मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी सदर ब्लॉग तयार केलेला असून विविध विषयांवरील संकलीत तसेच स्व-लिखित लेख ब्लॉगवर प्रकाशित केले जातील. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी सबंधित माहिती एकाच संकेतस्थळावर उपलब्ध व्हावी,हाच यामागचा प्रामाणिक हेतू आहे. प्रकाशित करण्यात येणारी बहुतांशी माहिती संकलीत स्वरूपाची असल्यामुळे सर्वच माहिती सत्याशी पडताळा करून केलेली असेलच असे नाही तर अभ्यासकांनी तसा पडताळा स्वतः करणे अपेक्षित आहे.
Monday, 22 August 2016
मायबोलीतले करिअर :मान्यवरांचे मार्गदर्शन, संकलन स्त्रोत -दैनिक लोकसत्ता
मायबोलीतले करिअर
मराठी भाषा घेऊन नेमके करिअर कसे आखायची अशी चिंता अनेकांना सतावते. याच प्रश्नांवर मार्गदर्शन
संकलन - राधिका कुंटे | February 22, 2013 1:08 AM
0 0 Google +1 13
मराठी भाषा घेऊन नेमके करिअर कसे आखायची अशी चिंता अनेकांना सतावते. याच प्रश्नांवर मार्गदर्शन करताहेत मराठीतले प्राध्यापक
प्रा. पद्मजा कुलकर्णी, गुरु नानक खालसा महाविद्यालय
भाषा ही माणसं बोलत राहण्यानं समृद्ध करत असतात. आता प्रश्न आहे मराठी भाषेचा. मराठी भाषेलाही विरल उत्तर लागू पडतं. त्यामुळं पुढील भविष्यात चिंता नव्हे तर चिंतन करायला हवं. मौखिक, लिखित अवस्थेत ठेवायची असेल तर ही जबाबदारी ती भाषा जे बोलतात, मातृभाषा त्यांच्यावर आहे. त्यासाठी आपण सर्वानी प्रयत्नपूर्वक त्यातून बोलण्याचा आणि शक्य तिथं मराठीतून लिहिण्याचा, उदाहरणार्थ अर्जलेखन, निवेदनपत्र, पत्रलेखन, आमंत्रण पत्र इत्यादी मराठीतून लेखन केल्यास भाषा वाढीस लागेल.
भाषा ही नेहमी अनुकरणातून ऐकून शिकली जाते. त्यामुळं आपण मोठय़ा माणसांनी उच्चारलेले मराठी शब्द लहान मुलांच्या कानावर सहज आणि सतत पडल्यास उच्चारणाचा सराव होईल. दैनंदिन जीवनाशी निगडित या शब्दांचा त्यांना सराव होईल, ते सवयीचे होतील. सवयीनं उच्चारले जाऊन लक्षात राहतील. पर्यायी शब्दांची सवय मोडून काढता येईल. बाह्य़ समाजात वावरताना मराठीचा वापर जाणूनबुजून करायला हवा. तो तसा सातत्यानं केला गेला तर आपण भाषेशी सतत जोडले जाऊ. साहित्य, कला, चित्रादी माध्यमांतील कला भारतीची जबाबदारी हे मराठीच्या वाढीस जबाबदार ठरतात. वृत्तपत्रांतील व्याकरणकदृष्टय़ा समृद्ध भाषेमुळं योग्य भाषेचं ज्ञान लोकांना मिळेल. संवाद हे सगळं झालं तर आपण पुढं काय या काळजीतून मुक्त होऊ. मातृभाषेसाठी आपण एवढं करू शकतो.
करिअरसंधीच्या दृष्टीनं मराठीचा विचार करायचा झाल्यास विविध पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ- शिक्षक-प्राध्यापक होता येईल. सरकारी सेवा, एलआयसी, बँक आदींत जाता येईल. संगणकीय ज्ञानाच्या अनिवार्यतेमुळं मराठी-हिंदीत माहिती संकलक होता येईल. पत्रकारिता, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, निवेदन, लेखनादी क्षेत्र निवडता येईल. भाषांतर क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होतेय. आमच्या महाविद्यालयात भाषांतरविषयक अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार चालू आहे. भाषांतरकार हे खाजगी कंपन्यातसुद्धा लागतात. भाषा ही सुसंवादासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी आहे. इतर शाखा विषय शिकवण्यासाठी भाषेवर प्रभुत्व लागतंच. या सगळ्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा. तो नसेल तर भाषा कशी येणार. तो असेल तर सहजपणं विषय समजून घेऊन आपण समोरच्यावर प्रभाव पाडू शकतो.
प्रा. लीना केदारे, मराठी विभागप्रमुख, रामनारायण रुईया महाविद्यालय
फक्त मराठीच नाही, तर कुठल्याही विषयात केवळ पदवी प्राप्त केल्यानं नोकरी लागत नाही, हे वास्तव आहे. मग मराठीत पदवी संपादनानंतर कोणते करिअर निवडाल, हा प्रश्न का उभा राहावा? जो विषय आपल्याला आवडतो, ज्याचं नीट आकलन होतं, त्यात कौशल्य आत्मसात करता येतं, त्यात पदवी मिळवावी.
साहित्य आणि भाषेमुळं आपल्या जाणिवा समृद्ध होतात. भाषा विचार करायला शिकवते. तिच्याद्वारे विषयाचं ज्ञान मिळतं. आकलन होऊन अभिव्यक्त होता येतं. त्यासाठी मातृभाषा चांगली येणं गरजेचं आहे. कोणत्याही विषयाची मूलभूत आवड असली, तर त्याला न्याय देता येईल.
शिक्षण क्षेत्रातले अनेक जाणकार मातृभाषेतून शिक्षण देण्यावर विशेषत: शालेय स्तरावरील शिक्षणावर भर देतात. तसं शिकून सव्र्हाईव्ह कसं होणार? असे काहींना वाटते. पण कोणत्याही वयात, कोणत्याही टप्प्यावर कोणतीही भाषा शिकता येते, असं भाषाशास्त्रज्ञ सांगतात. माध्यमाचा शिक्षणाशी संबंध नसतो. मातृभाषेतून शिकणं हे उपकारक आहे, असं सांगितलं जातं. म्हणूनच विद्यापीठ पातळीवर इंग्रजी विषय सोडून इतर विषय मराठीतून लिहिण्यास परवानगी आहे. मराठीतून शिकलो तरी व्यवहाराला इंग्रजी भाषा लागतेच. तितके इंग्रजी आपण शिकू शकतो.
एके काळी कमी गुण मिळणारे विद्यार्थी कला शाखा निवडत असत, पण आता जाणीवपूर्वक ही शाखा निवडणारे हुशार विद्यार्थीही पुढं येत आहेत. आमच्या महाविद्यालयात मराठीपण टिकवणारं वातावरण आहे. आमच्या संस्थेच्या ध्येयधोरणातून, उपक्रमांतून ते दिसतं. आमच्याकडे कला शाखेत मराठीतून शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक भरणपोषण होतं.
मराठी साहित्य जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन देतं. त्यामुळे सामाजिक भान येतं. मराठीच्या अभ्यासक्रमाचा दर्जा चांगला असला तरी अजून बदलाला वाव आहे. २०२० पर्यंत केवळ महाराष्ट्रातच नाही तर मराठीची नाममुद्रा जगभर उमटू शकेल. परदेशीयांना भारतीय संस्कृतीचं अतीव आकर्षण वाटतं. ते आणखी वाटू शकतं. मराठीविषयी आस्था वाढू शकते. मराठी साहित्याचा अभ्यास केला जाऊ शकेल. आपल्याकडच्या अनेक अमराठी विद्यार्थी आणि सामान्यांना मराठीची आवड असल्यानं ते मराठी शिकताहेत.
अभ्यास विषय कोणता ते महत्त्वाचं आहे. त्यातून मिळणारा आनंद आणि होणारं आकलन यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. समाजशास्त्र, मानसशास्त्रादी जीवनाशी निगडित सगळ्या विषयांना स्पर्श करते. ते फक्त काल्पनिक जग नाहीये. तुम्ही जे शिकता त्यावर विश्वास असायला हवा.
विविध समूह शिक्षणाकडे वळत असल्यानं मराठीची गरज आहे. भाषांतरित कलाकृतींना खूप मागणी आहे. मराठीचं कसं होणार, ही चिंता करायला नको. प्रोफेशनल अभ्यासक्रम, स्किल ओरिएंटेड शिक्षणाची आज गरज आहे. जो पदवीधर या प्रकारचे शिक्षण घेतो. त्यामुळं समाजाला हा प्रश्न पडतो की, याचं पुढं काय? त्यासाठी समाज सशक्त ज्ञानाच्या पायावर उभा राहायला हवा. तरच हे टिकवलं जाईल. फक्त मराठी नव्हे तर प्युअर सायन्सेस इत्यादींसाठीही ते करावं. माणूस म्हणून जे जगणं आहे, अमूर्त पातळीवरचं समजणं हा भाग साहित्य देतं. त्यामुळं विचारांची क्षमता वाढते.
मराठी विषय घेतल्यास बँकिंग, स्पर्धा परीक्षा, शिक्षकी पेशा, समाजसेवा, संशोधन, भाषाविज्ञान, ग्रंथालयशास्त्र, सर्जनशील लेखन, आकाशवाणी, नाटय़क्षेत्रादी अनेक करिअर ऑप्शन आहेत.
मराठी भाषा दीन नाहीये, परंतु एकूणात मराठीपण टिकवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आणि समाजाचे पाठबळही हवे.
डॉ. गीता मांजरेकर, मराठी विभागप्रमुख, महर्षी दयानंद महाविद्यालय
मराठी साहित्य हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बरेचसे विद्यार्थी असे आहेत की, ज्यांना अन्य विषय जमत नाही, ते मराठी विषय घेतात. त्यांना मराठीची आवड नसते. केवळ परीक्षार्थी या दृष्टिकोनातून ते साहित्य अभ्यासून कसेतरी पास होतात.
‘एमएससीआयटी’सारख्या परीक्षा देऊन डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात. पुढं मराठी साहित्याशी त्यांचा काही संबंध राहत नाही. मराठी विषयात थोडा रस असणारा विद्यार्थी अध्यापन, प्रसारमाध्यमात शिरण्याचा प्रयत्न करतो. काही थोडे विद्यार्थी एलएलबी, एलएलएम घेऊन बँका-सरकारी खात्यात लीगल ऑफिसर म्हणून काम करतात. अधिक चिकाटी असणारे विद्यार्थी एमपीएसससी-यूपीएससीच्या परीक्षा देतात. त्यात मराठी विषय असतो. मराठीतून पेपर लिहिता येतो. त्यांनतर ते सरकारी सेवेत रु जू होतात. थोडे विद्यार्थी ग्रंथालयशास्त्र अभ्यासून पुढं ग्रंथपाल होतात. काहीजण विशेषत: मुली हिंदी-मराठीच्या शिकवण्या घेतात. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिकवणी गरजेची झाली आहे.
काहीजण संगणकावर मराठी अक्षरजुळणीत तरबेज होतात. ते प्रकाशन व्यवसाय, मुद्रितशोधन, संपादकीय कामात मदत करतात. आमच्या कॉलेजमधले काही मुलगे पोलीस, बीईएसटी, महानगरपालिकेत नोकरी करतात. तेथील कारभार मराठीतून चालतो. तिथं मराठी पदवीधर असल्यास प्रमोशन मिळतं. पदव्युत्तर शिक्षण असल्यास इन्क्रिमेंट मिळतं. क्वचित काहीजण सर्जनशील लेखनाकडं वळतात. नाटककार, कथा- कादंबरी-कवितालेखन, मालिकांसाठी संवाद-पटकथालेखन करतात. कुणी रेडिओ जॉकी, निवेदन-सूत्रसंचालन करतात. कुणी एमएसडब्ल्यू होऊन समाजसेवक होतात. समाजातील लोकांशी संवाद साधण्यात त्यांना मराठी भाषेचा उपयोग होतो.
आता भाषांतरकार म्हणूनही चांगली कामं मिळताहेत. त्यासाठी व्यवस्थित अभ्यासक्रम आखायला हवा. विविध ज्ञानशाखांमधली पुस्तकं मराठीत उपलब्ध व्हायला हवीत. कारण आपण जे सर्वशिक्षण म्हणतो आहोत, ते घेऊ इच्छिणाऱ्या समूहाला इंग्रजीतून त्या विषयांचं आकलन होण्यापेक्षा ते मराठीतून पटकन होऊ शकेल. त्यासाठी भाषांतराच्या कामाची योजना शासनानं आखल्यास काही विद्यार्थ्यांना काम मिळू शकेल. विविध मराठी परिभाषिक कोशांचं काम करावं लागेल. आहेत ते कोश अपडेट करण्याची गरज असून त्याअनुषंगानं काहींना काम मिळेल. दूरचित्रवाणीवरील वाहिन्या आणि मराठी शाळांची संख्या वाढल्यास अधिक संधी उपलब्ध होतील. संगणक आणि तंत्रज्ञानात मराठी भाषा अधिक जोमानं यायला हवी. त्यामुळं तिचा प्रसार आणि प्रचार अधिक होऊ शकेल. भाषेकडं बघण्याची दृष्टी आता बदलायला हवी. विविध व्यवसाय, जाती-पोटजाती यांच्यातील शब्द सामावून घेण्याची गरज आहे. त्या संदर्भातले टॅब्यू बदलले तर भाषाही वाढणार आहे. तसं न केल्यास ती विकसित होणार नाही. आम जनतेचे शब्द मुख्य प्रवाहात यावेत. तरच भाषेची अभिवृद्धी होईल. त्यासाठी कोणताही परीघ न आखता दृष्टी संकुचित ठेवली नाही तर मराठीला बरे दिवस येऊ शकतील.
– प्रा. वैशाली जावळेकर, मराठी विभागप्रमुख, डी. जी. रुपारेल महाविद्यालय
मराठी घेणाऱ्यांना पुढचा पर्याय काय, हा विचार करताना शिक्षणव्यवस्थेचा विचार करावा लागेल. करिअर ऑप्शन्समध्ये कालही जे पर्याय होते, त्यात फारशी वाढ झालेली नाही. अध्यापन, पत्रकारिता, प्रसारमाध्यमं इत्यादी पर्याय पटकन पुढं येतात. नोकरीचं क्षेत्र म्हणून विकास झालेला नाही. काल हा प्रश्न नव्हता. फाइन आर्ट, प्युअर भाषांनी आपली प्रतिष्ठा गमावलेय. त्यांचा नोकरीशी संबंध जोडतो आणि मग असं वाटतं की हा विषय आपल्या उपयोगाचाच नाही. हा संबंध जोडायचा का, हा प्रश्न आहे. मराठीचा विद्यार्थ्यांला साहित्य-भाषा शिकल्यानं संवेदनशीलता येते. नोकरीच्या बाबत विचार करायचा झाल्यास प्रसारमाध्यमं, पत्रकारिता इत्यादींसाठी काम करणाऱ्याला आपण सक्षम करू शकतो. त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित व्हायला मदत होऊ शकते.
आताचं विश्व स्वतंत्र ज्ञानावर आधारित आहे. त्यामुळं भाषेपुढं आव्हान आहे ते तंत्रज्ञानाचं. त्यासाठी भाषा विकसित व्हायला हवी. मात्र इथं भाषा संवादी होत नाही. कॉल सेंटरमध्ये वगैरे वाचिक भाषा असते. त्याला भाषा विषय तोंड देऊ शकत नाही. हे आपल्या हातात नाही तर एकूण व्यवहार आणि भाषेच्या व्यवहारातील उपयोगावर अवलंबून आहे. रोजच्या व्यवहारात भाषा टिकायला हवी. ही भाषा टिकवणं ज्यांच्या हातात आहे, त्या विद्यार्थ्यांच्या साहित्यविषयक क्षमता कमी होताहेत. साहित्याच्या अभ्यासात खोलात जाऊन ते समजून घ्यायची वृत्ती दिसत नाहीये.
नोकरी मिळवण्यासाठी संवेदनशीलता, इतर विद्याशाखांचं ज्ञान, सामाजिक भान हे महत्त्वाचं ठरतं. हे मोठं आव्हान असून त्याला कसं सामोरं जायचं हा भाषा शिक्षकासमोरचा एक प्रश्न आहे. साहित्य आपल्याला विचारशील करतं. पण आजच्या व्यवस्थेचा विचार करता विचारशील माणूस व्यवस्थेला चालणार नसेल तर काय करायचं? हे सगळ्याच लोकांचं होतंय. मुळात ‘मराठी भाषा दिवस’ आपण साजरा करतो. हे साजरा करणं कशासाठी आहे? मराठी भाषा संपलेय म्हणून की तिच्याबद्दल आपण सजग आहोत म्हणून? ते ठरवायला हवं. व्यवहारात, महाविद्यालयातील सांस्कृतिक-भाषिक अवकाशात मराठी भाषेवर विविधांगी परिणाम होतोय. अभ्यासक्रमात मराठी शिकवायचं तर त्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात कसा होऊ शकेल? यावर विचार व्हायला हवा. बौद्धिकदृष्टय़ा कितीजणांना संधी मिळते? याचं भान ठेवायला हवं. या साऱ्याला समीक्षेची जोड हवी. एकूणात मराठीला टिकवून ठेवण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेऊन एकत्रित प्रयत्न होणं आवश्यक आहे.
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.
First Published on February 22, 2013 1:08 am
Web Title: Teachers Guidance On Career In Marathi Language
Saturday, 20 August 2016
संत साहित्याचे सामाजिक योगदान- डॉ.रामचंद्र देखणे
संत साहित्याचे सामाजिक योगदान
on: May 01, 2016In: रूपगंधNo Comments
अध्यात्मिक तत्त्वचिंतनाची परिणती सामाजिक मूल्यांमध्ये घडविणाऱ्या संत विचार परंपरेचे चिंतन करताना असेच म्हणावे लागेल की, सामाजिक विषमतेने व्यथित झालेल्या कारुण्याचा पहिला उद्गार संत ज्ञानदेवांच्या रूपात प्रगटला. नाथांच्या रूपात त्याचा प्रतिध्वनी उमटला आणि तुकोबारायांच्या रूपात सामाजिक विकृतींना फटका देत मानवी मनात आणि समाजजीवनात आत्मविश्वाूस आकारला.
संतांची वाङ्मयरचना हे मराठी सारस्वताचे एक अनमोल लोकधन आहे. संतांची भूमिका ही केवळ तत्त्वचिंतकाबरोबर लोकशिक्षकाची आहे. जागल्याची आहे, पूर्वी खेडेगावात आलेले पीकपाणी राखण्यासाठी जागले ठेवत असतं. ते स्वत:ही जागे राहायचे आणि रात्रभर गावालाही जागते ठेवायचे. अज्ञान, अविद्या, विकृती, विकार यांच्या झोपेतून संत स्वत: नित्य जागे आहेत आणि जागल्याची भूमिका येऊन.
उठा उठा जी मायबाप।
कशी लागली झोप।
उठा की जी मायबाप।।
असे सांगत सांगत समाजालाही खडबडून जागे करीत आहेत. सामाजिक आणि आध्यात्मिक जागृती हेच संतांच्या वाङ्मयीन निर्मितीचे मुख्य प्रयोजन ठरते. संत हे साक्षात्कार होते. त्यांना आत्मानुभूती लाभली होती. एकच आत्मतत्त्व सर्व वास्तूमात्रात भरून राहिल्याने ब्रह्मभाव एका व्यक्तीत सीमीत न राहता साऱ्या विश्वातला कवटाळण्यास सिद्ध होतो. सर्वाभूती हाच भगवद्भाव जागा व्हावा, त्यातून परस्पर बंधुभाव, एकात्मता नांदावी ही जगत् उद्धाराची तळमळ त्यांच्या अभंगवाणीतून ठायीव्यक्त होते. स्वत: जीवनमुक्त अवस्थेला गेलेल्या संतांना ही जागृती का घडवायची आहे हे सांगताना तुकोबाराय म्हणतात.
उपकारासाठी बोलो हे उपाय।
येणेविण काय चाड आम्हा ।।
बुडते हे जन न देखवे डोळा।
येतो कळवळा म्हणवोनि ।।
जागृती घडविणे हेच प्रबोधनकाराचे खरे कार्य होय. संत हेच श्रेष्ठ प्रबोधनकार आहेत. म्हणूनच कधी विनंती करून, कधी भीती दाखवून, कधी येणाऱ्या गंभीर परिणामांची जाणिव करून देऊन, तर कधी रागावूनसुध्दा ते समाजाला जागेच करीत आहेत. आमच्या उपनिषद दृष्ट्या ऋषींनीही “उत्तिष्ठत् जाग्रत् प्राप्य वरान्निबोधत्’ असा उपदेश करून प्रत्येक अवस्थेत जागे रहायला सांगितले आहे. कीर्तन हे तर जागृतीचे प्रभावी माध्यम आहे. ईश्वरी तत्त्वाबरोबरच मानवी मूल्यांना जागे ठेवणे हेच कीर्तनाचे वैशिष्ट्य. संतांनी जागृतीसाठी हेच माध्यम निवडले. बाह्यरंग आणि अंतरंग, प्रपंच आणि परमार्थ, व्यक्ती आणि समाज या सर्वांचा एकत्रित विचार करून मानवी मनाला आणि जीवनाला समृद्धीकडे नेण्यासाठी सावध रहाण्याचा उपदेश केला. तुकोबाराय म्हणतात,
सावध झालो सावध झालो।
आलो हरिच्या जागरणा ।।
संतांची अमृतवाणी हा मराठी शारदेचा अंभग ठेवा आहे. संतांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शद्ब अभंग ठरला आहे. संतांच्या विशाल, पवित्र, प्रशांत, प्रासादिक आणि भव्योदात्त अनुभवाचा तो अमृत अविष्कार आहे. त्यात संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा मोगरा दरवळत आहे. भक्तीप्रेमाबरोबरच समाजप्रबोधनाची तुकोबारायांची तळमळ डोकावत आहे. नामदेवरायांची आर्तता प्रगटत आहे. समर्थांचे लोकीद्धाराचे सामर्थ्य निनादत आहे, तर आध्यात्मिक विचारांबरोबर जीवनमूल्यांच्या संदर्भात घडविलेले नाथांचे उद्बोधन आविष्कृत होत आहे. जनाबाई, निळोबा, चोखोबा, सावतोबा, बहिणाई, कान्होपात्रा या संतांचा आत्मानुभव अभिव्यक्त झाला आहे. “स्वान्तसुखाय आणि मार्गदर्शनाय’ या दोन कारणांसाठी प्रगट झालेली संतांची वाणी ही सामान्य माणसाला जीवन जगतानाही विवेकाची वाट दाखवित आहे. त्याच्या जीवनाला आनंदाचे नित्यत्त्व म्हणजेच अमृतत्त्व प्राप्त करून देत आहे.
देदीप्यमान संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली. या संतपरंपरेने आपल्या वाणीने आणि कृतीने समाजमनात ज्ञानजागृती, कर्जजागृती करून समाजाला जागत ठेवले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या अगोदरही समाजात विद्वान नव्हते असे नाही, पण त्यांच्या ठायी केवळ पांडित्य होते. साधुत्त्व नव्हते. दुसऱ्याला सांगणारे खूप होते; पण तसे अनुभवणारे अभवानेच होते. ज्ञानेश्व र कळवळ्यापोटी आध्यात्मिक विचारांची मांडणी करीत, माध्यमातून खऱ्या विवेक धर्माचाच पाया घातला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी रसालंकार संपन्न भाषेत साहित्यिकांना, साहित्य सोनियाच्या खाणी उघडून अंतरंग अधिकारी जिज्ञासूंना, भक्तीवैराग्य कथनाने वारकऱ्यांना, अष्टांग योगाच्या निरुपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांतांच्या माध्यमातून प्रापंचिकांना
साच आणि मवाळ।
मितुळे आणि रसाळ।
शब्द जैसे कल्लोळ ।
अमृताचे ।
अमृतावाणीचा आणि अमृततत्त्वाचा उत्कट आविष्कार घडविला आहे. भागवत धर्माची, भक्तीपंथाची, वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची महाराष्ट्र सारस्वतातील विविधांगी वाङ्मयरचनेची आचारविचार समन्वयाची आणि सामाजिक समतेची मुहूर्तमेढ करून ज्ञानेश्व र माऊलींनी मूल्याधिष्ठित सांस्कृतिक जीवनाचाच पाया घातला आहे. त्याच पायावर संतविचारांची आणि प्रबोधनाची भव्य वास्तू उभी राहिली आहे. पाया पक्का तर वास्तू उभी राहते. इमारत बांधताना पाया खोल घेतला जातो. कठीण अशा खडकापर्यंत तो न्यावा लागतो. ज्ञानेश्वचर माऊलींनी खडकासारख्या जडत्व असलेल्या जीवांच्या अंत:करणातही भक्तीचा ओलावा निर्माण करून हा भगवद्भक्तीचा पाया खोलवर रुजविला आहे. ज्ञानदेवांनी भक्ती मंदिराचा आणि भागवतधर्मांचा पाया घातला. तसे पाहिले तर भागवत धर्माचा पाया ज्ञानदेवांच्या आधी दोन हजार वर्षे घातला गेला असतानाही तो पुन्हा रचण्याची आवश्यतकता का भासली? जुन्यातले काय घेतले आणि काय वगळले याचा विचार केला पाहिजे. भागवत धर्माचा आधारभूत ग्रंथ भगवद्गीता मानला आहे. “श्रुती’ म्हणजे वेद तर “स्मृती’ ह्या वेदावर आधारलेल्या म्हणूनच काही प्राचीन ज्ञानवंतांनी आणि तत्त्वचिंतकांनी मन्वादिकांच्या स्मृतीप्रमाणेच गीतेलाही दुय्यम स्थान दिले आणि ती स्वत: प्रामाण्य नाही असे म्हटले. या विचारांनाच ज्ञानदेवांनी कलाटणी दिली. गीता ही स्वत: प्रामाण्य तर आहेच आहे, पण वेदांचे सार गीतेने सांगितले आहेत. ज्ञानेश्व र महाराज गीतेचे मोठेपण सांगताना अठराव्या अध्यायात म्हणतात
हे गीतानाम विख्यात। सर्व वाययाचे मथित।
आत्मा जेणे हस्तगत । रत्न होय ।।
ज्या ज्ञानाने आत्मरूपी रत्न स्वाधीन होते ते वेदांचे सार असलेले ज्ञानच “गीता’ रूपाने प्रगटले आहे. गीतेला वेगळे औदार्य आहे. वेदांचा अधिकार काही वर्णांनाच होता. सर्वांना ज्ञान देण्यासाठी वेद कृपण होता. ज्ञानदेवांनी भक्तीचा अधिकार देणाऱ्या एवढेच नव्हे तर-
स्त्रीद्रादि प्रतिभे सामाविले ।
स्त्रीद्रांना तसेच अज्ञानी, अडाणी अशा जीवांनाही ब्रह्मरसाचा आस्वाद घडविणाऱ्या आणि प्रत्यक्ष भगवंताची उक्ती असणाऱ्या गीतेला आधारभूत मानले आणि गीतेवरचे भाष्य केले. तसे पाहिले तर ज्ञानदेवांचा भागवतधर्म हा गीताधर्म आहे. ज्ञानेश्व र माऊली म्हणतात.
मग आर्ताचेनि ओरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे।
वर्षला शांतरसे । तो हा ग्रंथु ।।
आर्त जनांना दु:खापासून सोडवावे, त्यांच्या जीवनातील दु:खे आणि वेदना शांत कराव्यात या कळकळीने गीतेचा अर्थ सांगण्यासाठी सद्गुरूंनी जो ब्रह्मरसाचा वर्षाव केला तोच हा ज्ञानेश्वीरी ग्रंथ होय. “आर्तासाठी गीत आहे’ ही यामागची तळमळीची भूमिका घेऊनच ज्ञानदेवांनी गीताप्रणित भागवतधर्म सांगितला आणि सर्वांच्या जीवनात आनंद ओसंडून वहावा म्हणून सर्वांनाच भक्तीचा अधिकार देणाऱ्या गीतेवर भाष्य करून भक्तीचे द्वार खुले केले. ज्ञानेश्व्र माऊलींनी सारस्वताचा पाया घातला. ओवी, अभंग, गवळणी, विरहिणी ह्या वाङ्मय प्रकाराच्या आद्यरचना ज्ञानदेवांनी केल्या आहेत. ज्ञानदेवांनी रसालंकार संपन्न भाषेने साहित्यिकांना, साहित्य सोनियाच्या खाणी उघडून अंतरंग अधिकार जिज्ञासूंना, भक्तीयोग्य कथनाने वारकऱ्यांना, अष्टांगयोगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टान्ताच्या माध्यमातून प्रापंचिकांनासुद्धा आपल्या ज्ञानेश्वपरीच्या अमृतवाणीने वेगळा आनंद दिला आहे.
संत साहित्य आणि विचार याविषयी अनेक स्तरावर चिंतन घडले आहे. गेल्या शंभर वर्षात न्या. रानडे, राजाराम शास्त्री भागवत, प्रो. रानडे, राजवाडे, फाटक, पेंडसे, वै.मामासाहेब दांडेकर, ह. भ. प. ल. रा.पांगारकर, आचार्य विनोबा भावे, गं. बा. सरदार अशा अनेक विचारवंतांनी संत साहित्याचा परामर्श घेतला आहे. गं. बा. सरदारांनीया विचारवंतांचे तीन वर्ग सांगितले आहेत. “रानडे यांच्यासारख्यांच्या चिंतनात श्रद्धा व चिकित्सा, राष्ट्रभिमान व राष्ट्रनिष्ठा यांचा बेमालूम मिलाफ झाला आहे. त्यामुळे संतांच्या कार्याचे वैशिष्ट्यच फक्त त्यांनी सांगितले, पण उणीवा दाखविल्या नाहीत. रानड्यांनी भागवत धर्म व महाराष्ट्र धर्म यांचा समन्वय साधला, पण त्यातील विरोधाची मिमांसा केली नाही.’ असे सरदारांचे म्हणणे आहे.
दुसरा वर्ग आहे राजवाडे -भावे यांच्यासारख्या विचारवंतांचा राजवाडे भावे यांच्यासारख्या विचारवंतांचा राजवाडे भावे प्रभुती राष्ट्रवादी लेखकांना संतांचा भक्तिपंथ निष्क्रीयतेचा व नेभळपणाचा वाटला. युरोपचा इतिहास वाचून केवळ राष्ट्रवादाचा विचार करणाऱ्या या मंडळींना संतांच्या कार्यातील आणि वृत्तीतील सखोलता का दिसू नये, हा मोठा प्रश्नय आहे. राष्ट्रवादाचा विचारही मनात रुजवायला धर्मतत्त्वाची डोळस दृष्टी असावी लागते. ही दृष्टी देण्याचे काम संतांनी केले म्हणून तर पुढे राष्ट्रधर्म उभा राहिला. शिवकालीन राजकीय आंदोलकांनी वैचारिक पार्श्वीभूमी संतमंडळींच्या कार्यातून तयार झाली, हे विसरून चालणार नाही.
तिसरा वर्ग आहे संत साहित्याकडे व कार्याकडे श्रद्धेने व भक्तीने पाहणाऱ्यांचा. त्यात प्रामुख्याने वै. गुरूवर्य मामासाहेब दांडेकर किंवा ह. भ. प. ल. रा. पांगारकर यांनी संतसाहित्याचा भक्तिभावाने आणि रसिकेतेने परामर्श घेतला आहे. त्यामुळे संत साहित्यातील भक्तीतत्त्वाचे चिंतन मोठ्या प्रमाणावर झाले. संत आणि भक्ती हे अभेद्य नाते आहे, पण संतांची भक्ती ही देवळात, गाभाऱ्यात, सोवळ्या ओवळ्यात कर्मकांडात गुंतलेली नाही. भक्तीच्या माध्यमातून सामाजिक समतेचा सिद्धांत त्यांना लोकमनात रुजवायचा होता. ज्ञानेश्व र माऊलींना तर
जे जे भेटे भूत ।
ते ते मानिजे भगवंत ।
हा भक्तियोग निश्चि त ।
जाण माझा ।।
भक्तीयोगाची अशी सरळ सरळ व्याख्या सांगून भक्तीतत्त्वाचे सामाजिक चिंतन घडविले आहे, तर तुकोबारायांनी…
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ।।
असा रोखठोक उपदेश करून भक्तिच्याच माध्यमातून विष्णुमय जग पाहण्याची एक नवी दृष्टी दिली आहे. संत एकनाथांचे एक भारूड या संदर्भात महत्त्वाचे वाटले. त्या भारूडात ब्राह्मण आणि महार असा संवाद आला आहे. तो ब्राह्मण एका महाराला विचारतो आहे…
“का रे महारा मदमस्ता ।’
त्यावर तो महार सांगतो,
“कां हो ब्राह्मण बाबा भलतेच बोलता।’
त्यावर रागावून तो महार सांगतो,
“तुझ्या बापाचे भय काय…।’
आणि महाराच्या मुखातून स्वत: नाथ महाराज सांगतात,
“मायबाप तुमचे नि आमचे एकच हाय…’
आजच्या सामाजिक स्तरावरील समतेचा विचार करताना सामाजिक तत्त्वचिंतानाचा आद्य प्रवाह संतांच्याच आध्यात्मिक तत्त्वचिंतनातून उदयास आला आहे. संतांनी आध्यात्मिक तत्त्वांना सामाजिक मूल्यांची जोड दिली आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच संतांच्या भक्तितत्त्वाला “भोळ्या भावाचा व भावडेपणाचा विचार’ असे समजून भक्तित्त्वावर आघात केला जातो. संतांच्या विचारतत्त्वांचा खोलवर विचार न करता अध्यात्मवाद, भक्तीवाद असा शिक्का मारू त्यांच्या विचारात आणि चळवळीत धर्मसुधारणेची किंवा लोकजागृतीची भावना नाही. त्यांचा भक्तिमार्ग ही एक पळवाट आहे, असाही काहींचा आरोप आहे; परंतु हातात शस्त्र घेऊन उठाव करणे आणि कालची तत्त्वे पारंपारिक आहेत म्हणून लगेच परंपरेवर घाव घालून नवी पद्धत अवलंबिणे म्हणजे सुधारणावाद नव्हे. ऐहिक दु:खाचा व दैन्यांचा विसर पाडून मनुष्याला कोणत्या तरी काल्पनिक वातावरणांत गुंगवून संतांनी त्यांनी भोळ्या भावनेत गुंतवून ठेवले नाही, तर त्यांच्यातील जडत्व नाहीसे करून त्यांच्या जीवनात एक कार्यप्रवर्तक निष्ठा उत्तपन्न केली. विज्ञानाच्या अभावी बाह्यसृष्टीवर प्रभुत्व गाजविण्याची उमेद जोपर्यंत माणसामध्ये नव्हती तोपर्यंत त्यांच्या व्यक्तीविकासाला आध्यातिम्क अधिष्ठानाची नि:संशय गरज होती, म्हणून ज्ञानदेवादिकांनी महाराष्ट्रातील लक्षावक्षी लोकांच्या नि:सत्त्व जीवन क्रमाला अध्यात्मज्ञानाची जोड मिळवून दिली.
तेणे अबालसुबोधे।
ओवियेचेनि प्रबंधे ।
ब्रह्मरस सुस्वादे ।
अक्षरे गुंथिली ।।
त्यांच्याही जीवनात ब्रह्मरसाचा उत्कट आविष्कार घडविला. त्यांच्या नीरस जीवनात आनंद बहरू लागला. आपल्यातील सुप्त शक्तीची आणि भावनांची त्यांना जाणीव झाली आणि प्रतिकूल परिस्थितीलाही तोंड देण्याची त्यांच्या मनाची तयारी झाली.
नाथांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक तत्त्वचिंतनाचा फार मोठा प्रभाव तुकोबांच्या अभंगवाणीवर पडला आहे. समाजरीतीचे उत्कट दर्शन घेऊन ते उत्कटपणे आपल्या साहित्यातून अभिव्यक्त करणारा पहिला संत म्हणजे संत एकनाथ तेच समाजदर्शन वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणारा संत म्हणजे तुकाबाराय,
तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊन बाण फिरे ।।
नाही भीडभाड । तुका म्हणे साना थोर ।।
यासारख्या अनेक वचनांमधून त्यांच्याच अंतर्मनाचे उत्कट दर्शन घडते. आध्यात्मिक तत्त्वचिंतनाची परिणती सामाजिक मूल्यांमध्ये घडविणाऱ्या संत विचारपंपरेचे चिंतन करताना असेच म्हणावे लागेल की सामाजिक विषमतेने व्यथित झालेल्या कारुण्याचा पहिला उद्गार ज्ञानदेवांच्या रूपात प्रगटला, नाथांच्या रूपात त्याचा प्रतिध्वनी उमटला आहे. तुकोबारायांच्या रूपात सामाजिक विकृतींवर फटका देत मानवी मनात आणि समाजजीवनात आत्मविश्वारस आकारला.
बुडते हे जन न देखवे डोळा ।
येतो कळवळा म्हणवोनि ।।
किंवा
बुडाली काढीत।बांधली सोडीत।
साकडे फेडित । आर्ताचिया ।।
हीच संतांची भूमिका होती. म्हणूनच ज्या कळवळ्याच्या भूमिकेतून त्यांनी समाजाकडे पाहिले तोच कळवळा त्यांच्या साहित्यातून अभिव्यक्त झाला आहे. महाराष्ट्रीय संतांच्या पुढे मानवी जीवनाचे समग्र रूप उभे होते. म्हणूनच आपल्या आचार-विचारांना एकदेशियतेची बाधा होऊ दिली नाही. परंपरागत कर्मकांडातील लौकिक व्यवहारातील जडत्व त्यांना घालवायचे होते. त्यासाठी लोकाभिमुख होऊन नव्हे रात्रंदिवस लोकातच वावरून बहुजन समाजाच्या अंतरंगात आणि बाह्यचारात नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला अद्वैत आणि भक्ती, ज्ञान आणि उपासना, श्रद्धा आणि विवेक यांच्या एकात्मतेवर त्यांनी भर दिला आणि सामाजिक परिवर्तनासाठी विवेकनिष्ठेचा मार्ग सांगितला. कर्मपणा व व्रतवैकल्ये यावर झोड उठविली, पण स्वधर्मयज्ञाची महती कमी होऊ दिली नाही. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे….
एकांती लोकांती करू गदरोळ।
लेश तेही मळ नाही येथे ।।
एकांतात आणि लोकांतात असा गदारोळ उडवून दिला की मलिनतेची जळमटे आपोआप गळून पडली.
संत चळवळीचे सामाजिक चिंतन करताना तत्कालीन महाराष्ट्राचे चित्र डोळ्यासमोर आणावे लागेल. तेराव्या शतकाच्या अखेरीच संतचळवळ सुरू झाली.दक्षिणेकडील यादवांच्या राजवाटीला ओहोटी लागली होती. इ.स. 1216 मध्ये अल्लाउद्दीनची स्वारी झाली आणि त्याने संपत्तीची प्रचंड लयलूट केली. यावरून राजघराण्याच्या अलोट ऐश्वयर्याची कल्पना येते. राजकाराभाराशी प्रत्यक्ष जोडला गेलेला सरदार जहागीरदार, वतनदार यांची आर्थिक स्थिती मजबूत होती, पण सामान्य वर्ग आर्थिक विवंचनेच्या खाईत लोटला गेला होता. युरोपाप्रमाणे महाराष्ट्रातही एक प्रकारची सरंजामशाही अवतरली होती. निरनिराळ्या वर्गाचे आर्थिक हितसंबंध जमिनीशी निगडीत होते. राजसंस्था, वतनसंस्था, ग्रामसंस्था यांचे लाभकेंद्र जमीन हेच होते. युरोपाप्रमाणे इथला शेतकरी भूमीहीन नव्हता. त्याच्या मालकीची थोडी होती; परंतु ती निसर्गावर अवलंबून असायची. जमीनीची अल्प उत्पादन शक्ती हेच सामाजिक दुरावस्थेचे मुख्यकारण होते. राजकारभारातील सरदार, जहागीरदार यांच्या मनमानी कारभाराची झळ शेतकऱ्यांना पोहोचली होती. नाथांच्या साहित्यातून या समाजस्थितीचे वर्णन होते. सामाजिक अस्थैर्याचा तो काळ होता. सत्तासंपादनासाठी सरदारांची आपापसात भांडणे होत. रयतेला लुटण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करीत. त्यामुळे गावगाड्यातील पाटील, शेटे, महाजन, चौगुले हा वर्गही त्यांना सामील होऊन गोरगरीबांना लुटत होता. पुंडाई आणि गुंडगिरी वाढली होती. ब्राह्मणवर्गाने कर्मठपणा वाढवला होता. क्षेत्रियांनी युद्धावर पळून येणे तर वैश्यावने शेतच्या शेत ओस पाडणे हा प्रकार चालला होता. ज्यांच्याकडे आशेने पहावे असा सर्वसंगपरित्याग करून परमार्थात आलेला बैरागी, साधू, जंगम, महानुभाव, फकीर, कलंदर हे स्वार्थासाठी दांभिक झाले होते.
रडती पोटासाठी। झालो म्हणती सन्यासी।
वर्म नकळे मूढा । होतो फणित रोकडा ।।
यासारख्या एकनाथांच्या अभंगातून हे चित्र उभे राहते. अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार यामुळे समाजाचे संतुलन बिघडले होते. विषयवासना बळावली होती. विकारांना आश्रय मिळाला होता. भक्ती वैराग्य बुडाले होते. दांभिकतेचे कौतुक होत होते. खरा धर्म, कर्म, नीती आणि आचार हे सारे लोपले होते.
समाजातील दुष्ट प्रवृत्ती जोपर्यंत संपुष्टात येत नाहीत आणि सत्प्रवृत्ती जोपर्यंत वाढीस लागत नाही. तोपर्यंत समाजाला स्वास्थ्याची आशा नाही, हे नाथांनी ओळखले. एकीकडे वाढत चाललेली अवनती या दोन्ही गोष्टींमुळे संत एकनाथ हळहळले आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी त्यांनी “बये दार उघड’ म्हणून आदिशक्तीला आवाहन केले. थोडक्याकत सांगायचे तर भौतिक दुरावस्था आणि मानसिक गुलामगिरी यामुळे सामान्य जनता जड, मूढ व अगतिक बनली होती. या केविलवाण्या स्थितीतून तिला मुक्त करण्यासाठी संत चळवळ जन्माला आली. भक्तीपंथाचा उदय, देशभाषेची प्रतिष्ठा आणि कर्तव्यप्रधान समाजजीवन यातून संतांच्या प्रबोधनकार्याची दिशा स्पष्ट झाली.कर्तव्याची चौकट भक्कम करूनच खऱ्या नीतीधर्माच्या उपदेशाने वैयक्तिक व सामाजिक जीवनसमर्थ करण्यासाठी संतांनी केलेला खटाटोप हा महाराष्ट्राच्या सामूहिक जीवनातील परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. सामाजिक भूमिकेतून संतकार्याचे मोठेपण मांडतांना ग. बा. सरदारांनी म्हटले आहे की,संत चळवळ ही सामाजिक लढ्यापासून लोकांना परावृत्त करणारी प्रतिगामी शक्ती नसून धार्मिक जीवनाच्या कक्षेत त्यांच्या हक्कासाठी सनदशीरपणे झगडणारी सुधारणावादी प्रवृत्तीच होती.’ संतांची ही लोकाभिमुख वृत्ती अध्यात्मा पुरतीच मर्यादित राहिली नाही.त्यांनी लोकसंस्थेचे मोठेपण ओळखले लोकजीवनाला सामाजिक नैतिकतेकडे नेणे हेच साध्य समजले आणि या लोकसंस्थेलानवचैतन्याचे वाहनबनविण्याची नवी दृष्ट दिली. हेच संत साहित्याचे सामाजिक योगदान म्हणावे लागेल.
डॉ. रामचंद्र देखणे
हत्ती इलो या दीर्घ कवितेवरील कवी अजय कांडर लिखित दैनिक लोकसता मधील संकलीत लेख
अजयकांडर, रविवार, ११ डिसेंबर २०११
ajay.kandar@gmail.com
शब्द पब्लिकेशनतर्फे अजय कांडर यांची ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता लवकरच प्रसिद्ध होत आहे. ही दीर्घ कविता ‘हत्ती’ हे रूपक घेऊन आजची समाजव्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याकडे निर्देश करते. तसेच या कवितेच्या रूपकातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थित्यंतरे दिसत असली, तरी या सर्वाच्या मुळाशी माणसातील सांस्कृतिक विचारशीलता नष्ट झाली आहे, हे लक्षात येतं.
मा झ्या पहिल्या ‘आवानओल’ काव्यसंग्रहानंतर सुमारे सात वर्षांनी ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता प्रसिद्ध होत आहे. शब्द पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होणारी ही दीर्घ कविता ‘हत्ती’ हे रूपक घेऊन आजची समाजव्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याकडे निर्देश करते. ‘ऐवजी’, ‘मुरळी’ अशा वाङ्मयीन नियतकालिकांमधून ‘हत्ती इलो’चा काही भाग आधी प्रसिद्ध झाला आहे. त्या वेळी जाणकार वाचकांनी, समीक्षकांनी या कवितेबाबत प्रतिक्रिया नोंदविल्या. यातूनच ‘शब्द पब्लिकेशन’ने हा संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. खरं तर मराठीत नव्वदोत्तर पिढीत दीर्घ कविता मोठय़ा प्रमाणात लिहिली गेली. मात्र, हा त्या वेळचा प्रवाह ओलांडून मी ‘हत्ती इलो’चे लेखन केले आहे. अर्थात, यामागे निश्चित भूमिका आहे. ‘आतला आवाज साद देतो’ तेव्हाच लेखकांनी लिहायचं असतं असं म्हणतात. ‘हत्ती इलो’चं लेखनही असंच झालं असावं, असं मला वाटतं!
२००५ मध्ये ‘आवानओल’ हा संग्रह प्रसिद्ध झाला. सर्वदूर पसरलेल्या खेडय़ांतील कष्टकरी बायांच्या वेदनेच्या गाजेचा प्रतिध्वनी ‘आवानओल’मध्ये आपल्याला ऐकू येतो. कष्टकरी बायांचं चित्र मराठी कवितेत तसं नवं नाही; परंतु तळकोकणातील कष्टकरी बायांचं ‘लोकजीवन आणि भोगजीवन’ तिच्या बोलीसह मराठी कवितेत प्रथमच वाचकाला वाचायला मिळालं, असं त्या वेळी अनेक वाचकांनी सांगितलं. ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’सह मराठीतील अनेक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित पुरस्कार या संग्रहाला त्या वेळी प्राप्त झाले. या संग्रहातील कविता विविध अभ्यासक्रमांसाठी निवडल्या गेल्या. विविध भारतीय भाषांत ‘आवानओल’मधील कविता भाषांतरित केल्या गेल्या. विविध अभ्यासकांनीही स्वतंत्रपणे ‘आवानओल’मधील कवितेवर लेखन केलं. हे सांगायचं कारण हेच की, असं यश प्राप्त झाल्यावर आधीच्या मानसिकतेतून तशा प्रकारची कविता पुढे लिहिणं सोपं जातं. मात्र जाणीवपूर्वक अशा प्रकारची कविता लिहिण्याचं टाळून मी ‘आवानओल’नंतरच्या कवितेत सामाजिक आणि राजकीय पर्यावरणाचा- पर्यायानं कोकणची प्रादेशिकता ओलांडून एकूण बदलत्या समाजजीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘हत्ती इलो’ या दीर्घ कवितेचं लेखन होय!
कलावंत कलेच्या माध्यमातून विकसित होत असतो, तेव्हा त्याची मुळं महत्त्वाची असतात. ज्या जमिनीत आपण पीक घेत असतो त्या जमिनीची अधिकाधिक मशागत होते तेव्हाच चांगलं पीक येतं. माझी आधीची कविता खेडय़ांतील भेदक वास्तव समोर ठेवत असल्यानं त्यानंतर लिहिली गेलेली कविता खेडय़ांतील पूर्वसंस्कार पचवत खेडं आणि शहर यातील जगणंच उद्ध्वस्त करणारी लिहिली गेली आहे. मराठीत दीर्घ कविता माझ्या पिढीत याआधी सातत्यानं लिहिली गेली असली तरी विशिष्ट प्रदेशाच्या लोकजीवनावर आघात होऊन ते लोकजीवनच संपुष्टात आल्याची तीव्र वेदना प्रथमच ‘हत्ती इलो’ या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. अर्थात, समकालाचा मागोवा ही कविता घेत असल्यानं ती या ठरावीक लोकजीवनाला ओलांडून अनुभव आणि जाणीव-नेणिवेच्या पातळीवर व्यापक होत जाते. त्यामुळे वाचकाला ती समग्रपणे भिडून आतून ढवळून काढेल, असाही विश्वास वाटतो आहे.
स्वातंत्र्यानंतर सर्वत्र राजकीय आणि सामाजिक बदल झाले. मात्र, तळकोकणाची भूमी या सगळ्या बदलांना संयमितपणे सामोरं जात शांतच राहिली. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गांधीविचारांची मुळं तळकोकणात खोलवर रुजलेली होती. तर बॅरिस्टर नाथ पै यांच्या सारखा कलासक्त, चतुरस्र व्यक्तिमत्त्व लाभलेला नेता याच भूमीतला. नाथ पै यांचे विचारधन घराघरांत पेरले गेल्यामुळे इथला माणूस तसा विचारशीलच. त्यामुळेच इथे गेली २५ वर्षे नाथ पैंच्या विचारांचा वारसा घेऊन, लोकसभेची निवडणूक लढवून पाच वेळा निवडून येणारे तत्त्वनिष्ठ नेते प्रा. मधू दंडवते यांच्या समाजवादी विचारांतून तळकोकणात समाजवादी वातावरण तयार झालेले. स्वातंत्र्यानंतर पुढील ४० वर्षे हेच वातावरण राहिल्याने कोकणात राजकीय संघर्ष असा झालाच नाही. परिणामी इथली समाजव्यवस्था शांततेतच शाबूत राहिली. मात्र ९० च्या दशकाच्या प्रारंभी इथल्या राजकारणाचे भगवेकरण झाल्याने आणि त्यामुळे समाजवादी विचारांखाली दबून राहिलेल्या तरुणाला नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाल्याने, इथल्या घराघरांतल्या चुलीत राजकारण शिजू लागले. त्यातूनच कोकणच्या बदलत्या समाजजीवनाला प्रारंभ झाला.
‘हत्ती इलो’चा प्रारंभ अशा संयमित आणि विचारशील समाजव्यवस्थेचा वेध घेत असल्यानं ही कविता समजाचं, एका काळाचं चित्र प्रतिबिंबित करीत जाते. यातून विशिष्ट प्रदेशाचा इतिहास, विशिष्ट पिढीवरचा एखाद्या काळाचा संस्कार वाचकाच्या मनात उमटत राहील. परिणामी स्वातंत्र्यानंतरच्या प्रारंभीच्या राजकीय संयमी जीवनाकडेही ‘हत्ती इलो’ ही कविता निर्देश करते. स्वातंत्र्यानंतर समाजजीवन उंचाविण्याचं स्वप्न अनेक नेत्यांनी दाखविलं. या लोकनायकांनी समाजजीवन उंचावलेही. मात्र या अशा लोकनायकांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या मुशीतून तयार झालेले ‘लोकनेते’ पुढे मात्र पार बदलून गेले. इथूनच समाजाच्या वैचारिक व सामाजिक अधोगतीला प्रारंभ झाला. नव्वदच्या दशकात कोकणचं राजकारण अशा स्थितीतून ढवळून निघालं आणि इथे पूर्णत: हिंदुत्वाची लाट आली. ही लाट विजयाच्या शिखरावर पोहोचल्यामुळे यश मिळूनही ते न पचविता आलेल्या व्यवस्थेची जी स्थिती होते, तोच अनुभव या राजकीय व्यवस्थेतून इथल्या समाजाला घ्यावा लागला. या संदर्भातील ‘हत्ती इलो’ कवितेतील पुढील ओळी आपल्याला अधिक प्रचीती देतात.
जिथे हत्तीलाच मिळालं संरक्षण
तो असताना बंदुकीच्या निशाणीवर
दिला त्याला कुणी आधार, वाचविले त्याचे पंचप्राण
तिथेही त्याच्या स्वप्नातील उन्मादाची रग उसळत राहिली
आणि ज्या उन्हात आली सावली माऊली होऊन
ज्या कडय़ाकपारी झाल्या मायबाप
तिथल्या परंपरेचं संचित उद्ध्वस्त होताना
प्रसंगी स्वत:च उद्ध्वस्त करताना
तो डोळ्यांत आसुरी आनंद साठवत राहिला क्रूरपणे!
आजच्या सत्ताधारी व्यवस्थेचं असं चित्र लक्षात आल्यावर अंतर्मुख व्हायला होतं. तर दुसरीकडे मूल्यऱ्हास सर्वत्र होत आहे. सांस्कृतिक क्षेत्राचं अध:पतन, सामाजिक जीवनाच्या मूल्यांची सरमिसळ आणि व्यक्तिवादी विचारधारा ही सद्य:स्थितीत अधिक बळावली आहे. याच्या मुळाशी गेल्यास एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. पूर्वी माणूस सार्वत्रिक जीवनाशी आपलं जगणं जोडून घेताना आधी समाजाचा विचार करीत होता. आता तो समाजाला स्वत:च्या केंद्रस्थानी ठेवत आहे. ही विलासी वृत्ती एकूण समाजाला विनाशाकडे घेऊन जाणारी असून, या सर्वावर स्वार झाली आहे ती सत्ताधारी व्यवस्था! जिथल्या-तिथल्या सत्ताधारी व्यवस्थेतून अविचारांची बीजं रुजत असल्यामुळं तत्कालीन राजकीय व्यवस्थेबरोबरच एकूण समाजच बधीर झालेला आपल्याल आढळतो.
‘हत्ती इलो’ या कवितेत याचं प्रभावी चित्र मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.समाजातील मने दुभंगत जातात तेव्हा त्याचा फायदा राजकीय व्यवस्थेलाच होत असतो. आणि या व्यवस्थेचा फायदा घेत राजकीय एकाधिकारशाही जन्म घेत असते. यातून मग एकाधिकारशाही असलेल्या राजकीय व्यवस्थेला आपल्या मनासारख्या घटना सहज घडवून आणता येतात. राजकारणाच्या असंस्कृतपणामुळे समाजजीवन उद्ध्वस्त झालंच; परंतु प्रत्येक माणसाला स्वत:चा हक्क शाबूत ठेवण्याचा अधिकारही उरलेला नाही.
‘हत्ती इलो’ ही कविता नेमकेपणानं यावर बोट ठेवते. आज आपण घटनेनुसार व्यवस्था राबवत असलो तरी घटनेनं बहाल केलेले नियम राज्यकर्त्यांकडून पाळले जात नसल्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे अनुभव आपण वारंवार घेत असतो. माणसांना आपल्या साध्या साध्या हक्कासाठीही झगडावं लागत आहे. त्यांचा आवाज दबला जातोय. या आवाजाचं पालकत्व ज्यांनी स्वीकारायला हवं, तेच आज लोकशाहीच्या मुळावर आलेले दिसतात. त्यामुळे माणसं एका अविश्वसनीय जगात जगत असल्याचं चित्र सर्वत्र निर्माण झालं आहे. या अविश्वसनीय चित्राचा उद्गार म्हणजे ‘हत्ती इलो’ ही कविता!
गणगोत आणि नाती जपली जातात तेव्हा आपलेपणाचं स्नेहमय वातावरण समाजात तयार होत असतं. मात्र नात्याचे पाश तोडले जात किंवा आपल्याला हवे तेव्हाच जपत, त्यांचा आपल्याला हवा तिथे वापर व्यवस्थेसाठीही करता येतो, अशी वृत्ती राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत वाढत जात आहे. त्यामुळे सत्तेचं नवं आमिष दाखवून कुठलीही सत्ता समाजातील नातेसंबंधावर कशी घाव घालते आहे, याबाबतचे संदर्भही ‘हत्ती इलो’ या कवितेत आपल्याला तपासता येतात.
माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक निकोप अभिसरण व्हायला हवं. मात्र या तिन्ही व्यवस्था ज्यांच्या हातात आहेत, त्यांना त्याचा एकमेकांशी काय पूरक संबंध असतो, किंवा समाजातील प्रत्येक माणसाच्या जीवनात त्याचं काय स्थान असतं, हेच माहीत नसल्यानं समाजातील प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासावर दूरगामी परिणाम वर्षांनुवर्षे होताना दिसत आहेत. अशा परिणामांचे प्रतीक म्हणूनही ‘हत्ती इलो’ या कवितेकडे आपण पाहू शकतो!
या कवितेत व्यक्त झालेला सांस्कृतिक ऱ्हासही मला महत्त्वाचा वाटतो. ‘हत्ती इलो’ या कवितेच्या रूपकातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थित्यंतरे दिसत असली, तरी या सर्वाच्या मुळाशी माणसातील सांस्कृतिक विचारशीलता नष्ट झाली आहे, हे लक्षात येतं. सांस्कृतिक विचार हा आजूबाजूच्या पर्यावरणातून आपल्याला मिळत असतो. तसा तो मूलत: आपल्यात नैसर्गिकच आत दडलेला असतो. फरक एवढाच असतो की, आपल्या सांस्कृतिक विचाराला जो माणूस अधिक चालना देतो तो सांस्कृतिकदृष्टय़ा व्यक्तिगत पातळीवर अधिक घडत जातो. आणि त्यातून तो विचारशील होतो. याचा अर्थ असा की, कुठलाही विचारशील माणूस आधी सांस्कृतिकच असतो. मात्र, आजच्या समाजव्यवस्थेत अशा विचारशील माणसाकडूनच अविचारी कृती घडत असल्यामुळे समाजाच्या मूळच्या अपप्रवृत्तींना अधिक बळकटी मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही काळात अशी अपप्रवृत्ती बाळगणारी राजकीय व्यवस्था विचारशील माणसाला आपल्या गोतावळ्यात घेऊन आपली बाजू अधिक सक्षम करीत राहते. यातून एकूणच समाज सांस्कृतिकदृष्टय़ा रसातळाला जात राहतो. ‘हत्ती इलो’ या कवितेत या सर्वाचा वेध घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कृती ही जबाबदारीची आणि प्रगतिशील असली पाहिजे. अशा कृतीतून जात-धर्माच्या पलीकडे एकूणच मानवी मूल्यांच्या आधारावर समाजव्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज असते. मात्र, आपल्या बहुजातीय आणि बहुधर्मीय देशात अशी सांस्कृतिक कृती अधिक गरजेची असताना आपण सांस्कृतिक परंपरेच्या सनातन चौकटी मोडून काढू शकत नाही. या मानसिकतेचाही मागोवा ‘हत्ती इलो’मध्ये घेण्यात आला आहे. सध्या कोणाला विचारशील म्हणावं, अशा संभ्रमाच्या काळाला आपण सारे सामोरे जात असून, व्यक्तिगत फायद्यासाठी अशा तथाकथित विचारशील व्यक्तीनेच समाजजीवन उद्ध्वस्त करणाऱ्या तथाकथित महान व्यक्तीचं चरित्र लिहिल्याच्या कथाही आपण अनुभवत असून, यावरही ‘हत्ती इलो’ कविता भाष्य करते.
‘हत्ती इलो’ या कवितेला कोकणचं पर्यावरण लाभल्यामुळं तिच्यात कोकणचं भावजीवन, राजकीय आणि सामाजिक संघर्ष येणं स्वाभाविकच होते. परंतु कोकणचा निसर्ग आणि त्याचा ऱ्हास मांडताना तिथल्या लोकजीवनाला चिकटून आलेल्या कोकणच्या बोलीचा चपखलपणे वापर केलेला आढळेल. कविता हे कवीचं आत्मचरित्र असतं, असं मी मानतो. त्यामुळे माझी कोणतीही कविता माझ्या जगण्यासह माझं आजूबाजूचं पर्यावरण मांडते. पेशाने पत्रकार असल्याने कोकणचं राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतर उघडय़ा डोळ्यांनी पाहिलं आणि माझ्यात एक माणूस म्हणून नेहमीच अपराधीपणाची भावना कायम टोचू लागली. कारण काही वर्षांत राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेनं कोकणचं रूपडंच पालटून टाकलंय. माणूस माणसापासून पारखा झालाच; परंतु कधी नव्हे एवढी राडा संस्कृती इथे बळावली. दर निवडणुकीच्या वेळी माणसाचाच बळी दिला जाऊ लागला. अर्थात, याला एकच राजकीय विचारधारा कारणीभूत नव्हती तर संधीसाधूपणातून सर्वच राजकीय विचारधारा अशा घटनेला कारणीभूत ठरल्या असल्याचं लक्षात येतं. माणूस म्हणून आणि एक कलावंत म्हणून मी जेव्हा या सर्वाचा तटस्थपणे विचार करतो तेव्हा तीव्रतेनं एक गोष्ट लक्षात येते, ती ही की, आता माणसाचा माणसावरचा विश्वास उडून गेलाय. परिणामी ‘हत्ती इलो’ या कवितेत कोकणचं हे वातावरण प्रतिबिंबित झालेले आहे.
‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता लिहिण्याची प्रेरणा मिळण्याला एक घटनाच कारणीभूत आहे. प्रयोगशील नाटय़कर्मी अतुल पेठे कणकवली येथे प्रायोगिक नाटय़चळवळ राबविणाऱ्या ‘वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान’साठी नाटक बसवायला आले होते. त्यांनी मला कोकणच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक पाश्र्वभूमीवर नाटक लिहिण्याचा प्रयत्न करायला सांगितला. या निमित्ताने मी जे चिंतन केलं, त्यातून माझ्या मुळच्याच काव्यवृत्तीला बळकटी मिळाली आणि नाटकाऐवजी ‘हत्ती इलो’ या दीर्घ कवितेचे लेखन झालं. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांच्या सीमेवर तळकोकणचा भाग येतो. या सर्व भागांत गेल्या काही वर्षांत रानटी हत्तीने उच्छाद मांडला आहे. हाच अनुभव काही वर्षांतील राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेतून सार्वत्रिकपणे आपल्याला घ्यावा लागतोय. म्हणूनच हत्तीच्या रूपकातून ‘हत्ती इलो’चं लेखन झालं. या संदर्भातील या कवितेतील अखेरचा काही अंश..
‘आता हत्ती ज्या भूमीलाच स्पर्श करतोय
ती भूमीच नापीक झालीय
भूमी र्निवश झाल्याचे दु:ख मनात असतानाच
हत्तीने माणसांनाच र्निवश करायला प्रारंभ केला
हत्तीच्या गर्जनेने..
ओल्या बाळंतिणीचाही पान्हा सुकू लागला
उदरातील गर्भ गुदमरू लागला
आता माणसंच मंदबुद्धीची झाल्याची खात्री पटल्यावर
हत्ती, एवढा बोकाळला,
की त्याने आधी माणसांना गृहीत धरले होतेच,
आता माणसेही त्याला गृहीत धरू लागली..
हत्ती आणि माणसाचा असा खेळ हल्ली रोज नव्याने खेळला जातोय, सर्वत्र!
गेल्या पंचवीस वर्षातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अध:पतन ‘हत्ती इलो’मध्ये मांडण्यात आले आहे. ही दीर्घ कविता विशिष्ट प्रादेशिक जनजीवनाच्या पडझडीचा काळ जसा मांडते त्याचबरोबर त्यातील अंतर्विरोधातील ताणेबाण्यामुळे ती वाचणाऱयांमध्ये वैश्विक भानही निर्माण करते, असे मत ‘हत्ती इलो’बाबत अनेक मान्यवरांनी समीक्षा लेखनातून व्यक्त केले आहे.
‘हत्ती इलो’ या संग्रहानिमित्त कांडर यांची भारत सरकारच्या ‘साहित्य अकादमी’सारख्या शिखर संस्थेवर सदस्य म्हणून पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. तर या संग्रहाला ‘कुसुमाग्रज’, इंदिरा संत, यशवंतराव चव्हाण, काव्यरत्नाकर, नारायण सुर्वे आदी प्रतिष्ठित आठ काव्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर संग्रहावर अनेक मान्यवरांनी समीक्षालेखन केले आहे. तसेच त्यावर ‘हत्ती इलो’ याच नावाने नाटक रंगमंचावर आले असून त्यालाही अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)