*परिवर्तनाच्या वाटेवरची कविता : रापी जेंव्हा लेखणी बनते*
*- गणेश सूर्यवंशी*
प्रस्थापित समाज व्यवस्थेबद्दलचा असंतोष आणि विद्रोह भारतीय दलित साहित्यात आहे. ज्या समाजव्यवस्थेने अभावग्रस्त समूहाचे माणूसपण नाकारले. त्यांचे नैसर्गिक अधिकार आणि हक्क नाकारलीत, पदोपदी शोषण केले, प्रगती आणि विकासाची कवाडे त्यांच्यासाठी बंद केली, ज्ञानापासून त्यांना वंचित ठेवले ती समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था दलित साहित्याने नाकारली. ज्या - ज्या घटितांमुळे प्रवाहापासून लांब राहिलो ती सर्व घटीते, ग्रंथ आणि व्यवस्थेबद्दल दलित साहित्याने तीव्र असंतोष व विद्रोह व्यक्त केला आहे. हजारो वर्षांपासून जो जात व वर्ग समूह मागासलेला राहिला. त्याच्या मागासलेपणासाठी इथली व्यवस्था सर्वार्थाने कारणीभूत आहे. या व्यवस्थेने व व्यवस्थेच्या वारसदारांनी या समूहाला वंचित ठेवले, त्याची नाकेबंदी केली, त्यांना नाकर्ते ठरवलंय, त्यांना अज्ञानात ढकलले, त्यातून बाहेर पडता येणार नाही अशी तजवीज केली.
पर्यायाने हा समूह दिवसेंदिवस हतबल झाला; आत्मविश्वास गमावून बसला. सामाजिक, राजकीय, आर्थिक,शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच नैसर्गिक हक्कांपासून दूर राहिला. त्यामुळे त्याच्या वाटेला अभावग्रस्त जगणे आले. मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी संघर्ष करावा लागला. लाचारी पत्करावी लागली. त्यात आजचा ओ.बी.सी, एस.सी., एस. टी, भटका - विमुक्त समूहाचा समावेश करता येईल. रूढीच्या जोखडाखाली हा समूह दाबला गेला. अंधश्रद्धेच्या खाईत ढकलला गेला. सन्मानाचे जगणे त्याच्या वाट्याला येऊ दिले नाही. त्याला दर्जाहीन व अस्वच्छ कामे करण्यास भाग पाडले जाऊ लागले. खान-पान राहणीमानाचा दर्जा राखण्यासाठी आवश्यक बाबींचा अपूर्ततेमुळे तो अस्पर्श ठरला. ही अस्पृश्यता वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या जातीय उतरंडीमुळे निर्माण झाली. ही उतरंड खालच्या थरातील व्यक्तीने वरचा थर गाठूच नये, अशीच तयार करण्यात आलेली होती. त्यामुळे हा समूह सर्वार्थाने मागे राहिला. अशा या समूहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व कार्यातून आत्मभान येऊन तो जागा होऊ लागला. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत असताना त्याचं नाकारलेपण त्याच्या लक्षात आलं. बाबासाहेबांनी दिलेला ' शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ' चा कित्ता तो गिरवू लागला. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य व विचार वाचू लागला. शिक्षणाने जागृत झालेली ही पिढी आपल्या समाजाकडे विवेकाने बघू लागले. आपला भूतकाळ , वर्तमान आणि भविष्याबद्दल बोलू लागली. त्यांचं हे लेखनच दलित साहित्य म्हणून सर्व परिचित आहे . खरंतर हे आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य आहे. या दलित साहित्य प्रवाहातील एक महत्त्वाचा कवी म्हणून राम दोतोंडे यांच्याकडे पाहिले जाते.
राम दोतोंडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून ते पदवी व पदव्युत्तर झाले. महाविद्यालयीन जीवनातच दलित चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. परिवर्तनाची कास धरली. महाविद्यालयीन जीवनातच त्यांचा ' रापी जेव्हा लेखणी बनते ' हा काव्यसंग्रह 1978 साली प्रकाशित झाला . चांभार जातीत जन्मल्यामुळे या जातीच्या वाटेला आलेल्या अवहेलना व दुःख, वेदना त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहात प्रकर्षाने आल्या आहेत. वडील स्वतःचा चांभारकाम करीत असल्याने व स्वतः देखील हे काम करण्याचा अनुभव असल्याने या व्यवसायासंबंधीच्या अनेक गोष्टी त्यांच्या कवितेत बघायला मिळतात.
ज्यांच्यासाठी आपण बूट - चप्पल शिवून देतो. तेच लोक मात्र आपल्याला तुच्छ लेखतात. त्यांना आपण शिवलेल्या मोटेतलं पाणी चालतं, मात्र आपला स्पर्श चालत नाही. हा अनुभव मन विदीर्ण करणारा आहे. आपल्याकडून चप्पल शिवून घेणारा माणूस आपल्याला चपलेपेक्षा तुच्छ लेखतो. त्यापेक्षा हे कामंचं बंद केलं तर ? ज्या व्यवसायामुळे आपल्याला व्यवस्था स्वीकारत नाही. ते काम नाकारयचं आणि शिक्षण घेऊन सन्मानाचं काम करायचं. सन्मानाचं जीवन जगायचं. या विचाराने पेटून उठलेला कवी हातातली रापी टाकून लेखणी हातात घेतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिक्षणाची सन्मानजनक जगण्याची कास धरतो. हा कवी आपल्या इतिहासाबद्दलच्या चिंतनात गढून जातो . स्वकीयांनी शिक्षणाची कास धरून प्रवाहात येण्यासाठी धडपडतो. त्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो. त्याचा हा संघर्ष दुहेरी आहे. पहिला संघर्ष हा कुटुंब व आप्त स्वकीय सोबतचा आहे. आणि दुसरा म्हणजे व्यवस्थेसोबतचा. हा संघर्ष त्याच्या कवितेतूनही स्पष्टपणे उमटून पडतो. कवी म्हणतो ___
"हे बाबा ,
रापीने कातडे कापण्याऐवजी
का कापले नाही
इथल्या रूढींचे हात ?"
ज्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या रुढी परंपरांच्या जोखडामुळे त्याच्या वाट्याला दैन्य आलेलं आहे. त्या रुढी - परंपरा आपल्या आधीच्या पिढ्यांनी कधीच नाकारल्या असत्या तर कदाचित आजचे आपले जगणे वेगळे असते. असा विचार त्याच्या मनात येतो. आपल्या शोषितपणाच्या कारणांचा शोध घेताना त्याला त्याचं नेमकं उत्तर सापडतं तो म्हणतो,
'मला झोपवल्या गेलं होतं
मनुस्मृतीची टिपरी पाजून '
पण आता असे झोपून चालणार नाही. शिक्षणाने आत्मभान आलेला कवी पुढे म्हणतो __
'आता मी जागलो आहे'
त्याच्या जाती व्यवसायातील अनेक हत्यारांचा समर्पक वापर कवितेत केलेला दिसतो आहे. आरी, रापी, पाळू, एकलई , खिळे , रिबीट, वादी, मोट, चामडे, पट्टी, हस्ती ही चांभारी व्यवसायाशी संबंधित हत्यारे आहेत. या हत्यारांचा व्यवस्था उध्वस्त करण्यासाठी नेटका वापर करता आला असता . पण तसे झालं नाही. याची खोच कविच्या मनात आहे.
' वादीने तळ शिवण्याऐवजी
का शिवले नाहीत
येथल्या मना - मनात समता स्वातंत्र्याचे जाळे ? '
तसेच
'हस्ती पाळूचा उपयोग
तळ ठोकण्यासाठी
न करता
तिथल्या जातीचे टाळकं
ठोकून काढण्यासाठी
का नाही केलास ?
असा मार्मिक सवाल तो आपल्या पूर्वजांना करतो. दलित समूहाला सर्वहारा करणारी व्यवस्था ही___
' गाढवावर सामान लादावं
तशी लादली गेली ही तुझ्यावर
तुला गुलाम बनवण्यासाठी '
हा त्याच्या मनात खदखदणारा असंतोष आहे. यात त्याला आलेलं इतिहासाचे भान आहे. म्हणून पुढच्या पिढीला उद्देशून तो म्हणतो ___
' आता तुझ्या पोरानं
हस्ती ऐवजी
लेखणी हातात घ्यावी '
पुढच्या पिढीने पुन्हा कुंडाकडून कुंडाकडे जाऊ नये, असा सल्लाही कवी द्यायला विसरत नाही. चर्मकार समाज आजही बऱ्याच अंशी रूढी परंपरेच्या गर्तेत अडकला आहे. परंपरा प्रियतेमुळे तो अद्यापही शोषणमुक्त होऊ शकला नाही.
' कित्येक वर्षांच्या ढीगाखाली
चेंगरून गेलाय
हा चांभार समाज '
त्याची आसवं अंधारात निघतात आणि अंधारातच गडप होतात. या दुःखाचे , आसवांचे अवशेष कुणालाच मिळत नाहीत. अंधार सर्वांग पसरलेला आहे. महार जातीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पायवाटेवर जाण्याचे ठरवले आणि हिंदू धर्म परंपरेतील वर्ण व्यवस्थेच्या जाचातून मुक्त होऊन बौद्ध झाला. परंतु चर्मकार समाज देखील जातीय उतरंडीमध्ये तितकाच पिचलेला होता. विषमतेचे चटके त्याला देखील तितकेच बसलेले होते तरीही तो धर्मांतरित का झाला नाही ? विषमतेचं दुःख पचवत तो अद्यापही याच परंपरांच्या विळख्यात अडकून पडलेला आहे. याची सल कवीचा मनात आहे. म्हणून कवी म्हणतो ___
' प्रेरणा दिली एका महामानवाने
रापीला लेखणी बनविण्याची
पण तेव्हा हा झोपेतच राहिला
पांघरून म्हसडी रुढीची '
बाबासाहेबांनी दिलेली धम्माची वाट ही खऱ्या अर्थाने विज्ञानाची, शोषणमुक्तीची वाट होती. पण चर्मकार समाज मात्र गावगाड्यांच्या रुढीमध्ये गुरफटून राहिला, ही बोच कवीला सतावते. कारण जातीयतेची उतरंड निर्माण करायला इथली धर्म संस्कृती कारणीभूत आहे. इथली वर्णव्यवस्था कारणीभूत आहे.
'हिंदू संस्कृतीच्या
वीर्यातून
जातीयतेला दिवस गेलेत त्यातूनच निर्माण झालोय
मी
रस्त्याच्या कडेला बसून
ऐरण हस्ती सोबत घेऊन
ठाकठूक करणारा '
आपल्या वाटेला जे दुःख, अपमान, वेदना, शोषण, बंधने अज्ञान , अंधश्रद्धा , उपेक्षा या सर्व बाबी आलेल्या आहेत यांच्या मुळाशी केवळ इथली धर्म व्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेली जातीय उतरंड आहे . मी व माझा समाज रस्त्याच्या कडेला बसून जे अस्वच्छ काम करतो. ते काम देखील जातीमुळे माझ्या वाटेला आलेले आहे. उपजीविकेचे साधन असलं तरी ते सन्मानजनक नाही हे निश्चित.
' पाचव्या वर्गात होतो तेव्हाच
बापानं आरी - तळ दिलं हातात
______________________
______________________
मी शिकत गेलो शाळेत
इतिहासाच्या घडामोडी
घरी चामड्याची चिवडा - चिवडी
असंच वय वाढत गेलं
आयुष्य घटत गेलं '
आरी ,रापी , ऐरण , पाळू, सुई -दोरा हा चांभाराचा संसार असतो. सोबतीला चामडे, वादी अन कुंडातल्या पाण्याची दुर्गंधी. पण हाती काय येतं ? साधं पोटही भरू शकत नाही इतके कष्ट. अपमान, अवहेलना आणि तिरस्कार.
म्हणून नव्या पिढीने बुडणाऱ्या सूर्याकडे पाठ फिरवून शिक्षणाची कास धरत फुले -शाहू -आंबेडकरी विचारांची रुजवन करीत उगवणाऱ्या सूर्याची वाट धरली पाहिजे. कवीने देखील तोच मार्ग पत्करला आहे.
स्वकीय दैववाद अन परंपरेच्या इतके आहारी गेली आहेत की ते या वाटेवर यायला तयार नाहीत. किंवा तसा विचार घरात कोणी मांडू गेल्यास____
'नवस करू नका ' म्हणतो '
तर बाप पेटून उठतो '
किंवा
' लोक म्हणू लागले
" तो पागल झाला
देवानं त्याला शिक्षा केली "
किंवा
' कसं व्हईल तुव्ह ?
देवावर तुव्हा
इसवास न्हयी '
ही परिस्थिती सर्वच जातीतील सुशिक्षतांच्या बाबतीत बघायला मिळते. अज्ञानी , अशिक्षित किंवा अल्पशिक्षित समूहातील किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती शिकल्यानंतर तो परिवर्तनवादाची रुजवन किंवा विवेकी विचारांची रुजवण आपल्या आप्तस्वकीयांमध्ये करू बघतो. परंतु हा समाज सहजासहजी त्याच्या विचारांना स्वीकारत नाही. प्रसंगी त्याला स्वकीयांकडून विरोध सहन करावा लागतो. तोच अनुभव कवीच्या वाटेला देखील आलेला आहे. तो स्वकियांना समजावणीच्या सुरात म्हणतो ' 'टाचे मारून पोट भरणे ' हेच जीवन नसतं. कोळम्यात कापणी सडते, तसं जीवन सडू देऊ नका.
आधुनिक काळात चांभारी काम करणाऱ्या समूहासमोर अनेक आव्हाने आहेत. विद्युत स्वयंचलित मोटार मुळे ' मोट ' कालबाह्य झाली. चामडी जोडे वाहना जाऊन त्यांची जागा प्लास्टिक जोडे- चपलांनी बुटांनी घेतली आणि या व्यवसायाला घरघर लागली. तसे असले तरी मोट गेली म्हणून रडत बसू नये. इंजिन मोटारीच्या नावानं बोटं मोडू नये. उगीचच प्लास्टिकला शिव्या देण्यात अर्थ नाही. उलट बरं झालं ' तुझं कुंपण उडालं ' असा सकारात्मक सल्लाही कवी द्यायला विसरत नाही. तो म्हणतो___
' तू जाऊ नकोस कुंडातून कुंडाकडे
जीवन नागडं नागडच राहील
आऱ्हाटीवरून उठून
बोराटीवर पडशील '
पुन्हा परंपरागत व्यवसायाकडे चांभारांनी न वळता विज्ञान आणि विवेकाची रांगोळी आपल्या घराभोवती काढली पाहिजे. तत्वाचे झाड दारासमोर लावलं तर त्याला मानव कल्याणाची फळं येतील. नव्या पिढीने हस्ती ऐवजी लेखणी हातात घेऊन तथागताच्या सम्यक दृष्टीने आपल्या उध्वस्त जीवनाचा इतिहास लिहावा. अशी माफक अपेक्षा कवीने या काव्यसंग्रहात व्यक्त केली आहे.
काव्यसंग्रह - रापी जेंव्हा लेखणी बनते
कवी - राम दोतोंडे
प्रथम आवृत्ती - १९७८
किंमत - ५० रुपये
परिचय - गणेश सूर्यवंशी
No comments:
Post a Comment