, आपल्याला स्त्री मुक्ती कशी हवी ? हे आपण ठरवणार आहोत. पुरुष नाही ठरवणार आम्हांला काय हवे ते. ते आपले आपणच ठरवायला हवे. मुख्य म्हणजे तुम्हाला मुक्त व्हायचे आहे ना ? तर तुमचीच मानसिकता प्रथम तुम्हांला बदलायला हवी.
आपल्याला नेमके काय पाहिजे ? कुठला मार्ग अनुसरला म्हणजे स्त्री मुक्तीच्या ध्येयापर्यंत पोहचता येईल. याचा विचार प्रत्येकीने फार गांभीर्याने केला पाहिजे. अत दीप भव ! स्वत:चा मार्ग स्वत: चोखाळा. स्वत:चे आत्मनिरीक्षण करा. आपली मानसिकता तपासून घ्या.
आमच्या मनावर, बुद्धीवर, रूढी परंपरेचे, पुरुषप्रधान संस्कृतीचे थरच्या थर साठलेले आहेत. ते अगोदर गळून पडायला हवे. स्त्री-मुक्ती चळवळींनी काही गोष्टींचा नको तेवढा विपर्यास केला, अतिरेक केला. उदा. कुंकू, बांगड्या, साड्या किंवा अन्य पारंपरिक वेशभूषा, केशभूषा झिडकारणे आणि शर्ट पँट घालून बॉयकट करून पुरुषी वागणे म्हणजे स्त्री-मुक्ती असा काहीसा सूर निघाला स्त्री-मुक्तीवाल्यांचा. पण हे वरवरचे म्हणता येईल. त्यामुळे स्त्रीमुक्ती चळवळ बदनाम झालेली आहे.
समाजात एवढे गैरसमज आहेत की, स्त्री मुक्ती चळवळीवाल्या महिलांच्या वाऱ्यालाही कुणी उभे राहत नाही. किंवा टिंगल तरी होते.
समाजाची ही मानसिकता तुम्हाला घालवायची असेल तर स्त्री मुक्ती म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चोहोबाजूंनी झालेला विकास दाखवावा लागेल. तशी प्रतिमा समाजात रुजवावी लागेल. प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणून समाजात आपले स्थान टिकवून ठेवावे लागेल. तर समाज तुम्हांला समजून घेेईल. तुमचे म्हणणे योग्य पद्धतीने समाजापुढे मांडल्यास समाज स्वीकारेल. कदाचित स्वीकारणारही नाही. स्वीकारल्यास संघर्षाची तयारी ठेवावी लागेल.
पण स्त्री मुक्तीचा विचार करताना या प्रवासात स्त्रीची मानसिकता बदललेली नाही. तिचे वागणे पुरुषप्रधान संस्कृतीला बळकटी आणणारे आहे, हे मी ग्रामीण, तळागाळातील दलित स्त्रियांच्या संदर्भात सांगते. काही अंशी शहरी स्त्रीची मानसिकता थोडीफार बदललेली आहे. पण ग्रामीण दलित स्त्रीची मानसिकता अद्याप तशीच आहे. उदा. स्वयंपाक, घरगुती कामे, भांडीकुंडी ही काम
पुरुषांना जमत नाहीत. ही स्त्रियांची समजूत आहे. समजा कुटंबात एक मुलगा, एक मुलगी असेल तर आई मुलीला सांगते, बाई गं, तुझे हे काम आहे, आता हुंदडणे बंद कर. जरा स्वयंपाक -पाण्यात लक्ष घाल. घरकामाचं बघ.
मुलाला मात्र यातील काहीच आई सांगत नाही
तिचे बंधन फक्त मुलीला; मुलाला नाही. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती कोण चालवते ? मुलीला गौण आणि दुय्यम स्थान स्त्रीच बहाल करत असते. संस्कार करायचे, शिस्त लावायची तर मुलगा मुलगी दोघांनाही सारखीच लागली पाहिजे. कामाची वाटणी समान झाली पाहिजे. हे चक्र कुटुंबापासून पुढे जाईल.अनेक कुटुंबे मिळून समाज तयार होतो. म्हणजे कुटुंबापासून सुरुवात केल्यास त्याचा परिणाम समाजावर होतो. समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक कुुटुंब आहे. यातून कामाच्या समान वाटणीची समाजाला सवय लागेल. ती आपल्या प्रत्येक घरातून लागणार आहे. याचे आपण भान ठेवले पाहिजे. स्त्री-पुरुष आचार-विचार, संस्कारात समानता आणणारी स्त्रीमुक्ती हवी आहे.
संसाराची दोन चाकं सारख्याच गतीने चालली पाहिजेत. पण स्त्री मुक्तीच्या गप्पा मारणाऱ्या स्त्री पुरुषांची मानसिकताच गुलामगिरीची आहे. ती अद्याप बदललेली नाही.
लष्करात, पोलिसात, नेव्हीत आपल्या मुलींनी जावे असं किती आयांना वाटतं ? समजा यदाकदाचित एखाद्या आईला वाटतं की पाठवावं आपल्या मुलीला थोड्या वेगळया क्षेत्रात, तर समाज स्वीकारेल ? दुर्दैवाने याचे उत्तरही `नाही' असंच मिळेल. समाजाचा रोष कशाला पत्करा ? हेही कारण आहे. म्हणजे सगळाच उजेड ! एकूण सारांश असा की नाही त्या स्त्रीच्या मताला किंमत, नाही मुलीच्या व्यक्तिमत्त्वाला !
व्यक्तिमत्त्वावरून आठवण झाली की, स्त्री कितीही बुद्धिमान, मोठी अधिकारी असली तरी ती प्रथम स्त्री असते. तिचे व्यक्तिमत्त्व वगैरे नंतरचा भाग. बुमन बॉसनं म्हटलं आहे की, आपल्या भारतात काही ठिकाणी भुवया वक्र होतात. अर्थात किरण बेदीसारख्या हाताच्या बोटावर गणतीत असणाऱ्या महिलांनी वक्र भुवयांना आताशा बरंच खाली खेचलंय. आम्हांला कुटुंबसंस्था मोडणारी स्त्रीमुक्ती नकोय. तर कौटुंबिक स्वास्थ्याच्या मायेची उबदार शाल देणारी स्त्री मुक्ती हवी. त्यासाठी शिक्षण घेणे अतिशय गरजेचे आहे. शिक्षणानेे नोकरी धंदा करून दोन पैसे हातात येतात. संसाराला हातभार लागतो. आर्थिक स्वावलंबन येते. ते थोड्या प्रमाणात आलेले आहे. शहरी भागात, खेड्यातील दलित स्त्री मोलमजुरी करून कसाबसा संसार रेटताना दिसते. शहरी स्त्रीचे यापेक्षा फार वेगळे चित्र नाही. आज किंवा आकडी पगार घेणारी स्त्री तिच्या मनाप्रमाणे खर्च करू शकते का? किंवा तिच्या मुलामुलींचे कुठलेही निर्णय ती स्वतंत्रपणे घेऊ शकते काय ? याचे उत्तर `नाही' हेच आहे. आज किंवा आकडी पगार कमावणाऱ्या स्त्रियांना स्वत:च्या आईला साडी घेताना नवऱ्याची परवानगी घ्यावी लागतेच ना ? अर्थात विचारल्यावर नवरा नाही म्हणत नाही यातच ती खुश असते. पण परवानगी घेण्याची, विचारण्याची तिची मानसिकता तिने बदललेली नाही. परंपरेनुसार ती चालूच आहे.
त्याचबरोबर नवऱ्याने हेही सांगायला हवं की परवानगी कशाला मागतेस? यापुढे विचारता साडी घेत चल आईला. अशी
मानसिकता पुरुषांचीसुद्धा बदलायला हवी. याचा अर्थ स्त्रीने पगार कमावते म्हणून माहेरची भर करावी किंवा वाट्टेल तसा खर्च करावा असाही नाही. हे करताना आपला आर्थिक आवाका किती आहे हेही विसरता कामा नये.
संसारात कितीतरी गोष्टी अशा असतात की त्या दोघांनी मिळून, दोघांत विभागणी करण्यासारख्या असतात.
घरातील कामं सर्वस्वी स्त्रियांचीच असतात. हा समज चुकीचा आहे. जेव्हा अर्थार्जनासाठी स्त्री बाहेर पडते तेव्हा तीही तेवढीच थकलेली असते जेवढा पुरुष थकलेला असतो. पण आपल्याकडे चित्र काय दिसते प्रत्येक घरात ? इथेही मग शेतकरी, कष्टकरी, दलित असू देत किंवा नोकरीवाली असू देत, स्त्री कामावरून आली की कमरेला पदर खोचून कामाला लागते. तर पुरुष थकलो बुवा म्हणून पलंगावर बसून बायकोने करून दिलेल्या चहाचे घोट घेत टीव्हीचा आस्वाद घेत असतात. या ठिकाणी आम्हांला असे अभिप्रेत आहे की, चहा घेऊन दोघांनी मिळून काम करायचे. उदा. नवऱ्याने भाजी साफ करून किंवा तोडून देणे. मुलांचा अभ्यास घेणे. त्यामुळे तेवढा वेळ श्रम वाचतील. रात्रीचे लवकर आवरून दोघांनी मिळून टीव्ही पाहणे ही समानता हवी आहे. यासाठी दोघांनी समजुतीने विभागणी करायला हवी. घरकामात मदत केल्याने सर्व कामाचा ताण स्त्रीवर पडणार नाही. ती तेवढी दमणार नाही. त्यामुळे तिचेही मन आणि चित्त उल्हसित राहील.
परिणामी घरात आदळआपट होता एकोपा राहील. वरील सर्व प्रश्नांची उत्तरं होकारात्मक यादीत जावीत, या पद्धतीने जाणारी स्त्री मुक्ती आम्हांला हवी आहे. शिक्षणाच्या बाबतीत स्त्रीयाच भेदभाव करतात. इथे स्त्रीची मानसिक गुलामगिरी, येणाऱ्या पिढीला तोच धडा गिरवायला भाग पाडते स्त्री.
मुलगा शिकतो, शिकू दे (शहरातील काही अपवाद वगळता) चांगला शिकला की, मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. मुलीच्या बाबतीत मात्र काय करायचे शिक्षण ? किंवा हिचे शिक्षण आमच्या काय कामाचे ? स्थळ येईपर्यत शिकवायचे. योग्य स्थळ आले की, उरकून टाकायचे लग्न. यात आईचाच पुढाकार जास्त. आई मुलीला, मुलगी तिच्या मुलीला, म्हणजे मानसिक गुलामगिरीची साखळी स्त्रियाच तयार करीत असतात, स्त्रियाच याला जबाबदार आहेत.
मुलींना शिकून शहाणं होऊ द्यात, घेऊ द्यात तिचे निर्णय तिला. जाऊ द्यात आयुष्याला सामोरी. पण तिच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा. मार्गदर्शक बना मुलीचा. याकरता आधी तुम्हांला तुमची मानसिकता बदलायला हवी. मगच तुम्हांला जशी पाहिजे तशी स्त्री मुक्ती मिळणार आहे. नुसते नारे लावून उपयोगाचे नाही. त्यासाठी कृतीची गरज आहे. ती प्रत्येक स्त्रीने कृतीत उतरवायची आहे.
`
महाराष्ट्न् टाइम्स'मधील एक वृत्त आठवले. घरातील टीव्हीचा रिमोट कंट्नेल पुरुषांच्या हाती असतो. म्हणजे इथेही बघा कसं होतं ते. पुरुषाला वाटलं हा कार्यक्रम बघायचा तर तोच कार्यक्रम त्या घरातील स्त्रीने मुलांनी बघावा हा जणू दंडकच त्यांच्यावर. त्यातून मुलं मोठी असली तर मुलगाच रिमोट कंट्नेल घेणार. त्याच्या आवडीने चॅनल बदलणार. इथे बापाची मानसिकता मुलात आली, पुरुषी वर्चस्व गाजवण्याची.
सांगण्याचं तात्पर्य हे की, या ठिकाणी एखादा सिनेमा किंवा एखादी मालिका घरातील स्त्रीला किंवा मुलीला बघावीशी वाटली तर बघता आली पाहिजे. याचाच अर्थ अशा छोट्या-छोट्या प्रसंगातून कौटुंबिक तणाव वाढता तेवढी पुरुषांची मानसिकता बदलायला हवी सामोपचाराने.
सामोपचाराने लाभणारी, समजुतीने मिळणारी, मुख्य म्हणजे स्त्री पुरुषांंच्या मानसिक परिवर्तनातून येणारी स्त्री मुक्ती आम्हाला हवी आहे.
-
उषा अंभोरे,
मुलुंड (पूर्व) मुंबई ८१