Saturday, 4 August 2012

maharashtratil vicharvant ,sahityik ani samajsudharak

गोपाळ गणेश आगरकर
भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक!
महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे  अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते.

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. 

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते व लोकमान्य टिळक एकत्र आले. तोपर्यंत स्वदेशसेवेची प्रेरणा दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनीन्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून मराठा, तर मराठीतून केसरीअशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.

पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी  सुधारकहे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथ- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.

आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती.विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्र्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला. 
वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी  त्यांचे अकाली, दुःखद निधन झाले.

2 comments:

  1. sadar lekh sankalit aahe yachi vachakanni nond ghyavi.
    - Ganesh Suryavanshi

    ReplyDelete
  2. Samajik daetwachi bhumika theun ha lekhache uddesh utsfhurti denare watle .

    ReplyDelete