Sunday, 11 August 2024

आंबेडकरी चळवळीच्या व्यापकतेचा छोटेखानी दस्तावेज: खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ - गणेश सूर्यवंशी

आंबेडकरी चळवळीच्या व्यापकतेचा छोटेखानी दस्तावेज: 

खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ 

- गणेश सूर्यवंशी


भारतीय समाज व्यवस्थेच्या उतरंडीत पिचलेला सर्वहारा घटक आणि एकूणच सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक व राजकीयदृष्ट्या मागासलेल्या जनसमूहाच्या विकासाचा अजेंडा घेऊन त्यांच्या विकासासाठी बाबासाहेब हयातभर लढत राहिले. त्यासाठी विविध समित्यांवर काम करत असतांना त्यांनी अभावग्रस्तांचे प्रश्न समोर ठेवून लढा दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचे व एकंदरीतच आंबेडकरी चळवळीचे व्यापकत्व समजून घेण्यासाठी ही पुस्तिका पूरक आहे. बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेच्या पलीकडे रानावनात राहणाऱ्या आदिवासी जमातींच्या उत्थानासाठी आखलेल्या  व्युव्हरचनेचा उलगडा या माध्यमातून वाचकाला होतो.लेखिका सुनीता सावरकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधक विद्यार्थी आहेत. शिवाय पुरोगामी चळवळीतही त्या सक्रिय आहेत. चळवळीच्या निमित्ताने त्यांनी अनेक ठिकाणी दिलेल्या भेटी व संशोधनवृत्तीतून संकलित केलेले संदर्भ ही त्यांच्या लेखनाची जमेची बाजू आहे.  

जातीव्यवस्थेचे बळी ठरलेला  मागास समूह, भटके विमुक्त आणि आदिवासी जनसमूहाच्या प्रश्नांना  वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक, समता ,जनता ,बहिष्कृत भारत ही नियतकालिके चालवली. या माध्यमातून या समूहांच्या मागासलेल्या स्थितीवर व त्याच्या अभावग्रस्ततेच्या कारणांवर त्यांची लेखणी कडाडून प्रहार करत होती. या जनसमूहाच्या  सर्वंकष विकासाच्या  कार्यक्रमावरही  त्यांनी वृत्तपत्रीय लेख व आपल्या ग्रंथामधून व भाषणांमधून  वेळोवेळी प्रकाश टाकलेला आहे. या सर्व संदर्भ साधनांचा आधार घेत सुनीता सावरकर यांनी 'खान्देशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ' या छोटेखानी पुस्तिकेची निर्मिती केलेली आहे. बाबासाहेबांचा विषमता विरहित समाज निर्मितीचा विचार,   सामाजिक पुनर्बांधणीचा लढा आणि एकूणच आंबेडकरी चळवळ ही कशी सर्वव्यापी आहे, याविषयीचे चिंतन करण्यास भाग पाडणारी ही पुस्तिका आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जनता’ साप्ताहिकातून आदिवासींच्या स्थितीवर लिहिलेले लेख व केलेले कार्य  इथे केंद्रस्थानी आहेत. या लेखांमध्ये त्यांनी आदिवासी जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजना, आदिवासींना धान्य पुरवठा करणे,शेती कसणाऱ्या आदिवासी जनसमूहांना बियाणे मिळवून देणे , त्यांच्या उत्थानाकरिता फंड उभारणे इ. तसेच तत्सम कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे याबाबतचा तपशील इथे येतो. तसेच आंबेडकरी चळवळीची स्वातंत्र्य,  समता,बंधुता,  या तत्वांशी बांधिलकी आहे. चळवळीने  समाजातील सर्वहारा घटकाच्या उत्थानासाठी सातत्याने भूमिका घेतलेली आहे. हा या पुस्तिकेचा गाभा आहे. याशिवाय चळवळ पुढे घेऊन जाण्यास दलित,अस्पृश्य घटकांसोबतच आदिवासींचेही योगदान  तितकेच महत्वपूर्ण आहे, हा विचारही लेखिका मांडतांना दिसते. त्या म्हणतात की, 'आंबेडकरी चळ्वळीतील आदिवासींचे योगदान व चळवळीची भूमिका हा आंबेडकरी चळवळीचाच नव्हे, तर आदिवासींच्या इतिहास लेखनाचा एक महत्वाचा  भाग आहे.'  


याशिवाय त्यांनी या पुस्तिकेत महाराष्ट्रातील आदिवासी जमातींविषयीचा धावता आढावा घेत खान्देशातील आदिवासी भिल्ल समुदायाचा परिचय करून दिलेला आहे. त्यांच्या सामाजिक जीवनाचा परिचय व  ऐतिहासिक  पार्श्वभूमी मांडत ब्रिटिशांविरोधात भिल्ल समुदायाने दिलेल्या लढ्याचा देखील त्यांनी याठिकाणी वेध घेतलेला आहे. सोबतच ब्रिटिश काळात सामाजिक व राजकीयदृष्टया पिचलेल्या जमातींना प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा स्तर उंचावण्यासाठी गठीत झालेल्या ओ एच बी स्टार्ट समितीच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेबाबतचा तपशील लेखिकेने दिलेला आहे. त्यासाठी लेखिकेने जनता , बहिष्कृत भारत ही नियतकालिके व  चांगदेव खैरमोडे लिखित डॉ .भीमराव रामजी आंबेडकर चरित्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि ओ बी एच स्टार्ट कमिटी (अनिल शिनगारे), महाराष्ट्रातील आदिवासी (गोविंद गारे ), महाराष्ट्र राज्य गॅझेटीयर महाराष्ट्र :भूमी वलोक,(संपा.वि.का चौधरी ) इत्यादी संदर्भ साहित्याचा आधार घेत लेखन केलेले आहे. 

खान्देश परिसरातील सातपुडा पर्वत रांगेत वास्तव्याला असलेली भिल्ल जमात, गडद तपकिरी वर्ण, गोल गरगरीत चेहरा , रुंद व मोठा जबडा, अंगापिंडाने मजबूत शरीरयष्टी या शरीर विशेषांसोबतच त्यांचे सांस्कृतिक वेगळेपणही सांगायला त्या विसरल्या नाहीत. ब्रिटिशकाळात त्यांच्यावर झालेले आरोप व  तसेच सुधारणांबाबत झालेला विचारही याठिकाणी आलेला आहे. पेशवाईतील घटनांचाही आढावा पुस्तिकेत येतो. 

भिल्ल समाजाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी भारत सेवक समाजाचे सभासद  अमृतलाल ठक्कर यांनी भिल्ल सेवक समाज स्थापन केला. त्यासाठी त्यांनी मुंबईत फंड उभारून धान्य पुरवठा करण्याबाबत आखलेल्या योजनेची  'जनता' मुखपत्राने घेतलेली  दखल आणि त्याकार्यास मदतीचे केलेले आवाहन येथे ससंदर्भ आलेले दिसते. त्यात स्पष्ट म्हटले की , 'धनिकांनी व ज्यांना माणुसकीविषयी प्रेमाचा उमाळा वाटत असेल अशा लोकांनी आपल्या शक्तीप्रमाणे या अशा पवित्र कार्याला हातभार लावणे अत्यावश्यक झाले आहे. ' भिल्लांच्या सामाजिक प्रश्नांची आंबेडकरी चळवळीस असलेली जाणीव व आदिवासी भिल्लांचा आंबेडकरी चळवळीतील सहभाग याबाबतचा उहापोह अनेक संदर्भांसह पुस्तिकेत आलेला आहे. जसे- दलित परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनातील भिल्ल समूहातील स्त्री -पुरुषांचा सक्रिय सहभाग, स्वतंत्र मजूर पक्षाला त्यांचा असलेला पाठींबा, आघाडी चले  भीमराजा , पिछाडी दलितोकी फौजा ., यांसारख्या घोषणा , बाबासाहेबांच्या प्रेरणेने पुढे आलेले नेतृत्व , सभेत झालेले ठराव आदी गोष्टी तपशिलासह लेखिकेने मांडलेल्या दिसतात. आमदार दौलतराव जाधव, भाई पुनाजी लळींगकर , संपत सुरका पाटील, आदी व्यक्तींचे दिले आहेत. याशिवाय तळोदे जवळील ‘बहुरूपी’ गावातील राधीबाई, पोखीबाई,गुणाबाई,काशीबाई,नौकाबाई इत्यादी  भिल्ल स्त्रियांनी एक-एक आणा वर्गणी जमा करून 'जनता'  वृत्तपत्रास एक रुपया खास देणगी दिल्याचा संदर्भही इथे वाचावयास मिळतो. 

तसेच खान्देशातील धनजी बिऱ्हाडे, गुणाजी मास्तर, मेढे गुरुजी यांचेही संदर्भ येतात. पुनाजी लळींगकरांसारख्या चळवळीतील कार्यकर्त्याबद्दल वाचकास माहिती व अण्णा नेतकरांनी 'भिल्ल समाजाची रास्त तक्रार' या शीर्षकाखाली दलित भारत मध्ये लिहिलेला लेख वाचकास पुढील संदर्भ चाळण्यास प्रवृत्त करतो. एकनानेक दाखले असलेली   ही छोटेखानी पुस्तिका  डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने मानवी मूल्ये जोपासण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या आंबेडकरी चळवळीस तिच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त अर्पण केलेली आहे. डॉ पुष्पा गायकवाड यांची प्रस्तावनेने या पुस्तिकेस आणखी मोल प्राप्त झाले. अभ्यासकांसाठी  हा एक वैचारिक दस्तावेज ठरावा, यासाठी शुभेच्छा. 


ग्रंथ परिचय : गणेश सूर्यवंशी ,जळगाव 

पुस्तकाचे नाव : खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ 

लेखिका :सुनीता सावरकर 

प्रकाशक :लोकवाङ्मय गृह 

पृष्ठ संख्या :३५ 

किंमत : ३० रुपये 


Saturday, 10 August 2024

परिवर्तनाच्या वाटेवरची कविता : रापी जेंव्हा लेखणी बनते* *- गणेश सूर्यवंशी*

 *परिवर्तनाच्या वाटेवरची कविता : रापी जेंव्हा लेखणी बनते* 

 *- गणेश सूर्यवंशी* 



प्रस्थापित समाज व्यवस्थेबद्दलचा असंतोष आणि विद्रोह भारतीय दलित साहित्यात आहे. ज्या समाजव्यवस्थेने अभावग्रस्त समूहाचे माणूसपण नाकारले.  त्यांचे नैसर्गिक अधिकार आणि हक्क नाकारलीत, पदोपदी शोषण केले,  प्रगती आणि विकासाची कवाडे त्यांच्यासाठी बंद केली,   ज्ञानापासून त्यांना वंचित ठेवले ती समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था,  वर्णव्यवस्था दलित साहित्याने नाकारली. ज्या - ज्या घटितांमुळे प्रवाहापासून लांब राहिलो ती सर्व घटीते,  ग्रंथ आणि व्यवस्थेबद्दल दलित साहित्याने तीव्र असंतोष व विद्रोह व्यक्त केला आहे. हजारो वर्षांपासून जो जात व वर्ग समूह मागासलेला राहिला.  त्याच्या मागासलेपणासाठी इथली व्यवस्था सर्वार्थाने कारणीभूत आहे. या व्यवस्थेने व व्यवस्थेच्या वारसदारांनी या समूहाला वंचित ठेवले, त्याची नाकेबंदी केली,  त्यांना नाकर्ते ठरवलंय,  त्यांना अज्ञानात ढकलले, त्यातून बाहेर पडता येणार नाही अशी तजवीज केली.  

पर्यायाने हा समूह दिवसेंदिवस हतबल झाला;  आत्मविश्वास गमावून बसला.  सामाजिक,  राजकीय,  आर्थिक,शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच नैसर्गिक हक्कांपासून दूर राहिला.  त्यामुळे त्याच्या वाटेला अभावग्रस्त जगणे आले. मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी संघर्ष करावा लागला.  लाचारी पत्करावी लागली.  त्यात आजचा ओ.बी.सी, एस.सी., एस. टी, भटका - विमुक्त समूहाचा समावेश करता येईल. रूढीच्या जोखडाखाली हा समूह दाबला गेला.  अंधश्रद्धेच्या खाईत ढकलला गेला.  सन्मानाचे जगणे त्याच्या वाट्याला येऊ दिले नाही. त्याला दर्जाहीन व अस्वच्छ कामे करण्यास भाग पाडले जाऊ लागले. खान-पान राहणीमानाचा दर्जा राखण्यासाठी आवश्यक बाबींचा अपूर्ततेमुळे तो अस्पर्श ठरला.  ही अस्पृश्यता वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या जातीय उतरंडीमुळे निर्माण झाली.  ही उतरंड खालच्या थरातील व्यक्तीने वरचा थर गाठूच नये,  अशीच  तयार करण्यात आलेली होती. त्यामुळे हा समूह सर्वार्थाने मागे राहिला. अशा या समूहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व कार्यातून आत्मभान येऊन तो जागा होऊ लागला.  स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत असताना त्याचं नाकारलेपण त्याच्या लक्षात आलं.  बाबासाहेबांनी दिलेला ' शिका,  संघटित व्हा,  संघर्ष करा '  चा कित्ता तो गिरवू लागला.  महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य व विचार वाचू लागला.  शिक्षणाने जागृत झालेली ही पिढी आपल्या समाजाकडे विवेकाने बघू लागले.  आपला भूतकाळ , वर्तमान आणि भविष्याबद्दल बोलू लागली.  त्यांचं हे लेखनच दलित साहित्य म्हणून सर्व परिचित आहे . खरंतर हे आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य आहे.  या दलित साहित्य प्रवाहातील एक महत्त्वाचा कवी म्हणून राम दोतोंडे यांच्याकडे पाहिले जाते. 


राम दोतोंडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील.  औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून ते पदवी व पदव्युत्तर झाले. महाविद्यालयीन जीवनातच दलित चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. परिवर्तनाची कास धरली.  महाविद्यालयीन जीवनातच त्यांचा ' रापी जेव्हा लेखणी बनते ' हा काव्यसंग्रह 1978 साली प्रकाशित झाला . चांभार जातीत जन्मल्यामुळे या जातीच्या वाटेला आलेल्या अवहेलना व दुःख, वेदना त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहात प्रकर्षाने आल्या आहेत. वडील स्वतःचा चांभारकाम करीत असल्याने व स्वतः देखील हे काम करण्याचा अनुभव असल्याने या व्यवसायासंबंधीच्या अनेक गोष्टी त्यांच्या कवितेत बघायला मिळतात. 

ज्यांच्यासाठी आपण बूट - चप्पल शिवून देतो. तेच लोक मात्र आपल्याला तुच्छ लेखतात.  त्यांना आपण शिवलेल्या मोटेतलं पाणी चालतं, मात्र आपला स्पर्श चालत नाही.  हा अनुभव मन विदीर्ण करणारा आहे.  आपल्याकडून चप्पल शिवून घेणारा माणूस आपल्याला चपलेपेक्षा तुच्छ लेखतो.  त्यापेक्षा हे कामंचं बंद केलं तर ? ज्या व्यवसायामुळे आपल्याला व्यवस्था स्वीकारत नाही. ते काम नाकारयचं आणि शिक्षण घेऊन सन्मानाचं काम करायचं.  सन्मानाचं जीवन जगायचं.  या विचाराने पेटून उठलेला कवी हातातली रापी टाकून लेखणी हातात घेतो. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिक्षणाची सन्मानजनक जगण्याची कास धरतो. हा कवी आपल्या इतिहासाबद्दलच्या चिंतनात गढून जातो . स्वकीयांनी शिक्षणाची कास धरून प्रवाहात येण्यासाठी धडपडतो.  त्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो.  त्याचा हा संघर्ष दुहेरी आहे. पहिला संघर्ष हा कुटुंब व आप्त स्वकीय सोबतचा आहे.  आणि दुसरा म्हणजे व्यवस्थेसोबतचा.  हा संघर्ष त्याच्या कवितेतूनही स्पष्टपणे उमटून पडतो. कवी म्हणतो ___


"हे बाबा ,

रापीने कातडे कापण्याऐवजी 

का कापले नाही 

इथल्या रूढींचे हात ?"


ज्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या रुढी परंपरांच्या जोखडामुळे त्याच्या वाट्याला दैन्य आलेलं आहे. त्या रुढी - परंपरा आपल्या आधीच्या पिढ्यांनी कधीच नाकारल्या असत्या तर कदाचित आजचे आपले जगणे वेगळे असते. असा विचार त्याच्या मनात येतो. आपल्या शोषितपणाच्या कारणांचा शोध घेताना त्याला त्याचं नेमकं उत्तर सापडतं तो म्हणतो, 


'मला झोपवल्या गेलं होतं 

मनुस्मृतीची टिपरी पाजून '


पण आता असे झोपून चालणार नाही. शिक्षणाने आत्मभान आलेला कवी पुढे म्हणतो __


'आता मी जागलो आहे'


त्याच्या जाती व्यवसायातील अनेक हत्यारांचा समर्पक वापर कवितेत केलेला दिसतो आहे.  आरी,  रापी,  पाळू,  एकलई , खिळे , रिबीट, वादी, मोट, चामडे,  पट्टी, हस्ती ही चांभारी व्यवसायाशी संबंधित हत्यारे आहेत. या हत्यारांचा व्यवस्था उध्वस्त करण्यासाठी नेटका वापर करता आला असता . पण तसे झालं नाही. याची खोच कविच्या मनात आहे. 


' वादीने तळ शिवण्याऐवजी 

का शिवले नाहीत 

येथल्या मना - मनात समता स्वातंत्र्याचे जाळे ? '


तसेच 


'हस्ती पाळूचा उपयोग 

तळ ठोकण्यासाठी

 न करता 

तिथल्या जातीचे टाळकं 

ठोकून काढण्यासाठी 

का नाही केलास ?


असा मार्मिक सवाल तो आपल्या पूर्वजांना करतो. दलित समूहाला सर्वहारा करणारी व्यवस्था ही___


' गाढवावर सामान लादावं 

तशी लादली गेली ही तुझ्यावर 

 तुला गुलाम बनवण्यासाठी '


हा त्याच्या मनात खदखदणारा असंतोष आहे.  यात त्याला आलेलं इतिहासाचे भान आहे.  म्हणून पुढच्या पिढीला उद्देशून तो म्हणतो ___


' आता तुझ्या पोरानं 

हस्ती ऐवजी 

लेखणी हातात घ्यावी '


पुढच्या पिढीने पुन्हा कुंडाकडून कुंडाकडे जाऊ नये, असा सल्लाही कवी द्यायला विसरत नाही. चर्मकार समाज आजही बऱ्याच अंशी रूढी परंपरेच्या गर्तेत अडकला आहे. परंपरा प्रियतेमुळे तो अद्यापही शोषणमुक्त होऊ शकला नाही. 


' कित्येक वर्षांच्या ढीगाखाली 

चेंगरून गेलाय 

हा चांभार समाज '


त्याची आसवं अंधारात निघतात आणि अंधारातच गडप होतात. या दुःखाचे , आसवांचे अवशेष कुणालाच मिळत नाहीत. अंधार सर्वांग पसरलेला आहे. महार जातीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पायवाटेवर जाण्याचे ठरवले आणि हिंदू धर्म परंपरेतील वर्ण व्यवस्थेच्या जाचातून मुक्त होऊन बौद्ध झाला. परंतु चर्मकार समाज देखील जातीय उतरंडीमध्ये तितकाच  पिचलेला होता.  विषमतेचे चटके त्याला देखील तितकेच बसलेले होते तरीही तो धर्मांतरित का झाला नाही ?  विषमतेचं दुःख पचवत तो अद्यापही याच परंपरांच्या विळख्यात अडकून पडलेला आहे.  याची सल कवीचा मनात आहे. म्हणून कवी म्हणतो ___


' प्रेरणा दिली एका महामानवाने 

 रापीला लेखणी बनविण्याची 

 पण तेव्हा हा झोपेतच राहिला

 पांघरून म्हसडी रुढीची '


बाबासाहेबांनी दिलेली धम्माची वाट ही खऱ्या अर्थाने विज्ञानाची,  शोषणमुक्तीची वाट होती.  पण चर्मकार समाज मात्र गावगाड्यांच्या रुढीमध्ये गुरफटून राहिला,  ही बोच कवीला सतावते. कारण जातीयतेची उतरंड निर्माण करायला इथली धर्म संस्कृती कारणीभूत आहे. इथली वर्णव्यवस्था कारणीभूत आहे. 


'हिंदू संस्कृतीच्या 

वीर्यातून 

जातीयतेला  दिवस गेलेत त्यातूनच निर्माण झालोय 

मी 

रस्त्याच्या कडेला बसून 

ऐरण हस्ती सोबत घेऊन 

ठाकठूक करणारा '


आपल्या वाटेला जे दुःख,  अपमान,  वेदना,  शोषण,  बंधने अज्ञान , अंधश्रद्धा , उपेक्षा या सर्व बाबी आलेल्या आहेत यांच्या मुळाशी केवळ इथली धर्म व्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेली जातीय उतरंड आहे . मी व माझा समाज रस्त्याच्या कडेला बसून जे अस्वच्छ काम करतो. ते काम देखील जातीमुळे माझ्या वाटेला आलेले आहे.  उपजीविकेचे साधन असलं तरी ते सन्मानजनक नाही हे निश्चित. 


' पाचव्या वर्गात होतो तेव्हाच 

 बापानं आरी - तळ दिलं  हातात 

______________________

______________________


मी शिकत गेलो शाळेत 

 इतिहासाच्या घडामोडी 

घरी चामड्याची चिवडा - चिवडी 

 असंच वय वाढत गेलं  

आयुष्य घटत गेलं '


आरी ,रापी ,  ऐरण , पाळू, सुई -दोरा हा चांभाराचा संसार असतो. सोबतीला चामडे,  वादी अन कुंडातल्या पाण्याची दुर्गंधी. पण हाती काय येतं ? साधं पोटही भरू शकत नाही इतके कष्ट.  अपमान,  अवहेलना आणि तिरस्कार.

म्हणून नव्या पिढीने बुडणाऱ्या सूर्याकडे पाठ फिरवून शिक्षणाची कास धरत फुले -शाहू -आंबेडकरी विचारांची रुजवन करीत उगवणाऱ्या सूर्याची वाट धरली पाहिजे. कवीने देखील तोच मार्ग पत्करला आहे. 

स्वकीय दैववाद अन परंपरेच्या इतके आहारी गेली आहेत की ते या वाटेवर यायला तयार नाहीत.  किंवा तसा विचार घरात कोणी मांडू गेल्यास____


'नवस करू नका ' म्हणतो '

 तर बाप पेटून उठतो '


किंवा


' लोक म्हणू लागले 

" तो पागल झाला 

 देवानं त्याला शिक्षा केली "


किंवा


' कसं व्हईल तुव्ह ?

 देवावर तुव्हा 

इसवास न्हयी '


ही परिस्थिती सर्वच जातीतील सुशिक्षतांच्या बाबतीत बघायला मिळते.  अज्ञानी , अशिक्षित किंवा अल्पशिक्षित समूहातील किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती शिकल्यानंतर तो परिवर्तनवादाची रुजवन किंवा विवेकी विचारांची रुजवण आपल्या आप्तस्वकीयांमध्ये   करू बघतो.  परंतु हा समाज सहजासहजी त्याच्या विचारांना स्वीकारत नाही.  प्रसंगी त्याला स्वकीयांकडून विरोध सहन करावा लागतो. तोच अनुभव कवीच्या वाटेला देखील आलेला आहे. तो स्वकियांना  समजावणीच्या सुरात म्हणतो ' 'टाचे मारून पोट भरणे ' हेच जीवन नसतं. कोळम्यात कापणी सडते, तसं जीवन सडू देऊ नका. 

आधुनिक काळात चांभारी काम करणाऱ्या समूहासमोर अनेक आव्हाने आहेत. विद्युत स्वयंचलित मोटार मुळे ' मोट ' कालबाह्य झाली.  चामडी जोडे वाहना जाऊन त्यांची जागा प्लास्टिक जोडे-  चपलांनी बुटांनी घेतली आणि या व्यवसायाला घरघर लागली. तसे असले तरी मोट गेली म्हणून रडत बसू नये. इंजिन मोटारीच्या नावानं बोटं मोडू नये. उगीचच प्लास्टिकला शिव्या देण्यात अर्थ नाही.  उलट बरं झालं ' तुझं कुंपण उडालं ' असा सकारात्मक सल्लाही कवी द्यायला विसरत नाही. तो म्हणतो___

' तू जाऊ नकोस कुंडातून कुंडाकडे 

जीवन नागडं नागडच राहील 

 आऱ्हाटीवरून उठून 

बोराटीवर पडशील '

पुन्हा परंपरागत व्यवसायाकडे चांभारांनी न वळता विज्ञान आणि विवेकाची रांगोळी आपल्या घराभोवती काढली पाहिजे. तत्वाचे झाड दारासमोर लावलं तर त्याला मानव कल्याणाची फळं येतील.  नव्या पिढीने हस्ती ऐवजी लेखणी हातात घेऊन तथागताच्या सम्यक दृष्टीने आपल्या उध्वस्त जीवनाचा इतिहास लिहावा. अशी माफक अपेक्षा कवीने या काव्यसंग्रहात व्यक्त केली आहे. 


काव्यसंग्रह - रापी जेंव्हा लेखणी बनते

कवी - राम दोतोंडे

प्रथम आवृत्ती - १९७८

किंमत - ५० रुपये

परिचय - गणेश सूर्यवंशी

Monday, 22 August 2016

मायबोलीतले करिअर :मान्यवरांचे मार्गदर्शन, संकलन स्त्रोत -दैनिक लोकसत्ता

मायबोलीतले करिअर मराठी भाषा घेऊन नेमके करिअर कसे आखायची अशी चिंता अनेकांना सतावते. याच प्रश्नांवर मार्गदर्शन संकलन - राधिका कुंटे | February 22, 2013 1:08 AM 0 0 Google +1 13 मराठी भाषा घेऊन नेमके करिअर कसे आखायची अशी चिंता अनेकांना सतावते. याच प्रश्नांवर मार्गदर्शन करताहेत मराठीतले प्राध्यापक प्रा. पद्मजा कुलकर्णी, गुरु नानक खालसा महाविद्यालय भाषा ही माणसं बोलत राहण्यानं समृद्ध करत असतात. आता प्रश्न आहे मराठी भाषेचा. मराठी भाषेलाही विरल उत्तर लागू पडतं. त्यामुळं पुढील भविष्यात चिंता नव्हे तर चिंतन करायला हवं. मौखिक, लिखित अवस्थेत ठेवायची असेल तर ही जबाबदारी ती भाषा जे बोलतात, मातृभाषा त्यांच्यावर आहे. त्यासाठी आपण सर्वानी प्रयत्नपूर्वक त्यातून बोलण्याचा आणि शक्य तिथं मराठीतून लिहिण्याचा, उदाहरणार्थ अर्जलेखन, निवेदनपत्र, पत्रलेखन, आमंत्रण पत्र इत्यादी मराठीतून लेखन केल्यास भाषा वाढीस लागेल. भाषा ही नेहमी अनुकरणातून ऐकून शिकली जाते. त्यामुळं आपण मोठय़ा माणसांनी उच्चारलेले मराठी शब्द लहान मुलांच्या कानावर सहज आणि सतत पडल्यास उच्चारणाचा सराव होईल. दैनंदिन जीवनाशी निगडित या शब्दांचा त्यांना सराव होईल, ते सवयीचे होतील. सवयीनं उच्चारले जाऊन लक्षात राहतील. पर्यायी शब्दांची सवय मोडून काढता येईल. बाह्य़ समाजात वावरताना मराठीचा वापर जाणूनबुजून करायला हवा. तो तसा सातत्यानं केला गेला तर आपण भाषेशी सतत जोडले जाऊ. साहित्य, कला, चित्रादी माध्यमांतील कला भारतीची जबाबदारी हे मराठीच्या वाढीस जबाबदार ठरतात. वृत्तपत्रांतील व्याकरणकदृष्टय़ा समृद्ध भाषेमुळं योग्य भाषेचं ज्ञान लोकांना मिळेल. संवाद हे सगळं झालं तर आपण पुढं काय या काळजीतून मुक्त होऊ. मातृभाषेसाठी आपण एवढं करू शकतो. करिअरसंधीच्या दृष्टीनं मराठीचा विचार करायचा झाल्यास विविध पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ- शिक्षक-प्राध्यापक होता येईल. सरकारी सेवा, एलआयसी, बँक आदींत जाता येईल. संगणकीय ज्ञानाच्या अनिवार्यतेमुळं मराठी-हिंदीत माहिती संकलक होता येईल. पत्रकारिता, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, निवेदन, लेखनादी क्षेत्र निवडता येईल. भाषांतर क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होतेय. आमच्या महाविद्यालयात भाषांतरविषयक अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार चालू आहे. भाषांतरकार हे खाजगी कंपन्यातसुद्धा लागतात. भाषा ही सुसंवादासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी आहे. इतर शाखा विषय शिकवण्यासाठी भाषेवर प्रभुत्व लागतंच. या सगळ्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा. तो नसेल तर भाषा कशी येणार. तो असेल तर सहजपणं विषय समजून घेऊन आपण समोरच्यावर प्रभाव पाडू शकतो. प्रा. लीना केदारे, मराठी विभागप्रमुख, रामनारायण रुईया महाविद्यालय फक्त मराठीच नाही, तर कुठल्याही विषयात केवळ पदवी प्राप्त केल्यानं नोकरी लागत नाही, हे वास्तव आहे. मग मराठीत पदवी संपादनानंतर कोणते करिअर निवडाल, हा प्रश्न का उभा राहावा? जो विषय आपल्याला आवडतो, ज्याचं नीट आकलन होतं, त्यात कौशल्य आत्मसात करता येतं, त्यात पदवी मिळवावी. साहित्य आणि भाषेमुळं आपल्या जाणिवा समृद्ध होतात. भाषा विचार करायला शिकवते. तिच्याद्वारे विषयाचं ज्ञान मिळतं. आकलन होऊन अभिव्यक्त होता येतं. त्यासाठी मातृभाषा चांगली येणं गरजेचं आहे. कोणत्याही विषयाची मूलभूत आवड असली, तर त्याला न्याय देता येईल. शिक्षण क्षेत्रातले अनेक जाणकार मातृभाषेतून शिक्षण देण्यावर विशेषत: शालेय स्तरावरील शिक्षणावर भर देतात. तसं शिकून सव्‍‌र्हाईव्ह कसं होणार? असे काहींना वाटते. पण कोणत्याही वयात, कोणत्याही टप्प्यावर कोणतीही भाषा शिकता येते, असं भाषाशास्त्रज्ञ सांगतात. माध्यमाचा शिक्षणाशी संबंध नसतो. मातृभाषेतून शिकणं हे उपकारक आहे, असं सांगितलं जातं. म्हणूनच विद्यापीठ पातळीवर इंग्रजी विषय सोडून इतर विषय मराठीतून लिहिण्यास परवानगी आहे. मराठीतून शिकलो तरी व्यवहाराला इंग्रजी भाषा लागतेच. तितके इंग्रजी आपण शिकू शकतो. एके काळी कमी गुण मिळणारे विद्यार्थी कला शाखा निवडत असत, पण आता जाणीवपूर्वक ही शाखा निवडणारे हुशार विद्यार्थीही पुढं येत आहेत. आमच्या महाविद्यालयात मराठीपण टिकवणारं वातावरण आहे. आमच्या संस्थेच्या ध्येयधोरणातून, उपक्रमांतून ते दिसतं. आमच्याकडे कला शाखेत मराठीतून शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक भरणपोषण होतं. मराठी साहित्य जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन देतं. त्यामुळे सामाजिक भान येतं. मराठीच्या अभ्यासक्रमाचा दर्जा चांगला असला तरी अजून बदलाला वाव आहे. २०२० पर्यंत केवळ महाराष्ट्रातच नाही तर मराठीची नाममुद्रा जगभर उमटू शकेल. परदेशीयांना भारतीय संस्कृतीचं अतीव आकर्षण वाटतं. ते आणखी वाटू शकतं. मराठीविषयी आस्था वाढू शकते. मराठी साहित्याचा अभ्यास केला जाऊ शकेल. आपल्याकडच्या अनेक अमराठी विद्यार्थी आणि सामान्यांना मराठीची आवड असल्यानं ते मराठी शिकताहेत. अभ्यास विषय कोणता ते महत्त्वाचं आहे. त्यातून मिळणारा आनंद आणि होणारं आकलन यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. समाजशास्त्र, मानसशास्त्रादी जीवनाशी निगडित सगळ्या विषयांना स्पर्श करते. ते फक्त काल्पनिक जग नाहीये. तुम्ही जे शिकता त्यावर विश्वास असायला हवा. विविध समूह शिक्षणाकडे वळत असल्यानं मराठीची गरज आहे. भाषांतरित कलाकृतींना खूप मागणी आहे. मराठीचं कसं होणार, ही चिंता करायला नको. प्रोफेशनल अभ्यासक्रम, स्किल ओरिएंटेड शिक्षणाची आज गरज आहे. जो पदवीधर या प्रकारचे शिक्षण घेतो. त्यामुळं समाजाला हा प्रश्न पडतो की, याचं पुढं काय? त्यासाठी समाज सशक्त ज्ञानाच्या पायावर उभा राहायला हवा. तरच हे टिकवलं जाईल. फक्त मराठी नव्हे तर प्युअर सायन्सेस इत्यादींसाठीही ते करावं. माणूस म्हणून जे जगणं आहे, अमूर्त पातळीवरचं समजणं हा भाग साहित्य देतं. त्यामुळं विचारांची क्षमता वाढते. मराठी विषय घेतल्यास बँकिंग, स्पर्धा परीक्षा, शिक्षकी पेशा, समाजसेवा, संशोधन, भाषाविज्ञान, ग्रंथालयशास्त्र, सर्जनशील लेखन, आकाशवाणी, नाटय़क्षेत्रादी अनेक करिअर ऑप्शन आहेत. मराठी भाषा दीन नाहीये, परंतु एकूणात मराठीपण टिकवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आणि समाजाचे पाठबळही हवे. डॉ. गीता मांजरेकर, मराठी विभागप्रमुख, महर्षी दयानंद महाविद्यालय मराठी साहित्य हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बरेचसे विद्यार्थी असे आहेत की, ज्यांना अन्य विषय जमत नाही, ते मराठी विषय घेतात. त्यांना मराठीची आवड नसते. केवळ परीक्षार्थी या दृष्टिकोनातून ते साहित्य अभ्यासून कसेतरी पास होतात. ‘एमएससीआयटी’सारख्या परीक्षा देऊन डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात. पुढं मराठी साहित्याशी त्यांचा काही संबंध राहत नाही. मराठी विषयात थोडा रस असणारा विद्यार्थी अध्यापन, प्रसारमाध्यमात शिरण्याचा प्रयत्न करतो. काही थोडे विद्यार्थी एलएलबी, एलएलएम घेऊन बँका-सरकारी खात्यात लीगल ऑफिसर म्हणून काम करतात. अधिक चिकाटी असणारे विद्यार्थी एमपीएसससी-यूपीएससीच्या परीक्षा देतात. त्यात मराठी विषय असतो. मराठीतून पेपर लिहिता येतो. त्यांनतर ते सरकारी सेवेत रु जू होतात. थोडे विद्यार्थी ग्रंथालयशास्त्र अभ्यासून पुढं ग्रंथपाल होतात. काहीजण विशेषत: मुली हिंदी-मराठीच्या शिकवण्या घेतात. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिकवणी गरजेची झाली आहे. काहीजण संगणकावर मराठी अक्षरजुळणीत तरबेज होतात. ते प्रकाशन व्यवसाय, मुद्रितशोधन, संपादकीय कामात मदत करतात. आमच्या कॉलेजमधले काही मुलगे पोलीस, बीईएसटी, महानगरपालिकेत नोकरी करतात. तेथील कारभार मराठीतून चालतो. तिथं मराठी पदवीधर असल्यास प्रमोशन मिळतं. पदव्युत्तर शिक्षण असल्यास इन्क्रिमेंट मिळतं. क्वचित काहीजण सर्जनशील लेखनाकडं वळतात. नाटककार, कथा- कादंबरी-कवितालेखन, मालिकांसाठी संवाद-पटकथालेखन करतात. कुणी रेडिओ जॉकी, निवेदन-सूत्रसंचालन करतात. कुणी एमएसडब्ल्यू होऊन समाजसेवक होतात. समाजातील लोकांशी संवाद साधण्यात त्यांना मराठी भाषेचा उपयोग होतो. आता भाषांतरकार म्हणूनही चांगली कामं मिळताहेत. त्यासाठी व्यवस्थित अभ्यासक्रम आखायला हवा. विविध ज्ञानशाखांमधली पुस्तकं मराठीत उपलब्ध व्हायला हवीत. कारण आपण जे सर्वशिक्षण म्हणतो आहोत, ते घेऊ इच्छिणाऱ्या समूहाला इंग्रजीतून त्या विषयांचं आकलन होण्यापेक्षा ते मराठीतून पटकन होऊ शकेल. त्यासाठी भाषांतराच्या कामाची योजना शासनानं आखल्यास काही विद्यार्थ्यांना काम मिळू शकेल. विविध मराठी परिभाषिक कोशांचं काम करावं लागेल. आहेत ते कोश अपडेट करण्याची गरज असून त्याअनुषंगानं काहींना काम मिळेल. दूरचित्रवाणीवरील वाहिन्या आणि मराठी शाळांची संख्या वाढल्यास अधिक संधी उपलब्ध होतील. संगणक आणि तंत्रज्ञानात मराठी भाषा अधिक जोमानं यायला हवी. त्यामुळं तिचा प्रसार आणि प्रचार अधिक होऊ शकेल. भाषेकडं बघण्याची दृष्टी आता बदलायला हवी. विविध व्यवसाय, जाती-पोटजाती यांच्यातील शब्द सामावून घेण्याची गरज आहे. त्या संदर्भातले टॅब्यू बदलले तर भाषाही वाढणार आहे. तसं न केल्यास ती विकसित होणार नाही. आम जनतेचे शब्द मुख्य प्रवाहात यावेत. तरच भाषेची अभिवृद्धी होईल. त्यासाठी कोणताही परीघ न आखता दृष्टी संकुचित ठेवली नाही तर मराठीला बरे दिवस येऊ शकतील. – प्रा. वैशाली जावळेकर, मराठी विभागप्रमुख, डी. जी. रुपारेल महाविद्यालय मराठी घेणाऱ्यांना पुढचा पर्याय काय, हा विचार करताना शिक्षणव्यवस्थेचा विचार करावा लागेल. करिअर ऑप्शन्समध्ये कालही जे पर्याय होते, त्यात फारशी वाढ झालेली नाही. अध्यापन, पत्रकारिता, प्रसारमाध्यमं इत्यादी पर्याय पटकन पुढं येतात. नोकरीचं क्षेत्र म्हणून विकास झालेला नाही. काल हा प्रश्न नव्हता. फाइन आर्ट, प्युअर भाषांनी आपली प्रतिष्ठा गमावलेय. त्यांचा नोकरीशी संबंध जोडतो आणि मग असं वाटतं की हा विषय आपल्या उपयोगाचाच नाही. हा संबंध जोडायचा का, हा प्रश्न आहे. मराठीचा विद्यार्थ्यांला साहित्य-भाषा शिकल्यानं संवेदनशीलता येते. नोकरीच्या बाबत विचार करायचा झाल्यास प्रसारमाध्यमं, पत्रकारिता इत्यादींसाठी काम करणाऱ्याला आपण सक्षम करू शकतो. त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित व्हायला मदत होऊ शकते. आताचं विश्व स्वतंत्र ज्ञानावर आधारित आहे. त्यामुळं भाषेपुढं आव्हान आहे ते तंत्रज्ञानाचं. त्यासाठी भाषा विकसित व्हायला हवी. मात्र इथं भाषा संवादी होत नाही. कॉल सेंटरमध्ये वगैरे वाचिक भाषा असते. त्याला भाषा विषय तोंड देऊ शकत नाही. हे आपल्या हातात नाही तर एकूण व्यवहार आणि भाषेच्या व्यवहारातील उपयोगावर अवलंबून आहे. रोजच्या व्यवहारात भाषा टिकायला हवी. ही भाषा टिकवणं ज्यांच्या हातात आहे, त्या विद्यार्थ्यांच्या साहित्यविषयक क्षमता कमी होताहेत. साहित्याच्या अभ्यासात खोलात जाऊन ते समजून घ्यायची वृत्ती दिसत नाहीये. नोकरी मिळवण्यासाठी संवेदनशीलता, इतर विद्याशाखांचं ज्ञान, सामाजिक भान हे महत्त्वाचं ठरतं. हे मोठं आव्हान असून त्याला कसं सामोरं जायचं हा भाषा शिक्षकासमोरचा एक प्रश्न आहे. साहित्य आपल्याला विचारशील करतं. पण आजच्या व्यवस्थेचा विचार करता विचारशील माणूस व्यवस्थेला चालणार नसेल तर काय करायचं? हे सगळ्याच लोकांचं होतंय. मुळात ‘मराठी भाषा दिवस’ आपण साजरा करतो. हे साजरा करणं कशासाठी आहे? मराठी भाषा संपलेय म्हणून की तिच्याबद्दल आपण सजग आहोत म्हणून? ते ठरवायला हवं. व्यवहारात, महाविद्यालयातील सांस्कृतिक-भाषिक अवकाशात मराठी भाषेवर विविधांगी परिणाम होतोय. अभ्यासक्रमात मराठी शिकवायचं तर त्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात कसा होऊ शकेल? यावर विचार व्हायला हवा. बौद्धिकदृष्टय़ा कितीजणांना संधी मिळते? याचं भान ठेवायला हवं. या साऱ्याला समीक्षेची जोड हवी. एकूणात मराठीला टिकवून ठेवण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेऊन एकत्रित प्रयत्न होणं आवश्यक आहे. ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा. First Published on February 22, 2013 1:08 am Web Title: Teachers Guidance On Career In Marathi Language

Saturday, 20 August 2016

संत साहित्याचे सामाजिक योगदान- डॉ.रामचंद्र देखणे

संत साहित्याचे सामाजिक योगदान on: May 01, 2016In: रूपगंधNo Comments अध्यात्मिक तत्त्वचिंतनाची परिणती सामाजिक मूल्यांमध्ये घडविणाऱ्या संत विचार परंपरेचे चिंतन करताना असेच म्हणावे लागेल की, सामाजिक विषमतेने व्यथित झालेल्या कारुण्याचा पहिला उद्‌गार संत ज्ञानदेवांच्या रूपात प्रगटला. नाथांच्या रूपात त्याचा प्रतिध्वनी उमटला आणि तुकोबारायांच्या रूपात सामाजिक विकृतींना फटका देत मानवी मनात आणि समाजजीवनात आत्मविश्वाूस आकारला. संतांची वाङ्‌मयरचना हे मराठी सारस्वताचे एक अनमोल लोकधन आहे. संतांची भूमिका ही केवळ तत्त्वचिंतकाबरोबर लोकशिक्षकाची आहे. जागल्याची आहे, पूर्वी खेडेगावात आलेले पीकपाणी राखण्यासाठी जागले ठेवत असतं. ते स्वत:ही जागे राहायचे आणि रात्रभर गावालाही जागते ठेवायचे. अज्ञान, अविद्या, विकृती, विकार यांच्या झोपेतून संत स्वत: नित्य जागे आहेत आणि जागल्याची भूमिका येऊन. उठा उठा जी मायबाप। कशी लागली झोप। उठा की जी मायबाप।। असे सांगत सांगत समाजालाही खडबडून जागे करीत आहेत. सामाजिक आणि आध्यात्मिक जागृती हेच संतांच्या वाङ्‌मयीन निर्मितीचे मुख्य प्रयोजन ठरते. संत हे साक्षात्कार होते. त्यांना आत्मानुभूती लाभली होती. एकच आत्मतत्त्व सर्व वास्तूमात्रात भरून राहिल्याने ब्रह्मभाव एका व्यक्तीत सीमीत न राहता साऱ्या विश्वातला कवटाळण्यास सिद्ध होतो. सर्वाभूती हाच भगवद्‌भाव जागा व्हावा, त्यातून परस्पर बंधुभाव, एकात्मता नांदावी ही जगत्‌ उद्धाराची तळमळ त्यांच्या अभंगवाणीतून ठायीव्यक्त होते. स्वत: जीवनमुक्त अवस्थेला गेलेल्या संतांना ही जागृती का घडवायची आहे हे सांगताना तुकोबाराय म्हणतात. उपकारासाठी बोलो हे उपाय। येणेविण काय चाड आम्हा ।। बुडते हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणवोनि ।। जागृती घडविणे हेच प्रबोधनकाराचे खरे कार्य होय. संत हेच श्रेष्ठ प्रबोधनकार आहेत. म्हणूनच कधी विनंती करून, कधी भीती दाखवून, कधी येणाऱ्या गंभीर परिणामांची जाणिव करून देऊन, तर कधी रागावूनसुध्दा ते समाजाला जागेच करीत आहेत. आमच्या उपनिषद दृष्ट्या ऋषींनीही “उत्तिष्ठत्‌ जाग्रत्‌ प्राप्य वरान्निबोधत्‌’ असा उपदेश करून प्रत्येक अवस्थेत जागे रहायला सांगितले आहे. कीर्तन हे तर जागृतीचे प्रभावी माध्यम आहे. ईश्व‌री तत्त्वाबरोबरच मानवी मूल्यांना जागे ठेवणे हेच कीर्तनाचे वैशिष्ट्य. संतांनी जागृतीसाठी हेच माध्यम निवडले. बाह्यरंग आणि अंतरंग, प्रपंच आणि परमार्थ, व्यक्ती आणि समाज या सर्वांचा एकत्रित विचार करून मानवी मनाला आणि जीवनाला समृद्धीकडे नेण्यासाठी सावध रहाण्याचा उपदेश केला. तुकोबाराय म्हणतात, सावध झालो सावध झालो। आलो हरिच्या जागरणा ।। संतांची अमृतवाणी हा मराठी शारदेचा अंभग ठेवा आहे. संतांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शद्ब अभंग ठरला आहे. संतांच्या विशाल, पवित्र, प्रशांत, प्रासादिक आणि भव्योदात्त अनुभवाचा तो अमृत अविष्कार आहे. त्यात संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा मोगरा दरवळत आहे. भक्तीप्रेमाबरोबरच समाजप्रबोधनाची तुकोबारायांची तळमळ डोकावत आहे. नामदेवरायांची आर्तता प्रगटत आहे. समर्थांचे लोकीद्धाराचे सामर्थ्य निनादत आहे, तर आध्यात्मिक विचारांबरोबर जीवनमूल्यांच्या संदर्भात घडविलेले नाथांचे उद्‌बोधन आविष्कृत होत आहे. जनाबाई, निळोबा, चोखोबा, सावतोबा, बहिणाई, कान्होपात्रा या संतांचा आत्मानुभव अभिव्यक्त झाला आहे. “स्वान्तसुखाय आणि मार्गदर्शनाय’ या दोन कारणांसाठी प्रगट झालेली संतांची वाणी ही सामान्य माणसाला जीवन जगतानाही विवेकाची वाट दाखवित आहे. त्याच्या जीवनाला आनंदाचे नित्यत्त्व म्हणजेच अमृतत्त्व प्राप्त करून देत आहे. देदीप्यमान संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली. या संतपरंपरेने आपल्या वाणीने आणि कृतीने समाजमनात ज्ञानजागृती, कर्जजागृती करून समाजाला जागत ठेवले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या अगोदरही समाजात विद्वान नव्हते असे नाही, पण त्यांच्या ठायी केवळ पांडित्य होते. साधुत्त्व नव्हते. दुसऱ्याला सांगणारे खूप होते; पण तसे अनुभवणारे अभवानेच होते. ज्ञानेश्व र कळवळ्यापोटी आध्यात्मिक विचारांची मांडणी करीत, माध्यमातून खऱ्या विवेक धर्माचाच पाया घातला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी रसालंकार संपन्न भाषेत साहित्यिकांना, साहित्य सोनियाच्या खाणी उघडून अंतरंग अधिकारी जिज्ञासूंना, भक्तीवैराग्य कथनाने वारकऱ्यांना, अष्टांग योगाच्या निरुपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांतांच्या माध्यमातून प्रापंचिकांना साच आणि मवाळ। मितुळे आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे । अमृतावाणीचा आणि अमृततत्त्वाचा उत्कट आविष्कार घडविला आहे. भागवत धर्माची, भक्तीपंथाची, वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची महाराष्ट्र सारस्वतातील विविधांगी वाङ्‌मयरचनेची आचारविचार समन्वयाची आणि सामाजिक समतेची मुहूर्तमेढ करून ज्ञानेश्व र माऊलींनी मूल्याधिष्ठित सांस्कृतिक जीवनाचाच पाया घातला आहे. त्याच पायावर संतविचारांची आणि प्रबोधनाची भव्य वास्तू उभी राहिली आहे. पाया पक्का तर वास्तू उभी राहते. इमारत बांधताना पाया खोल घेतला जातो. कठीण अशा खडकापर्यंत तो न्यावा लागतो. ज्ञानेश्वचर माऊलींनी खडकासारख्या जडत्व असलेल्या जीवांच्या अंत:करणातही भक्तीचा ओलावा निर्माण करून हा भगवद्‌भक्तीचा पाया खोलवर रुजविला आहे. ज्ञानदेवांनी भक्ती मंदिराचा आणि भागवतधर्मांचा पाया घातला. तसे पाहिले तर भागवत धर्माचा पाया ज्ञानदेवांच्या आधी दोन हजार वर्षे घातला गेला असतानाही तो पुन्हा रचण्याची आवश्यतकता का भासली? जुन्यातले काय घेतले आणि काय वगळले याचा विचार केला पाहिजे. भागवत धर्माचा आधारभूत ग्रंथ भगवद्‌गीता मानला आहे. “श्रुती’ म्हणजे वेद तर “स्मृती’ ह्या वेदावर आधारलेल्या म्हणूनच काही प्राचीन ज्ञानवंतांनी आणि तत्त्वचिंतकांनी मन्वादिकांच्या स्मृतीप्रमाणेच गीतेलाही दुय्यम स्थान दिले आणि ती स्वत: प्रामाण्य नाही असे म्हटले. या विचारांनाच ज्ञानदेवांनी कलाटणी दिली. गीता ही स्वत: प्रामाण्य तर आहेच आहे, पण वेदांचे सार गीतेने सांगितले आहेत. ज्ञानेश्व र महाराज गीतेचे मोठेपण सांगताना अठराव्या अध्यायात म्हणतात हे गीतानाम विख्यात। सर्व वाययाचे मथित। आत्मा जेणे हस्तगत । रत्न होय ।। ज्या ज्ञानाने आत्मरूपी रत्न स्वाधीन होते ते वेदांचे सार असलेले ज्ञानच “गीता’ रूपाने प्रगटले आहे. गीतेला वेगळे औदार्य आहे. वेदांचा अधिकार काही वर्णांनाच होता. सर्वांना ज्ञान देण्यासाठी वेद कृपण होता. ज्ञानदेवांनी भक्तीचा अधिकार देणाऱ्या एवढेच नव्हे तर- स्त्रीद्रादि प्रतिभे सामाविले । स्त्रीद्रांना तसेच अज्ञानी, अडाणी अशा जीवांनाही ब्रह्मरसाचा आस्वाद घडविणाऱ्या आणि प्रत्यक्ष भगवंताची उक्ती असणाऱ्या गीतेला आधारभूत मानले आणि गीतेवरचे भाष्य केले. तसे पाहिले तर ज्ञानदेवांचा भागवतधर्म हा गीताधर्म आहे. ज्ञानेश्व र माऊली म्हणतात. मग आर्ताचेनि ओरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे। वर्षला शांतरसे । तो हा ग्रंथु ।। आर्त जनांना दु:खापासून सोडवावे, त्यांच्या जीवनातील दु:खे आणि वेदना शांत कराव्यात या कळकळीने गीतेचा अर्थ सांगण्यासाठी सद्‌गुरूंनी जो ब्रह्मरसाचा वर्षाव केला तोच हा ज्ञानेश्वीरी ग्रंथ होय. “आर्तासाठी गीत आहे’ ही यामागची तळमळीची भूमिका घेऊनच ज्ञानदेवांनी गीताप्रणित भागवतधर्म सांगितला आणि सर्वांच्या जीवनात आनंद ओसंडून वहावा म्हणून सर्वांनाच भक्तीचा अधिकार देणाऱ्या गीतेवर भाष्य करून भक्तीचे द्वार खुले केले. ज्ञानेश्व्र माऊलींनी सारस्वताचा पाया घातला. ओवी, अभंग, गवळणी, विरहिणी ह्या वाङ्‌मय प्रकाराच्या आद्यरचना ज्ञानदेवांनी केल्या आहेत. ज्ञानदेवांनी रसालंकार संपन्न भाषेने साहित्यिकांना, साहित्य सोनियाच्या खाणी उघडून अंतरंग अधिकार जिज्ञासूंना, भक्तीयोग्य कथनाने वारकऱ्यांना, अष्टांगयोगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टान्ताच्या माध्यमातून प्रापंचिकांनासुद्धा आपल्या ज्ञानेश्वपरीच्या अमृतवाणीने वेगळा आनंद दिला आहे. संत साहित्य आणि विचार याविषयी अनेक स्तरावर चिंतन घडले आहे. गेल्या शंभर वर्षात न्या. रानडे, राजाराम शास्त्री भागवत, प्रो. रानडे, राजवाडे, फाटक, पेंडसे, वै.मामासाहेब दांडेकर, ह. भ. प. ल. रा.पांगारकर, आचार्य विनोबा भावे, गं. बा. सरदार अशा अनेक विचारवंतांनी संत साहित्याचा परामर्श घेतला आहे. गं. बा. सरदारांनीया विचारवंतांचे तीन वर्ग सांगितले आहेत. “रानडे यांच्यासारख्यांच्या चिंतनात श्रद्धा व चिकित्सा, राष्ट्रभिमान व राष्ट्रनिष्ठा यांचा बेमालूम मिलाफ झाला आहे. त्यामुळे संतांच्या कार्याचे वैशिष्ट्यच फक्त त्यांनी सांगितले, पण उणीवा दाखविल्या नाहीत. रानड्यांनी भागवत धर्म व महाराष्ट्र धर्म यांचा समन्वय साधला, पण त्यातील विरोधाची मिमांसा केली नाही.’ असे सरदारांचे म्हणणे आहे. दुसरा वर्ग आहे राजवाडे -भावे यांच्यासारख्या विचारवंतांचा राजवाडे भावे यांच्यासारख्या विचारवंतांचा राजवाडे भावे प्रभुती राष्ट्रवादी लेखकांना संतांचा भक्तिपंथ निष्क्रीयतेचा व नेभळपणाचा वाटला. युरोपचा इतिहास वाचून केवळ राष्ट्रवादाचा विचार करणाऱ्या या मंडळींना संतांच्या कार्यातील आणि वृत्तीतील सखोलता का दिसू नये, हा मोठा प्रश्नय आहे. राष्ट्रवादाचा विचारही मनात रुजवायला धर्मतत्त्वाची डोळस दृष्टी असावी लागते. ही दृष्टी देण्याचे काम संतांनी केले म्हणून तर पुढे राष्ट्रधर्म उभा राहिला. शिवकालीन राजकीय आंदोलकांनी वैचारिक पार्श्वीभूमी संतमंडळींच्या कार्यातून तयार झाली, हे विसरून चालणार नाही. तिसरा वर्ग आहे संत साहित्याकडे व कार्याकडे श्रद्धेने व भक्तीने पाहणाऱ्यांचा. त्यात प्रामुख्याने वै. गुरूवर्य मामासाहेब दांडेकर किंवा ह. भ. प. ल. रा. पांगारकर यांनी संतसाहित्याचा भक्तिभावाने आणि रसिकेतेने परामर्श घेतला आहे. त्यामुळे संत साहित्यातील भक्तीतत्त्वाचे चिंतन मोठ्या प्रमाणावर झाले. संत आणि भक्ती हे अभेद्य नाते आहे, पण संतांची भक्ती ही देवळात, गाभाऱ्यात, सोवळ्या ओवळ्यात कर्मकांडात गुंतलेली नाही. भक्तीच्या माध्यमातून सामाजिक समतेचा सिद्धांत त्यांना लोकमनात रुजवायचा होता. ज्ञानेश्व र माऊलींना तर जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोग निश्चि त । जाण माझा ।। भक्तीयोगाची अशी सरळ सरळ व्याख्या सांगून भक्तीतत्त्वाचे सामाजिक चिंतन घडविले आहे, तर तुकोबारायांनी… विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।। असा रोखठोक उपदेश करून भक्तिच्याच माध्यमातून विष्णुमय जग पाहण्याची एक नवी दृष्टी दिली आहे. संत एकनाथांचे एक भारूड या संदर्भात महत्त्वाचे वाटले. त्या भारूडात ब्राह्मण आणि महार असा संवाद आला आहे. तो ब्राह्मण एका महाराला विचारतो आहे… “का रे महारा मदमस्ता ।’ त्यावर तो महार सांगतो, “कां हो ब्राह्मण बाबा भलतेच बोलता।’ त्यावर रागावून तो महार सांगतो, “तुझ्या बापाचे भय काय…।’ आणि महाराच्या मुखातून स्वत: नाथ महाराज सांगतात, “मायबाप तुमचे नि आमचे एकच हाय…’ आजच्या सामाजिक स्तरावरील समतेचा विचार करताना सामाजिक तत्त्वचिंतानाचा आद्य प्रवाह संतांच्याच आध्यात्मिक तत्त्वचिंतनातून उदयास आला आहे. संतांनी आध्यात्मिक तत्त्वांना सामाजिक मूल्यांची जोड दिली आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच संतांच्या भक्तितत्त्वाला “भोळ्या भावाचा व भावडेपणाचा विचार’ असे समजून भक्तित्त्वावर आघात केला जातो. संतांच्या विचारतत्त्वांचा खोलवर विचार न करता अध्यात्मवाद, भक्तीवाद असा शिक्का मारू त्यांच्या विचारात आणि चळवळीत धर्मसुधारणेची किंवा लोकजागृतीची भावना नाही. त्यांचा भक्तिमार्ग ही एक पळवाट आहे, असाही काहींचा आरोप आहे; परंतु हातात शस्त्र घेऊन उठाव करणे आणि कालची तत्त्वे पारंपारिक आहेत म्हणून लगेच परंपरेवर घाव घालून नवी पद्धत अवलंबिणे म्हणजे सुधारणावाद नव्हे. ऐहिक दु:खाचा व दैन्यांचा विसर पाडून मनुष्याला कोणत्या तरी काल्पनिक वातावरणांत गुंगवून संतांनी त्यांनी भोळ्या भावनेत गुंतवून ठेवले नाही, तर त्यांच्यातील जडत्व नाहीसे करून त्यांच्या जीवनात एक कार्यप्रवर्तक निष्ठा उत्तपन्न केली. विज्ञानाच्या अभावी बाह्यसृष्टीवर प्रभुत्व गाजविण्याची उमेद जोपर्यंत माणसामध्ये नव्हती तोपर्यंत त्यांच्या व्यक्तीविकासाला आध्यातिम्क अधिष्ठानाची नि:संशय गरज होती, म्हणून ज्ञानदेवादिकांनी महाराष्ट्रातील लक्षावक्षी लोकांच्या नि:सत्त्व जीवन क्रमाला अध्यात्मज्ञानाची जोड मिळवून दिली. तेणे अबालसुबोधे। ओवियेचेनि प्रबंधे । ब्रह्मरस सुस्वादे । अक्षरे गुंथिली ।। त्यांच्याही जीवनात ब्रह्मरसाचा उत्कट आविष्कार घडविला. त्यांच्या नीरस जीवनात आनंद बहरू लागला. आपल्यातील सुप्त शक्तीची आणि भावनांची त्यांना जाणीव झाली आणि प्रतिकूल परिस्थितीलाही तोंड देण्याची त्यांच्या मनाची तयारी झाली. नाथांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक तत्त्वचिंतनाचा फार मोठा प्रभाव तुकोबांच्या अभंगवाणीवर पडला आहे. समाजरीतीचे उत्कट दर्शन घेऊन ते उत्कटपणे आपल्या साहित्यातून अभिव्यक्त करणारा पहिला संत म्हणजे संत एकनाथ तेच समाजदर्शन वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणारा संत म्हणजे तुकाबाराय, तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊन बाण फिरे ।। नाही भीडभाड । तुका म्हणे साना थोर ।। यासारख्या अनेक वचनांमधून त्यांच्याच अंतर्मनाचे उत्कट दर्शन घडते. आध्यात्मिक तत्त्वचिंतनाची परिणती सामाजिक मूल्यांमध्ये घडविणाऱ्या संत विचारपंपरेचे चिंतन करताना असेच म्हणावे लागेल की सामाजिक विषमतेने व्यथित झालेल्या कारुण्याचा पहिला उद्‌गार ज्ञानदेवांच्या रूपात प्रगटला, नाथांच्या रूपात त्याचा प्रतिध्वनी उमटला आहे. तुकोबारायांच्या रूपात सामाजिक विकृतींवर फटका देत मानवी मनात आणि समाजजीवनात आत्मविश्वारस आकारला. बुडते हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणवोनि ।। किंवा बुडाली काढीत।बांधली सोडीत। साकडे फेडित । आर्ताचिया ।। हीच संतांची भूमिका होती. म्हणूनच ज्या कळवळ्याच्या भूमिकेतून त्यांनी समाजाकडे पाहिले तोच कळवळा त्यांच्या साहित्यातून अभिव्यक्त झाला आहे. महाराष्ट्रीय संतांच्या पुढे मानवी जीवनाचे समग्र रूप उभे होते. म्हणूनच आपल्या आचार-विचारांना एकदेशियतेची बाधा होऊ दिली नाही. परंपरागत कर्मकांडातील लौकिक व्यवहारातील जडत्व त्यांना घालवायचे होते. त्यासाठी लोकाभिमुख होऊन नव्हे रात्रंदिवस लोकातच वावरून बहुजन समाजाच्या अंतरंगात आणि बाह्यचारात नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला अद्वैत आणि भक्ती, ज्ञान आणि उपासना, श्रद्धा आणि विवेक यांच्या एकात्मतेवर त्यांनी भर दिला आणि सामाजिक परिवर्तनासाठी विवेकनिष्ठेचा मार्ग सांगितला. कर्मपणा व व्रतवैकल्ये यावर झोड उठविली, पण स्वधर्मयज्ञाची महती कमी होऊ दिली नाही. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे…. एकांती लोकांती करू गदरोळ। लेश तेही मळ नाही येथे ।। एकांतात आणि लोकांतात असा गदारोळ उडवून दिला की मलिनतेची जळमटे आपोआप गळून पडली. संत चळवळीचे सामाजिक चिंतन करताना तत्कालीन महाराष्ट्राचे चित्र डोळ्यासमोर आणावे लागेल. तेराव्या शतकाच्या अखेरीच संतचळवळ सुरू झाली.दक्षिणेकडील यादवांच्या राजवाटीला ओहोटी लागली होती. इ.स. 1216 मध्ये अल्लाउद्दीनची स्वारी झाली आणि त्याने संपत्तीची प्रचंड लयलूट केली. यावरून राजघराण्याच्या अलोट ऐश्वयर्याची कल्पना येते. राजकाराभाराशी प्रत्यक्ष जोडला गेलेला सरदार जहागीरदार, वतनदार यांची आर्थिक स्थिती मजबूत होती, पण सामान्य वर्ग आर्थिक विवंचनेच्या खाईत लोटला गेला होता. युरोपाप्रमाणे महाराष्ट्रातही एक प्रकारची सरंजामशाही अवतरली होती. निरनिराळ्या वर्गाचे आर्थिक हितसंबंध जमिनीशी निगडीत होते. राजसंस्था, वतनसंस्था, ग्रामसंस्था यांचे लाभकेंद्र जमीन हेच होते. युरोपाप्रमाणे इथला शेतकरी भूमीहीन नव्हता. त्याच्या मालकीची थोडी होती; परंतु ती निसर्गावर अवलंबून असायची. जमीनीची अल्प उत्पादन शक्ती हेच सामाजिक दुरावस्थेचे मुख्यकारण होते. राजकारभारातील सरदार, जहागीरदार यांच्या मनमानी कारभाराची झळ शेतकऱ्यांना पोहोचली होती. नाथांच्या साहित्यातून या समाजस्थितीचे वर्णन होते. सामाजिक अस्थैर्याचा तो काळ होता. सत्तासंपादनासाठी सरदारांची आपापसात भांडणे होत. रयतेला लुटण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करीत. त्यामुळे गावगाड्यातील पाटील, शेटे, महाजन, चौगुले हा वर्गही त्यांना सामील होऊन गोरगरीबांना लुटत होता. पुंडाई आणि गुंडगिरी वाढली होती. ब्राह्मणवर्गाने कर्मठपणा वाढवला होता. क्षेत्रियांनी युद्धावर पळून येणे तर वैश्यावने शेतच्या शेत ओस पाडणे हा प्रकार चालला होता. ज्यांच्याकडे आशेने पहावे असा सर्वसंगपरित्याग करून परमार्थात आलेला बैरागी, साधू, जंगम, महानुभाव, फकीर, कलंदर हे स्वार्थासाठी दांभिक झाले होते. रडती पोटासाठी। झालो म्हणती सन्यासी। वर्म नकळे मूढा । होतो फणित रोकडा ।। यासारख्या एकनाथांच्या अभंगातून हे चित्र उभे राहते. अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार यामुळे समाजाचे संतुलन बिघडले होते. विषयवासना बळावली होती. विकारांना आश्रय मिळाला होता. भक्ती वैराग्य बुडाले होते. दांभिकतेचे कौतुक होत होते. खरा धर्म, कर्म, नीती आणि आचार हे सारे लोपले होते. समाजातील दुष्ट प्रवृत्ती जोपर्यंत संपुष्टात येत नाहीत आणि सत्प्रवृत्ती जोपर्यंत वाढीस लागत नाही. तोपर्यंत समाजाला स्वास्थ्याची आशा नाही, हे नाथांनी ओळखले. एकीकडे वाढत चाललेली अवनती या दोन्ही गोष्टींमुळे संत एकनाथ हळहळले आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी त्यांनी “बये दार उघड’ म्हणून आदिशक्तीला आवाहन केले. थोडक्याकत सांगायचे तर भौतिक दुरावस्था आणि मानसिक गुलामगिरी यामुळे सामान्य जनता जड, मूढ व अगतिक बनली होती. या केविलवाण्या स्थितीतून तिला मुक्त करण्यासाठी संत चळवळ जन्माला आली. भक्तीपंथाचा उदय, देशभाषेची प्रतिष्ठा आणि कर्तव्यप्रधान समाजजीवन यातून संतांच्या प्रबोधनकार्याची दिशा स्पष्ट झाली.कर्तव्याची चौकट भक्कम करूनच खऱ्या नीतीधर्माच्या उपदेशाने वैयक्तिक व सामाजिक जीवनसमर्थ करण्यासाठी संतांनी केलेला खटाटोप हा महाराष्ट्राच्या सामूहिक जीवनातील परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. सामाजिक भूमिकेतून संतकार्याचे मोठेपण मांडतांना ग. बा. सरदारांनी म्हटले आहे की,संत चळवळ ही सामाजिक लढ्यापासून लोकांना परावृत्त करणारी प्रतिगामी शक्ती नसून धार्मिक जीवनाच्या कक्षेत त्यांच्या हक्कासाठी सनदशीरपणे झगडणारी सुधारणावादी प्रवृत्तीच होती.’ संतांची ही लोकाभिमुख वृत्ती अध्यात्मा पुरतीच मर्यादित राहिली नाही.त्यांनी लोकसंस्थेचे मोठेपण ओळखले लोकजीवनाला सामाजिक नैतिकतेकडे नेणे हेच साध्य समजले आणि या लोकसंस्थेलानवचैतन्याचे वाहनबनविण्याची नवी दृष्ट दिली. हेच संत साहित्याचे सामाजिक योगदान म्हणावे लागेल. डॉ. रामचंद्र देखणे

हत्ती इलो या दीर्घ कवितेवरील कवी अजय कांडर लिखित दैनिक लोकसता मधील संकलीत लेख

अजयकांडर, रविवार, ११ डिसेंबर २०११ ajay.kandar@gmail.com शब्द पब्लिकेशनतर्फे अजय कांडर यांची ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता लवकरच प्रसिद्ध होत आहे. ही दीर्घ कविता ‘हत्ती’ हे रूपक घेऊन आजची समाजव्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याकडे निर्देश करते. तसेच या कवितेच्या रूपकातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थित्यंतरे दिसत असली, तरी या सर्वाच्या मुळाशी माणसातील सांस्कृतिक विचारशीलता नष्ट झाली आहे, हे लक्षात येतं. मा झ्या पहिल्या ‘आवानओल’ काव्यसंग्रहानंतर सुमारे सात वर्षांनी ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता प्रसिद्ध होत आहे. शब्द पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होणारी ही दीर्घ कविता ‘हत्ती’ हे रूपक घेऊन आजची समाजव्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याकडे निर्देश करते. ‘ऐवजी’, ‘मुरळी’ अशा वाङ्मयीन नियतकालिकांमधून ‘हत्ती इलो’चा काही भाग आधी प्रसिद्ध झाला आहे. त्या वेळी जाणकार वाचकांनी, समीक्षकांनी या कवितेबाबत प्रतिक्रिया नोंदविल्या. यातूनच ‘शब्द पब्लिकेशन’ने हा संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. खरं तर मराठीत नव्वदोत्तर पिढीत दीर्घ कविता मोठय़ा प्रमाणात लिहिली गेली. मात्र, हा त्या वेळचा प्रवाह ओलांडून मी ‘हत्ती इलो’चे लेखन केले आहे. अर्थात, यामागे निश्चित भूमिका आहे. ‘आतला आवाज साद देतो’ तेव्हाच लेखकांनी लिहायचं असतं असं म्हणतात. ‘हत्ती इलो’चं लेखनही असंच झालं असावं, असं मला वाटतं! २००५ मध्ये ‘आवानओल’ हा संग्रह प्रसिद्ध झाला. सर्वदूर पसरलेल्या खेडय़ांतील कष्टकरी बायांच्या वेदनेच्या गाजेचा प्रतिध्वनी ‘आवानओल’मध्ये आपल्याला ऐकू येतो. कष्टकरी बायांचं चित्र मराठी कवितेत तसं नवं नाही; परंतु तळकोकणातील कष्टकरी बायांचं ‘लोकजीवन आणि भोगजीवन’ तिच्या बोलीसह मराठी कवितेत प्रथमच वाचकाला वाचायला मिळालं, असं त्या वेळी अनेक वाचकांनी सांगितलं. ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’सह मराठीतील अनेक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित पुरस्कार या संग्रहाला त्या वेळी प्राप्त झाले. या संग्रहातील कविता विविध अभ्यासक्रमांसाठी निवडल्या गेल्या. विविध भारतीय भाषांत ‘आवानओल’मधील कविता भाषांतरित केल्या गेल्या. विविध अभ्यासकांनीही स्वतंत्रपणे ‘आवानओल’मधील कवितेवर लेखन केलं. हे सांगायचं कारण हेच की, असं यश प्राप्त झाल्यावर आधीच्या मानसिकतेतून तशा प्रकारची कविता पुढे लिहिणं सोपं जातं. मात्र जाणीवपूर्वक अशा प्रकारची कविता लिहिण्याचं टाळून मी ‘आवानओल’नंतरच्या कवितेत सामाजिक आणि राजकीय पर्यावरणाचा- पर्यायानं कोकणची प्रादेशिकता ओलांडून एकूण बदलत्या समाजजीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘हत्ती इलो’ या दीर्घ कवितेचं लेखन होय! कलावंत कलेच्या माध्यमातून विकसित होत असतो, तेव्हा त्याची मुळं महत्त्वाची असतात. ज्या जमिनीत आपण पीक घेत असतो त्या जमिनीची अधिकाधिक मशागत होते तेव्हाच चांगलं पीक येतं. माझी आधीची कविता खेडय़ांतील भेदक वास्तव समोर ठेवत असल्यानं त्यानंतर लिहिली गेलेली कविता खेडय़ांतील पूर्वसंस्कार पचवत खेडं आणि शहर यातील जगणंच उद्ध्वस्त करणारी लिहिली गेली आहे. मराठीत दीर्घ कविता माझ्या पिढीत याआधी सातत्यानं लिहिली गेली असली तरी विशिष्ट प्रदेशाच्या लोकजीवनावर आघात होऊन ते लोकजीवनच संपुष्टात आल्याची तीव्र वेदना प्रथमच ‘हत्ती इलो’ या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. अर्थात, समकालाचा मागोवा ही कविता घेत असल्यानं ती या ठरावीक लोकजीवनाला ओलांडून अनुभव आणि जाणीव-नेणिवेच्या पातळीवर व्यापक होत जाते. त्यामुळे वाचकाला ती समग्रपणे भिडून आतून ढवळून काढेल, असाही विश्वास वाटतो आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वत्र राजकीय आणि सामाजिक बदल झाले. मात्र, तळकोकणाची भूमी या सगळ्या बदलांना संयमितपणे सामोरं जात शांतच राहिली. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गांधीविचारांची मुळं तळकोकणात खोलवर रुजलेली होती. तर बॅरिस्टर नाथ पै यांच्या सारखा कलासक्त, चतुरस्र व्यक्तिमत्त्व लाभलेला नेता याच भूमीतला. नाथ पै यांचे विचारधन घराघरांत पेरले गेल्यामुळे इथला माणूस तसा विचारशीलच. त्यामुळेच इथे गेली २५ वर्षे नाथ पैंच्या विचारांचा वारसा घेऊन, लोकसभेची निवडणूक लढवून पाच वेळा निवडून येणारे तत्त्वनिष्ठ नेते प्रा. मधू दंडवते यांच्या समाजवादी विचारांतून तळकोकणात समाजवादी वातावरण तयार झालेले. स्वातंत्र्यानंतर पुढील ४० वर्षे हेच वातावरण राहिल्याने कोकणात राजकीय संघर्ष असा झालाच नाही. परिणामी इथली समाजव्यवस्था शांततेतच शाबूत राहिली. मात्र ९० च्या दशकाच्या प्रारंभी इथल्या राजकारणाचे भगवेकरण झाल्याने आणि त्यामुळे समाजवादी विचारांखाली दबून राहिलेल्या तरुणाला नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाल्याने, इथल्या घराघरांतल्या चुलीत राजकारण शिजू लागले. त्यातूनच कोकणच्या बदलत्या समाजजीवनाला प्रारंभ झाला. ‘हत्ती इलो’चा प्रारंभ अशा संयमित आणि विचारशील समाजव्यवस्थेचा वेध घेत असल्यानं ही कविता समजाचं, एका काळाचं चित्र प्रतिबिंबित करीत जाते. यातून विशिष्ट प्रदेशाचा इतिहास, विशिष्ट पिढीवरचा एखाद्या काळाचा संस्कार वाचकाच्या मनात उमटत राहील. परिणामी स्वातंत्र्यानंतरच्या प्रारंभीच्या राजकीय संयमी जीवनाकडेही ‘हत्ती इलो’ ही कविता निर्देश करते. स्वातंत्र्यानंतर समाजजीवन उंचाविण्याचं स्वप्न अनेक नेत्यांनी दाखविलं. या लोकनायकांनी समाजजीवन उंचावलेही. मात्र या अशा लोकनायकांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या मुशीतून तयार झालेले ‘लोकनेते’ पुढे मात्र पार बदलून गेले. इथूनच समाजाच्या वैचारिक व सामाजिक अधोगतीला प्रारंभ झाला. नव्वदच्या दशकात कोकणचं राजकारण अशा स्थितीतून ढवळून निघालं आणि इथे पूर्णत: हिंदुत्वाची लाट आली. ही लाट विजयाच्या शिखरावर पोहोचल्यामुळे यश मिळूनही ते न पचविता आलेल्या व्यवस्थेची जी स्थिती होते, तोच अनुभव या राजकीय व्यवस्थेतून इथल्या समाजाला घ्यावा लागला. या संदर्भातील ‘हत्ती इलो’ कवितेतील पुढील ओळी आपल्याला अधिक प्रचीती देतात. जिथे हत्तीलाच मिळालं संरक्षण तो असताना बंदुकीच्या निशाणीवर दिला त्याला कुणी आधार, वाचविले त्याचे पंचप्राण तिथेही त्याच्या स्वप्नातील उन्मादाची रग उसळत राहिली आणि ज्या उन्हात आली सावली माऊली होऊन ज्या कडय़ाकपारी झाल्या मायबाप तिथल्या परंपरेचं संचित उद्ध्वस्त होताना प्रसंगी स्वत:च उद्ध्वस्त करताना तो डोळ्यांत आसुरी आनंद साठवत राहिला क्रूरपणे! आजच्या सत्ताधारी व्यवस्थेचं असं चित्र लक्षात आल्यावर अंतर्मुख व्हायला होतं. तर दुसरीकडे मूल्यऱ्हास सर्वत्र होत आहे. सांस्कृतिक क्षेत्राचं अध:पतन, सामाजिक जीवनाच्या मूल्यांची सरमिसळ आणि व्यक्तिवादी विचारधारा ही सद्य:स्थितीत अधिक बळावली आहे. याच्या मुळाशी गेल्यास एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. पूर्वी माणूस सार्वत्रिक जीवनाशी आपलं जगणं जोडून घेताना आधी समाजाचा विचार करीत होता. आता तो समाजाला स्वत:च्या केंद्रस्थानी ठेवत आहे. ही विलासी वृत्ती एकूण समाजाला विनाशाकडे घेऊन जाणारी असून, या सर्वावर स्वार झाली आहे ती सत्ताधारी व्यवस्था! जिथल्या-तिथल्या सत्ताधारी व्यवस्थेतून अविचारांची बीजं रुजत असल्यामुळं तत्कालीन राजकीय व्यवस्थेबरोबरच एकूण समाजच बधीर झालेला आपल्याल आढळतो. ‘हत्ती इलो’ या कवितेत याचं प्रभावी चित्र मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.समाजातील मने दुभंगत जातात तेव्हा त्याचा फायदा राजकीय व्यवस्थेलाच होत असतो. आणि या व्यवस्थेचा फायदा घेत राजकीय एकाधिकारशाही जन्म घेत असते. यातून मग एकाधिकारशाही असलेल्या राजकीय व्यवस्थेला आपल्या मनासारख्या घटना सहज घडवून आणता येतात. राजकारणाच्या असंस्कृतपणामुळे समाजजीवन उद्ध्वस्त झालंच; परंतु प्रत्येक माणसाला स्वत:चा हक्क शाबूत ठेवण्याचा अधिकारही उरलेला नाही. ‘हत्ती इलो’ ही कविता नेमकेपणानं यावर बोट ठेवते. आज आपण घटनेनुसार व्यवस्था राबवत असलो तरी घटनेनं बहाल केलेले नियम राज्यकर्त्यांकडून पाळले जात नसल्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे अनुभव आपण वारंवार घेत असतो. माणसांना आपल्या साध्या साध्या हक्कासाठीही झगडावं लागत आहे. त्यांचा आवाज दबला जातोय. या आवाजाचं पालकत्व ज्यांनी स्वीकारायला हवं, तेच आज लोकशाहीच्या मुळावर आलेले दिसतात. त्यामुळे माणसं एका अविश्वसनीय जगात जगत असल्याचं चित्र सर्वत्र निर्माण झालं आहे. या अविश्वसनीय चित्राचा उद्गार म्हणजे ‘हत्ती इलो’ ही कविता! गणगोत आणि नाती जपली जातात तेव्हा आपलेपणाचं स्नेहमय वातावरण समाजात तयार होत असतं. मात्र नात्याचे पाश तोडले जात किंवा आपल्याला हवे तेव्हाच जपत, त्यांचा आपल्याला हवा तिथे वापर व्यवस्थेसाठीही करता येतो, अशी वृत्ती राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत वाढत जात आहे. त्यामुळे सत्तेचं नवं आमिष दाखवून कुठलीही सत्ता समाजातील नातेसंबंधावर कशी घाव घालते आहे, याबाबतचे संदर्भही ‘हत्ती इलो’ या कवितेत आपल्याला तपासता येतात. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक निकोप अभिसरण व्हायला हवं. मात्र या तिन्ही व्यवस्था ज्यांच्या हातात आहेत, त्यांना त्याचा एकमेकांशी काय पूरक संबंध असतो, किंवा समाजातील प्रत्येक माणसाच्या जीवनात त्याचं काय स्थान असतं, हेच माहीत नसल्यानं समाजातील प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासावर दूरगामी परिणाम वर्षांनुवर्षे होताना दिसत आहेत. अशा परिणामांचे प्रतीक म्हणूनही ‘हत्ती इलो’ या कवितेकडे आपण पाहू शकतो! या कवितेत व्यक्त झालेला सांस्कृतिक ऱ्हासही मला महत्त्वाचा वाटतो. ‘हत्ती इलो’ या कवितेच्या रूपकातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थित्यंतरे दिसत असली, तरी या सर्वाच्या मुळाशी माणसातील सांस्कृतिक विचारशीलता नष्ट झाली आहे, हे लक्षात येतं. सांस्कृतिक विचार हा आजूबाजूच्या पर्यावरणातून आपल्याला मिळत असतो. तसा तो मूलत: आपल्यात नैसर्गिकच आत दडलेला असतो. फरक एवढाच असतो की, आपल्या सांस्कृतिक विचाराला जो माणूस अधिक चालना देतो तो सांस्कृतिकदृष्टय़ा व्यक्तिगत पातळीवर अधिक घडत जातो. आणि त्यातून तो विचारशील होतो. याचा अर्थ असा की, कुठलाही विचारशील माणूस आधी सांस्कृतिकच असतो. मात्र, आजच्या समाजव्यवस्थेत अशा विचारशील माणसाकडूनच अविचारी कृती घडत असल्यामुळे समाजाच्या मूळच्या अपप्रवृत्तींना अधिक बळकटी मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही काळात अशी अपप्रवृत्ती बाळगणारी राजकीय व्यवस्था विचारशील माणसाला आपल्या गोतावळ्यात घेऊन आपली बाजू अधिक सक्षम करीत राहते. यातून एकूणच समाज सांस्कृतिकदृष्टय़ा रसातळाला जात राहतो. ‘हत्ती इलो’ या कवितेत या सर्वाचा वेध घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कृती ही जबाबदारीची आणि प्रगतिशील असली पाहिजे. अशा कृतीतून जात-धर्माच्या पलीकडे एकूणच मानवी मूल्यांच्या आधारावर समाजव्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज असते. मात्र, आपल्या बहुजातीय आणि बहुधर्मीय देशात अशी सांस्कृतिक कृती अधिक गरजेची असताना आपण सांस्कृतिक परंपरेच्या सनातन चौकटी मोडून काढू शकत नाही. या मानसिकतेचाही मागोवा ‘हत्ती इलो’मध्ये घेण्यात आला आहे. सध्या कोणाला विचारशील म्हणावं, अशा संभ्रमाच्या काळाला आपण सारे सामोरे जात असून, व्यक्तिगत फायद्यासाठी अशा तथाकथित विचारशील व्यक्तीनेच समाजजीवन उद्ध्वस्त करणाऱ्या तथाकथित महान व्यक्तीचं चरित्र लिहिल्याच्या कथाही आपण अनुभवत असून, यावरही ‘हत्ती इलो’ कविता भाष्य करते. ‘हत्ती इलो’ या कवितेला कोकणचं पर्यावरण लाभल्यामुळं तिच्यात कोकणचं भावजीवन, राजकीय आणि सामाजिक संघर्ष येणं स्वाभाविकच होते. परंतु कोकणचा निसर्ग आणि त्याचा ऱ्हास मांडताना तिथल्या लोकजीवनाला चिकटून आलेल्या कोकणच्या बोलीचा चपखलपणे वापर केलेला आढळेल. कविता हे कवीचं आत्मचरित्र असतं, असं मी मानतो. त्यामुळे माझी कोणतीही कविता माझ्या जगण्यासह माझं आजूबाजूचं पर्यावरण मांडते. पेशाने पत्रकार असल्याने कोकणचं राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतर उघडय़ा डोळ्यांनी पाहिलं आणि माझ्यात एक माणूस म्हणून नेहमीच अपराधीपणाची भावना कायम टोचू लागली. कारण काही वर्षांत राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेनं कोकणचं रूपडंच पालटून टाकलंय. माणूस माणसापासून पारखा झालाच; परंतु कधी नव्हे एवढी राडा संस्कृती इथे बळावली. दर निवडणुकीच्या वेळी माणसाचाच बळी दिला जाऊ लागला. अर्थात, याला एकच राजकीय विचारधारा कारणीभूत नव्हती तर संधीसाधूपणातून सर्वच राजकीय विचारधारा अशा घटनेला कारणीभूत ठरल्या असल्याचं लक्षात येतं. माणूस म्हणून आणि एक कलावंत म्हणून मी जेव्हा या सर्वाचा तटस्थपणे विचार करतो तेव्हा तीव्रतेनं एक गोष्ट लक्षात येते, ती ही की, आता माणसाचा माणसावरचा विश्वास उडून गेलाय. परिणामी ‘हत्ती इलो’ या कवितेत कोकणचं हे वातावरण प्रतिबिंबित झालेले आहे. ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता लिहिण्याची प्रेरणा मिळण्याला एक घटनाच कारणीभूत आहे. प्रयोगशील नाटय़कर्मी अतुल पेठे कणकवली येथे प्रायोगिक नाटय़चळवळ राबविणाऱ्या ‘वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान’साठी नाटक बसवायला आले होते. त्यांनी मला कोकणच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक पाश्र्वभूमीवर नाटक लिहिण्याचा प्रयत्न करायला सांगितला. या निमित्ताने मी जे चिंतन केलं, त्यातून माझ्या मुळच्याच काव्यवृत्तीला बळकटी मिळाली आणि नाटकाऐवजी ‘हत्ती इलो’ या दीर्घ कवितेचे लेखन झालं. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांच्या सीमेवर तळकोकणचा भाग येतो. या सर्व भागांत गेल्या काही वर्षांत रानटी हत्तीने उच्छाद मांडला आहे. हाच अनुभव काही वर्षांतील राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेतून सार्वत्रिकपणे आपल्याला घ्यावा लागतोय. म्हणूनच हत्तीच्या रूपकातून ‘हत्ती इलो’चं लेखन झालं. या संदर्भातील या कवितेतील अखेरचा काही अंश.. ‘आता हत्ती ज्या भूमीलाच स्पर्श करतोय ती भूमीच नापीक झालीय भूमी र्निवश झाल्याचे दु:ख मनात असतानाच हत्तीने माणसांनाच र्निवश करायला प्रारंभ केला हत्तीच्या गर्जनेने.. ओल्या बाळंतिणीचाही पान्हा सुकू लागला उदरातील गर्भ गुदमरू लागला आता माणसंच मंदबुद्धीची झाल्याची खात्री पटल्यावर हत्ती, एवढा बोकाळला, की त्याने आधी माणसांना गृहीत धरले होतेच, आता माणसेही त्याला गृहीत धरू लागली.. हत्ती आणि माणसाचा असा खेळ हल्ली रोज नव्याने खेळला जातोय, सर्वत्र! गेल्या पंचवीस वर्षातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अध:पतन ‘हत्ती इलो’मध्ये मांडण्यात आले आहे. ही दीर्घ कविता विशिष्ट प्रादेशिक जनजीवनाच्या पडझडीचा काळ जसा मांडते त्याचबरोबर त्यातील अंतर्विरोधातील ताणेबाण्यामुळे ती वाचणाऱयांमध्ये वैश्विक भानही निर्माण करते, असे मत ‘हत्ती इलो’बाबत अनेक मान्यवरांनी समीक्षा लेखनातून व्यक्त केले आहे. ‘हत्ती इलो’ या संग्रहानिमित्त कांडर यांची भारत सरकारच्या ‘साहित्य अकादमी’सारख्या शिखर संस्थेवर सदस्य म्हणून पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. तर या संग्रहाला ‘कुसुमाग्रज’, इंदिरा संत, यशवंतराव चव्हाण, काव्यरत्नाकर, नारायण सुर्वे आदी प्रतिष्ठित आठ काव्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर संग्रहावर अनेक मान्यवरांनी समीक्षालेखन केले आहे. तसेच त्यावर ‘हत्ती इलो’ याच नावाने नाटक रंगमंचावर आले असून त्यालाही अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

Saturday, 6 September 2014

महानुभाव पंथ (संकलीत लेख,विकीपिडीया)

महानुभाव पंथ मुकुंदराजांनंतर आणि ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. ‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. वि.भि. कोलते यांच्या मते (पहा : लोकशिक्षण, वर्ष ७, अंक ४/५) या संप्रदायाचे मूळचे नाव ‘परमार्ग’ असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम एकनाथांनी वापरले असल्याचे शं. गो. तुळपुळे म्हणतात. महानुभाव पंथाचे मूळ पुरुष गोविंदप्रभू ऊर्फ गुंडम राऊळ हे होते परंतु या पंथाचे प्रणेते मात्र चक्रधर आहेत. चक्रधरांचा कालखंड (इ. स. ११९४ ते १२८२) हा महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड समजला जातो. देवगिरीच्या यादवांची कारकीर्द या वेळी महाराष्ट्रात होती. समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात चक्रधरांनी शंकराचार्य (अद्वैत) व रामानुजाचार्य (विशिष्टाद्वैत) यांच्या तत्त्वज्ञानाचा मिलाफ करून (ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून) आपल्या द्वैती तत्त्वज्ञानाचा प्रसार केला आणि सामान्य देवतांचे प्रस्थ कमी केले. देवतांच्या पूजेचा निषेध केला आणि चातुर्वर्ण्यावर हल्ला चढविला. आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय अशा सर्वांनाच संन्यास घेण्याची सोय ठेवली. संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन आपल्या संप्रदायात अपरिहार्य मानले. धर्माचे रहस्य आपल्या बोलीभाषेत सांगणाऱ्या जैन, लिंगायत, नाथ इत्यादी संप्रदायांप्रमाणो जनभाषेत आपले तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. चक्रधर (आणि पुढे) ज्ञानदेव यांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते. ओळख[संपादन] महानुभाव पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. उत्तरेकडे या संप्रदायाला जयकृष्णी पंथ म्हटले जाते. आजही उत्तर भारतात या संप्रदायाचे आश्रम व महंत आहेत. या संप्रदायाच्या समाजावादी व चातुर्वर्ण्यविरोधी विचारसरणीमुळे मोठय़ा प्रमाणात अनुयायी लाभले. महानुभाव संप्रदायाचे तेरा आम्नाय आहेत. कवीश्वर आम्नाय हा त्यांतील एक होत. मुरारी बास हे याच आम्नायातले आहेत. तत्त्वाचिंतनात्मक लेखन हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ग्रंथावर भाष्य-महाभाष्य लिहिली गेली. भाष्यलेखनाची परंपरा व्यापक, प्रदीर्घ व भाष्य-लेखन सातत्य टिकविणारी आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरुप श्री चक्रधरस्वामी यांनी बाराव्या तेराव्या शतकात आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररुपाने 'दृष्टान्तपाठ' या ग्रंथात सांगितली. या ग्रंथावरील भाष्ये अनेक महानुभाव संतकवींनी व भाष्यकारांनी केली. हा इतिहासही महानुभाव साहित्याचे वेगळपण सिद्ध करणारा आहे. याच भाष्यलेखनमालिकेतील मुरारीबासांचा 'दृष्टान्तप्रबोध' हा ग्रंथ होय. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ञ विद्वान आणि त्यांनी आपले भाष्यग्रंथ स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषा मराठीतून लिहिले आहे. यादव काळात, सुमारे १३ व्या शतकात महानुभाव हा अत्यंत लोकप्रिय पंथ होता. या पंथाची स्थापना करणाऱ्या चक्रधर स्वामींना लोक "पंचकृष्णां" पैकी एक अवतार मानीत असत. या पंथांची वैदिक धर्मावर श्रद्धा नसली तरी त्याबद्दल स्वामींना आस्था होती. एक सामाजिक गरज म्हणून चातुर्वर्ण्यावर महानुभावांचा विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत. या पंथांवर जैन व बौद्ध धर्मांचा बराच प्रभाव पडलेला दिसून येतो. यतिधर्म (संन्यास) व गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठांत संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. मात्र विधवांना हा हक्क नाही. ते अहिंसा, शाकाहार, सात्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यानी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ तऱ्हांनी लिहिता येते. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत; तसेच त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्यांचे सूत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाच्या पंजाबी व्यापाऱ्याने हा धर्मग्रंथ तिकडे नेला. ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा हा संप्रदाय जयकृष्ण पंथ म्हणून पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेब याने पंथाला जिझिया करापासून मुक्त केले. कारण त्याला ते हिन्दू फकीर वाटले. गेली साडेसातशे वर्षे हा पंथ महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात व पंजाबमध्ये अस्तित्वात आहे. महानुभावांची कृष्णाची मंदिरे मुंबई, दिल्ली व अमृतसर या ठिकाणी आढळतात. महानुभाव पंथ व साहित्य[संपादन] यादवराजांच्या कारकीर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उदयास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होत. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभाव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाचा पुरस्कार केला. ‘महानुभाव’ या नावने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्णभक्तीचा द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परांस ‘महात्मा’ म्हणत. ‘भटमार्ग’ हे नाव पंथसंस्थापक चक्रघरांचा पट्टशिष्य नागदेव किंवा भटोबास याच्या नावावरून आलेले आहे. चक्रधरोक्त सिद्धान्तसूत्रपाठाप्रमाणेच गीता हा या पंथाचा प्रमुख धर्मग्रंथ असून श्रीकृष्णलीलावर्णन करणारे भागवत ते प्रमाण मानतात. कृतयागात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात श्रीकृष्ण आणि कलियुगात चक्रधर असे चार अवतार त्यांच्या मते असून त्यांचा दत्त हा एकमुखी होय. द्वारकाधीश कृष्ण, दत्तात्रय, द्वारावतीचे चांगदेव राऊळ, ऋद्धिपूरचे गोविंदप्रभू आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे पाच अवतार ते मानतात. त्यांपैकी दत्तात्रय, श्रीकृष्ण चक्रधर हे उभयदृश्य पूर्णावतार होत. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि व अनंत मूळ चार तत्त्वे असून परमेश्वर नेहमी मनुष्यरूप धारण करून अवतार घेतो. मनुष्यरूपानेच प्राणिमात्रांचे उद्धरण परमेश्वरास करता येईल, अशी त्यांची श्रद्धा आहे. प्रपंच हा अनित्य असून अनादि अविद्यायुक्त जीव बद्धमुक्त, देवता नित्यबद्ध आणि परमेश्वर हा नित्यमुक्त आहे; जीव अनंत असून परमेश्वराचे अवतारही अनंत आहेत. जीवेश्वराचा संबंध हा स्वामिभृत्यासारखा आहे, असे ते मानतात. या दृष्टीने हा पंथ द्वेती असून आत्मा आणि परमात्मा वेगळे मानणारा आहे. अविद्येपासून मुक्त होऊन ईश्वरस्वरूपाचा आनंद भोगण्याची पात्रता जीवाच्या ठिकाणी असल्याने महानुभवांनी जीवास ‘बद्धमुक्त’ मानले आहे. प्रपंचाचे स्वरूप अष्टभैरवस्थित पंचमहाभूते व त्रिगुण यांच्यापासून निर्माण झालेली सृष्टी असे असून त्याचे ‘कारण प्रपंच’ व ‘कार्य प्रपंच’ असे दोन भाग केले आहेत. ‘कारण प्रपंच’ हा अनादि अनंत म्हणूनच नित्य आहे. कार्यरूप प्रपंच हा व्यक्त आणि अनित्य होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘प्रपंचु संहारे’ असे म्हटले असल्यामुळे प्रपंच अनित्य वर्गातला आहे, यात शंका राहत नाही. अविद्या अनादि मानली तरी ती नित्य असली पाहिजे, असे अनुमान करण्याचे कारण नाही. कारण–अविद्या व कार्य−अविद्या मोक्षस्थितीत संपूर्ण नाश पावतात, असे गौतम बुद्ध व शंकराचार्य यांचे मत आहे, तेच चक्रधर स्वामींनी मान्य केले आहे (महाराष्ट्र जीवन, खंड १, पृष्ठ २१९). देवतांचे नऊ थोवे महानुभावीयांनी कल्पिले असून त्यांची प्रत्येक ब्रह्मांडातील संख्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा इतकी आहे, असे ते समजतात. त्या नित्यबद्ध, भावरूप पण अव्यक्त आणि ज्ञान, सुख, ऐश्वर्य, प्रकाश व सामर्थ्य यांनी युक्त असल्या, तरी परमेश्वरूप नव्हेत. देवतांचे मुख्य कार्य सृष्टीतील जीवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे आहे, अशी त्यांची धारणा असते. अद्वैत वेदान्तामध्ये ब्रह्मस्वरूप हे अंतिम सत्य व ईश्वर हे ब्रह्माचे सोपाधिक म्हणजे गौण स्वरूप मानले आहे. महानुभाव तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराचे (१) अवतरदृश्यावतार, (२) परदृश्यावतार, (३) उभयदृश्यावतार असे तीन प्रकारचे अवतार आहेत. परमेश्वर नित्यमुक्त असल्याने तोच जीवाचा उद्धार करू शकतो. त्या त्या युगातील देहधारी जीव साकार परमेश्वराच्या सन्निधानाने आपला उद्धार करून घेतात. मात्र जीवाचे उद्धरण म्हणजे अद्वैत्यांची मुक्ती नव्हे. मुक्तीनंतरही जीवाचे अस्तित्व टिकून राहते. ईश्वराकडून शब्दज्ञान झाले, तरी मोक्षमार्गाने जाण्यासाठी अनुसरणाच्या मार्गाचा अवलंब करून वयाच्या छप्पन्नाव्या वर्षापूर्वी सर्वेंद्रिये कार्यक्षम असताना संन्यास घेणे आवश्यक आहे. संन्यास घेऊन परमेश्वराला अनुसरल्यानंतर देहान्तापर्यंत साधकाला ‘असती−परी’ आचरावी लागते. महानुभावांचे उपदेशी आणि संन्यासी असे दोन वर्ग असून उपदेशी वर्ग लौकिक जीवनात चातुर्वर्ण्य पाळतो. संन्यासदीक्षेनंतर मात्र जातिनिर्बंध पाळण्याची आवश्यकता नाही. महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर हे होत. ऋद्धिपूरच्या गोविंदप्रभू या परमेश्वरावताराचे ते शिष्य. त्यांचे मूळचे नाव हरपाळदेव असून त्यांच्या मृत शरीरात चांगदेव राऊळ यांनी प्रवेश करून नवीन अवतार धारण केला अशी कल्पना आहे. नागदेवाचार्य हे चक्रधरांचे पट्टशिष्य व पंथाचे पहिले आचार्य. चक्रधरांच्या वैदिक धर्माहून आणि लोकरुढीहून वेगळ्या शिकवणीमुळे तत्कालीन सनातनी लब्धप्रतिष्ठितांकडून त्यांना विरोध झाला व त्यांना नाहीसे करण्याचे प्रयत्न झाले. महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय. महानुभाव वाङ्मयात चरित्रे, सूत्रवाङ्मय, टीकावाङ्मय, न्याय-व्याकरणादी शास्त्रे, क्षेत्र व व्यक्तिमहात्मवर्णने, स्तोत्रे इ. प्रकारचा समावेश आहे. निरनिराळ्या काळात पंथातील प्रतिभासंपन्न कवींनी लिहिलेल्या सात काव्यांना साती ग्रंथ म्हटले जाते. यात नरेंद्रांचे रुक्मणीस्वयंवर; भास्करभट्ट बोरीकरांचे शिशुपालवध व उद्धवगीता. दामोदर पंडितांचा वछाहरण, रवळो व्यासकृत सैह्याद्रिवर्णन, पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध आणि पंडित नारायण व्यास वहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन यांचा समावेश होतो. हे साती ग्रंथ परमार्गाच्या परंपरेने मान्य केलेले आहेत. श्रीचक्रधर व श्रीगोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिळवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र हे चरित्रग्रंथ तयार केले आणि पंथीयांच्या नित्यस्मरणाची मोठी सोय केली. केसोबासांनी लीळाचरित्रातील काही लीळा निवडून त्या संस्कृत भाषेत पद्यबद्ध केल्या व आपला रत्नमालास्तोत्र ग्रंथ निर्माण केला. नागदेवांच्या जीवनावरील स्मृतिस्थळ हा चरित्रग्रंथ प्रथम नरेंद्र व परशराम बासांनी तयार केला, असे म्हणतात. पुढे त्याचे मालोबास व गुर्जर शिववास यांनी संस्करण केले. केशवराज सूरी यांनी सिद्धान्तसूत्रपाठ आणि दृष्टान्तपाठ हे पंथीय तत्त्वज्ञान विशद करणारे ग्रंथ तयारे केले. श्रीचक्रधरांनी नित्यदिनचर्या सांगणारा छोटा पण महत्त्वाचा ग्रंथ पूजावसर हा वाङ्देववास यांचा. मुनिव्यासांनी श्रीचक्रपाणी, गोविंदप्रभू व चक्रधर यांच्या ‘संबंधा’ने पवित्र झालेल्या स्थळांची स्थानपोथी लिहिली. डॉ. कोलते ह्यांच्या मते ते कर्तृत्व शंकास्पद आहे. म्हाइंभट हे मराठीतील आद्य चरित्रकार मानले जातात. धवळे व मातृकी रुक्मिणीस्वयंवर रचणारी चक्रधरशिष्या महदाइसा ही आद्य मराठी कवियत्री होय. हयग्रीवाचार्य यानी भागवताच्या दशम स्कंधावर गद्यराज हे निर्यमक श्लोकबद्ध काव्य लिहिले. पंथाच्या उत्कर्षकाळात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या ग्रंथरचनेनंतर भाष्यग्रंथ व इतर प्रकारचे साहित्य लिहिले गेले. त्यात गुर्जर शिववासाने, चक्रधरांच्या वचनांवर संबंधिलेले लक्षणस्थळ, विचारस्थळ व आचारस्थळ हे ग्रंथ महत्त्वाचे होत. यांतील प्रत्येक स्थळावर पुढे अनेक भाष्ये किंवा बंद लिहिले गेले. त्यांत दत्तराज मराठे यांचा लक्षणबंद, वाईंदेशकरांचा विचारबंद विश्वनाथवास बीडकर यांचा आचारबंद विशेष महत्त्वाचे आहेत. स्थळ व बंद ग्रंथांनी चौदाव्या-पंधराव्या शतकांत मराठी गद्याचे दालन विशेष समृद्ध झाले आहे. याच काळात मराठीचा पहिला व्याकरणग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला. चक्रधरांची वचने ज्या प्रसंगी निरूपिली गेली वर्णन करणारा, निरुक्तशेष ग्रंथ भीष्माचार्य वाइंदेशकर ह्यांनी तयार केला. तोही पंथीय वाङ्मयात महत्त्वाचा मानला जातो. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराथी भाषक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला. त्यांचा हा दृष्टिकोण पंथाचे आचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून त्यांनी माठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली (नको गा केशवदेया : येणें, माझिया स्वामीचा सामान्य परिवारू नागवैस की : किंवा ‘तुमचा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मऱ्हाटी : तियाचि पुसा :) (स्मृ. स्थ. १५, ६६). चक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपारिक संस्कृत पठडीत तयार झालेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृत वाङ्मयाच्या वळणावर गेली असून त्यांच्या भाषेवर संस्कृताचा मोठा प्रभाव आहे. या ग्रंथात प्रारंभी महाकाव्यसदृश सलग ग्रंथरचना झाली. पुढील काळात चौपद्या, धुवे, स्तोत्रे, आरत्या, धवळे, पदे अशी विपुल स्फुटरचनाही झाली. लक्ष्मण रत्नाकरासारख्या संस्कृत ग्रंथावरील बत्तीस लक्ष्मणांची टीप यासारखे टीपग्रंथ लिहिले गेले. त्यामुळे सूत्रभाष्य, अर्थनिर्णयशास्त्र, व्याकरणशास्त्र, साहित्यशास्त्र यांची रचना मराठीच्या प्रारंभाकाळात करून महानुभावीयांनी मराठीची उपासनाच नव्हे, तर गोपासनाही केली. महानुभावीयांच्या या वैविध्यपूर्ण वाङ्मयाची विभागणी (१) चरित्रग्रंथ, (२) सूत्रग्रंथ, (३) साती (काव्य) ग्रंथ, (४) भाष्यग्रंथ, (५) साधनग्रंथ, (६) तात्त्विक ग्रंथ, (७) गीता टीका, (८) आख्यानक काव्ये, (९) स्थलवर्णनपर ग्रंथ, (१०) इतिहासग्रंथ, (११) स्फुटरचना अशा प्रकारांत करता येईल. भासकरभट हे पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमणाच्या काळात ते कोकणात जात असताना, लीळाचरित्र, ऋद्धिपूरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर हिराइसा आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या ‘वासना’ ही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. काही आग्नायांनी सांकेतिक लिपीत आपले ग्रंथ निबद्ध केले. आपली ब्रह्मविद्या, धर्ममते भ्रष्ट होऊ नयेत म्हणून इतरांपासून गुप्त ठेवण्याची आणि पंथीय वाङ्मयाचे पावित्र्य राखण्याची भावना वाढीस लागून त्यासाठी ग्रंथ सांकेतिक लिपीत लिहिण्यास येऊ लागले. रवळो व्यासाने १३५३ मध्ये सकळ लिपी तयार केली आणि १३६३ मध्ये सुंदरी लिपी निघाली. त्यानंतर पारमांडल्य, वज्रलिपी, अंकलिपी इ. अनेक लिप्या तयार झाल्या असल्या, तरी बहुतेक ग्रंथ सकळ लिपीतच आढळतात. परशुराम आचार्यांच्या काळात निर्माण झालेल्या अनुयायांची नावे अशी : (१) कवीश्वर, (२) उपाध्ये, (३) पारिमांडल्य, (४) अमृते, (५) मदळसा, (६) कुमर, (७) यक्षदेव, (८) दामोदर, (९) हरिदेव, (१०) जयदेव, (११) साळकर, (१२) दिवाकर आणि (१३) महेश्वर. महानुभाव पंथाने प्रस्थापित आचारधर्मावर प्रहार करून एक नवा विचारप्रवाह निर्माण केला. चक्रधरांनी गीतेवरील भाष्याच्या स्वरूपात पारंपरिक पद्धतीने आपले विचार न मांडता स्वतंत्रपणे मांडले. श्रीकृष्ण हा पूर्णावतार मानून त्यांनी पंचकृष्णांखेरीज अन्य देवता क्षुद्र मानल्या. स्त्रीशूद्रादिकांना संन्यासाचा अधिकार देऊन मोक्षमार्ग सर्वासाठी त्यांनी खुला केला. पंथीय तत्त्वविचार लोकभाषेत, मराठीत मांडले मराठी वाङ्मय समृद्ध झाले; परंतु सामान्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार न करता या पंथातील संस्कृतज्ञ ग्रंथकारांनी लेखन केल्यामुळे त्याच्या प्रसारास मर्यादा पडल्या. महानुभव पंथाच्या वैदिक वा अवैदिक स्वरूपाबाबत वाद आहे. तो वेदानुयायी किंवा वेदविरोधी दोन्ही नसून त्याचे स्वतंत्र रूप आहे. असेही काही मानतात. त्यांचे वेदविरोधकत्व सांगताना (१) वेद हे कर्मरहाटीचे शास्त्र म्हणून त्याज्य आहे, हे चक्रधरांचे मत, (२) देवतांची उपसना परमेश्वरप्राप्तीच्या दृष्टीने अप्रमाण, (३) चक्रधर वचने हीच महानुभवांची श्रुती असून वेदवचने ते प्रमाण मानीत नाहीत करणारा म्हणून महानुभावी वैष्णव पंथ[संपादन] महानुभाव ह्या प्रमुख संप्रदायामध्ये महानुभाव, वारकरी व रामदासी हे तीन वैष्णव पंथ आहेत. अवतार[संपादन] श्रीकृष्ण, दत्तात्रेय, चक्रपाणी, गोविंदप्रभू, चक्रधरस्वामी महानुभावीय तत्त्वज्ञान[संपादन] ‘सूत्रपाठ’ या ग्रंथास महानुभावांचा वेद असे संबोधले जाते. त्यातून महानुभावांचे सारे तत्त्वज्ञान विशद झाले आहे. महानुभाव जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या वस्तू मुख्य व नित्य अशा मानतात. त्यांच्या मते, या चार वस्तू स्वतंत्र, नित्य, अनादि व अनंत आहेत. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर यांचे परस्परांशी किंवा सर्वांशी कधीच ऐक्य साधले जात नाही, असे हा पंथ मानतो. म्हणूनच त्यास ‘द्वैती पंथ’ म्हणतात. ‘देवता या नित्यबद्ध आहेत, जीव बद्धमुक्त आहेत, परमेश्वर नित्यमुक्त आहे व प्रपंच अनित्य आहे’ असे या तत्त्वज्ञानाचे सूत्र आहे. जीव : जीव बद्धमुक्त म्हणजे बद्ध असूनही मुक्तीस पात्र असणारा असा आहे. त्याला मायेचे बंधन आहे. तो मूलतः स्फटिकाप्रमाणे शुभ्र आहे पण अविद्येमुळे त्याला काळसरपणा प्राप्त झालेला आहे. तांदळाच्या दाण्यावर जसे पाच पदर असतात, तसा जीव हा ‘पाच पिशीं’नी युक्त असतो. अनादि, अविद्या, अन्यथाज्ञान, जीवत्व व आदिमळ या त्या पाच पिशी होत. यासाठी उद्धवगीतेत मडक्याच्या उतरंडीचा समर्पक दृष्टांत दिला आहे. यांतील सर्वांत तळाचे मडके अविद्या हे आहे. हे अविद्येनेच मडके फोडले म्हणजे वरची मडकी आपोआपच फुटतील. (तळीचील हाणितलेया वरिचील पडे : उतरंडी गडबडी) प्रपंच : प्रपंचास महानुभाव अनित्य मानतात. कारणप्रपंच व कार्यप्रपंच असे त्यांनी प्रपंचाचे दोन भाग केले आहेत. अव्यक्त असणारी पंचमहाभूते व त्रिगुणी म्हणजेच कारणप्रपंच होय. कार्यप्रपंचाची निर्मिती पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते व सत्त्व, रज, तम हे त्रिगुण यांच्यातून झाली आहे. देवता : देवतांना महानुभावांनी गौण मानले आहे. परमेश्वर हा नित्यबद्ध असल्यामुळेच तो जीवाचा उद्धार करू शकतो. (परमेश्वर एकु सोडविता) परमेश्वराचे ज्ञान झाले म्हणजे, अथवा भक्ती केली म्हणजे, जीवाला मोक्ष मिळतो. मोक्ष परमेश्वराकडूनच मिळू शकतो. देवतांकडून नाही. देवतांचे कार्य सृष्टीतील जिवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे होय. वेदान्तातील कल्पनेच्या उलट महानुभावीय ईश्वरास प्रमुख स्थान देतात आणि ब्रह्मास एक भाग मानतात. त्यांच्या मते, ईश्वर हा अनादि, नित्य, अव्यक्त, स्वयंप्रकाशी, सर्वव्यापी, ज्ञानमय, आनंदमय, सर्वसाक्षी व सर्वकर्ता असा आहे. जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यदेह धारण करून अवतार घेतो. ईश्वराचे स्वरूप ज्ञानामुळे ओळखता येते. शब्दज्ञान, सामान्यज्ञान, अपरोक्षज्ञान व विशेषज्ञान असे या ज्ञानाचे चार प्रकार आहेत. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग ही मोक्षप्राप्तीची दोन साधने आहेत. महानुभाव चार युगांचे चार अवतार मानतात. कृतयुगात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात कृष्णावतार आणि कलियुगात चक्रधरावतार असे हे अवतार होत. महानुभावांनी फक्त पाचच मूर्ती मानून त्यांची पूजा केली आहे. हे पाच अवतार हेच त्यांचे पंचकृष्ण होत. गुरूवर प्रीती करावी पण त्याला परमेश्वर समजू नये असे महानुभाव मानतात. हा पंथ वेदांबद्दल आदर बाळगणारा असला तरी वेदांना प्रमाण मानणारा नाही. महानुभाव पंचकृष्णांच्या वचनांनाच प्रमाण मानतात. महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान[संपादन] व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते, असे सांगणारा महानुभाव हा एकच पंथ असून, येथे सर्व माणसे समान आहेत, असे काही विद्वान मानतात. त्यांच्या मते दंभ निर्माण होतात तेव्हा धर्मात अपप्रवृत्ती येतात. प्रत्यक्ष असणे व दिसणे यातील भेद संपतो, तेव्हा दंभ संपतो. त्याचवेळी समाजात परिवर्तन घडू शकते. महानुभाव पंथ हा सर्वाना सामावून घेणारा पंथ आहे. येथे सर्व समान आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक येथे दिसतात. येथे जातिभेद नाही, तर केवळ तत्त्वज्ञान आहे. धर्मासाठी आम्ही नाही, तर धर्म आमच्यासाठी आहे. तो साध्य नाही, तर साधन आहे. हीच पंथाची शिकवण आहे. इ.स. १२व्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला. चक्रधर स्वामी सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक[संपादन] बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो. त्या काळानंतर हातामध्ये समाजाची सूत्रे असणाऱ्यांनी चक्रधरांच्या विचार व स्वार्थाआड येऊ पाहणाऱ्या सर्वसमावेशक विचारांना सर्वसामान्यांपासून हेतुपुरस्सर दूर ठेवले, असा आरोप होतो. चक्रधर स्वामींचे समतेचे तत्त्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले. हा त्रास जो चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई, रयतेचा राजा श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येत आहे, असे काहींचे मत आहे. चक्रधरांची धर्मक्रांती ही सनातन्यांच्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन होते, असे म्हटले जाते. पहा: महानुभाव साहित्य संमेलन संदर्भ[संपादन] • http://bhagvans.blogspot.in/ (महानुभाव पंथाचे संकेतस्थळ) ________________________________________ प्रमुख महानुभावी व्यक्ती[संपादन] • केशिराज बास • नागदेवाचार्य • गोविंद प्रभू अर्थात गुंडम राऊळ • नागराजबाबा • भानुकवी जामोदेकर : हे मूळचे गोदमगाव (तालुका - बिलोली, जिल्हा - नांदेड) येथील आहेत . त्यांचा जन्म ८ जुलै १९२४ रोजी झाला. त्यांचे पाळण्यातले भास्कर असे ठेवले होते. त्यांची आई आजारपणाने लवकर वारली. पित्याला वाटले मी याचा सांभाळ करू शकत नाही त्यामुळे त्यांनी त्या बालकास पाण्याच्या प्रवाहात सोडून देण्याचे ठरविले. पण आयत्या वेळी दत्तराज बाबा जामोदेकर हे त्यावेळी भिक्षेच्या निमित्ताने तेथे आले आणि त्यांनी या बालकाला सांभाळण्याचे वचन दिले. त्यांनी या बालकास वाजीरगाव येथे आपल्या मठात आणले, व त्याचे संगोपन्केले. पुढे भासकराबे महानुभाव पंथाचा अभ्यास केला आणि संन्यासाश्रम स्वीकारला. भास्कर याला त्यांना लहानपणापासून कविता आणि भजनाचा छंद होता. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी अनेक भजने रचली, आणि ते भानुकवी जामोदेकर म्हणून प्रसिद्धी पावले. पुढे त्यांनी परभणी जिल्ह्यातील बोरी येथे काल्लुचरकर बाबांच्या सहवासात काही दिवस काढले. त्यांची काव्यप्रतिभा पाहून जुनी मंडळी फारच खुश झाली. • बाभूल्गावकरबाबा शास्त्री महानुभाव पंथाचे अभ्यासक[संपादन] महानुभाव पंथ हा सर्वांत जुन्या पंथांपैकी एक असला तरी राजकीय आक्रमणांमध्ये पंथीय साहित्य पुन्हापुन्हा नष्ट होण्याचे प्रसंग आले. त्यामुळे सांगीवांगी लीळा मिळवून पुनर्लेखनाचे प्रयत्न झाले. कोणत्या लीळा मूळ आहेत याविषयी (त्यांचा मोठा जाणता वर्ग संन्यस्त असल्यामुळे) पंथेतर साहित्यिकांनी केलेले संशोधन खऱ्या पंथश्रद्धांशी जुळत नाही असा आक्षेप पंथीयांनी कालौघात घेतला. विष्णू भिकाजी कोलते यांचा अग्रगण्य महानुभाव साहित्य संशोधक म्हणून परिचय होता. पण नंतरच्या काळात पंथ संप्रदायाच्या लोकांनी काही मुद्द्यांवरील त्यांचे लेखन अमान्य असल्याचे सांगितले. चरणांकित तीर्थस्थाने[संपादन] • पिंगळभैरव देवस्थान, अचलपूर • वटेश्वर निद्रास्थान वडनेर-भुजंग • सर्पद्वयपतन स्थान वडनेर-भुजंग • वाळकेश्वर मंदिर, पातूर • उत्तरेश्वर मंदिर, आलेगाव • वाळकेश्वर मंदिर, आलेगाव • काटेशुक्रमबाबा संस्थान, काकडा • अष्टमासिद्धी देवस्थान • बारा घोडा स्थान - रिद्धपुर • भैरव बुरुज स्थान - रिद्धपूर • भिंगार जिल्हा अहमदनगर • विघ्नेश्वरी बाबा, येळवण, जिल्हा अकोला • श्रीक्षेत्र जाळीचा, बुलढाणा जिल्हा प्रमुख ग्रंथ[संपादन] आठवणी, दिनचर्या, स्थळवर्णन, व्यक्तिवर्णन, कथात्मक भावगीतसदृश, तात्त्विक व विवेचनपर अशी विविध प्रकारची रचना महानुभावांनी केली आहे. लीळाचरित्र, स्मृतिस्थळ, ऋद्धिपूरचरित्र, सिद्धान्तसूत्रपाठ, दृष्टांतपाठ व पूजावसर हे गद्यवाङ्‌मय एका धार्मिक प्रेरणेतून आल्याचे दिसते. या सर्व रचनेत चक्रधरांचे चरित्र व शिकवणूक हाच विषय प्राधान्याने आहे. बहुतेक गद्यग्रंथ संकलनात्मक आहेत. गद्यग्रंथ[संपादन] • लीळाचरित्र (म्हाइंभट, १२७८) • श्रीगोविंदप्रभूचरित्र / ऋद्धिपूरलीळा / ऋद्धिपूरचरित्र (म्हाइंभट, १२८८) • दृष्टांतपाठ (केशिराजबास, १२८०) • सिद्धांतसूत्रपाठ (केशिराजबास, १२९०) • पूजावसर (बाइदेवबास, १२९८) • स्मृतिस्थळ (संकलन, १३१२) • वृद्धाचार • वृद्धान्वय • मार्गरूढी पद्यग्रंथ[संपादन] • रुक्मिणीस्वयंवर (नरेंद्र, १२९३) • शिशुपाळवध (भास्करभट्ट बोरीकर, १३१२) • उद्धवगीता (भास्करभट्ट बोरीकर, १३१३) • वछाहरण (दामोदरपंडित, १३१६) • सह्याद्रि-महात्म्य (रवळोबास, १३५६) • ऋद्धिपूरवर्णन (नारो बहाळिए, १४१८) • ज्ञानप्रबोध (पं. विश्वनाथ बाळापूरकर, १४१८) • महदंबेचे धवळे (१२८६) • चरित्र अबाब वर दिलेल्या सूचीतील पहिल्या सात ग्रंथांना महानुभाव पंथामध्ये खास मानाचे स्थान असून ते सामूहिकपणे "साती ग्रंथ" या नावाने ओळखले जातात. महानुभावी वाङ्मय : एक मूल्यमापन[संपादन] महानुभाव पंथाच्या वाङ्मयीन कालमर्यादेच्या दृष्टीने इ. स. १३५० ते १६८० हा कालखंड म्हणजे त्या वाङ्मयाचा उत्तररंग ठरत असला तरी त्याला उत्तररंगाचे वैभव मात्र नाही; कारण या पंथाच्या वाङ्मयाचा ‘पूर्वरंग’ अतिशय समृद्ध आणि संपन्न आहे. वि. ल. भावे यांच्या महानुभाव वाङ्मयसूचीचे अवलोकन केल्यास आजमितीस त्याचा निम्माशिम्मा भागही प्रकाशित झालेला नाही हे लक्षात येते. त्यांच्या सूचीत नोंदलेले भाष्यग्रंथ, स्थळग्रंथ, लक्षणग्रंथ, टीपग्रंथ इत्यादी ज्या दिवशी मुद्रणाचा संस्कार घडून उपलब्ध होतील, त्या दिवशी या कालखंडाच्या संपन्नतेचा नेमका साक्षात्कार होऊ शकेल. महानुभाव पंथाने मराठी भाषेला ‘शास्त्र काट्याची कसोटी’ प्राप्त करून दिली आहे.

वारकरी संप्रदाय (संकलीत लेख,मराठी विश्वकोश )

वारकरी संप्रदाय : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. 'वारी करणारा' ह्या अर्थाने 'वारकरी' हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 'वारी' ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो 'वारकरी' असे म्हणता येईल.येरझारांमध्ये जी वारंवारता आहे, तीही येथे अभिप्रेत आहे. तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या ⇨ विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे, तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी ⇨ पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात. त्यांतही आषाढीला महत्त्व विशेष आहे. ज्यांना वर्षातून एकदाच-म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला-येणे शक्य असते, त्यांनी तसे केले तरी चालते; परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे, ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय. श्रीज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले. वारकरी संप्रदायाला 'माळकरी संप्रदाय' असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच; पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वल स्मरणी नव्हे. हा संप्रदाय ⇨ भागवत धर्मातच अंतर्भूत होतो. किंबहुना त्यास 'भागवत धर्म' असेही म्हटले जाते. भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात असून त्यात ⇨ विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल, हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे. ह्याच कारणासाठी पंढरपुरास 'दक्षिण द्वारका' असे संबोधण्यात येते. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे निर्देश श्रुतिस्मृतिपुराणांत आलेले नाहीत. विष्णुसहस्रनामांत तसेच विष्णुच्या मानल्या गेलेल्या चोवीस अवतारांत विठ्ठलाचा अंतर्भाव झालेला दिसत नाही. तथापि विठ्ठलाला इसवी सनाच्या अकराव्या-बाराव्या शतकांपासून असाधारण अशी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. विष्णूपासून विठ्ठल हे नाव बनले, असे मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. उदा., विष्णु-विष्टु-विठ्ठल असे विठ्ठल हे नाम तयार झाले, असे अनेक अभ्यासक मानतात. तथापि विठ्ठल हे विष्णूचे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठलभक्तीच्या क्षेत्रापुरते विष्णू हे 'विठ्ठल'चे (विठूचे) उद्भ्रषष्ट रूप होय, असे डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे मत आहे. त्यांच्या मते विठ्ठल हा देव एकेकाळचा लोकदेव असला पाहिजे आणि तो क्रमाने कीर्तिवंत होत गेल्यानंतर त्याचे वैदिकीकरण करण्यात आले. पंढरपूरच्या विठ्ठलाचे मूळ हे गोपजनीय परंपरेत आहे, असा विचार दुर्गा भागवत ह्यांनी ह्याहीपूर्वी मांडलेला आहे. [⟶ विठोबा]. वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख प्रचारक शं. वा. उर्फ सोनोपंत दांडेकर ह्यांनी वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्मांतर्गत एक पंथ असून वैदिक धर्माच्या तत्त्वांशी अतिशय जुळते घेणारा, असा पंथ असल्याचे म्हटले आहे. वारकरी पंथ म्हणजे सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी शाखा, असेही त्यांनी म्हटले आहे. पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय. विठोबा हे श्रीकृष्णाचेच रूप आहे, अशी सर्व संतांची धारणा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्णोपासकही आहेच. तथापि तो रामाचाही उपासक आहे. द्वारका, काशी ही क्षेत्रेही वारकरी पवित्र मानतात. तसेच चंद्रभागेप्रमाणेच इंद्रायणी, गोदावरी, कऱ्हा, तापी ह्या नद्यांनाही त्यांनी पवित्र मानले आहे. शिवाय सर्व हिंदूंनी पवित्र मानलेल्या गंगा, कृष्णा आदी नद्यांनाही ते पवित्र मानतातच. गीता, ⇨भागवतपुराण, ⇨ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरकृत हरिपाठ, संस्कृतातील भागवतपुराणाच्या एकादश स्कंधावरील ⇨संत एकनाथकृत⇨एकनाथी भागवत, भागवतपुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ अशा चार श्लोकांवर एकनाथांनीच लिहिलेले चतुःश्लोकी भागवत, एकनाथांचा हरिपाठ आणि ⇨ तुकारामांची अभंगगाथा, हे ग्रंथ वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत होत. त्यांतही ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची अभंगगाथा, ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली जाते. ह्या संप्रदायातील इतर संतांच्या रचनाही वारकरी अर्थातच आदराने वाचतात. वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी अगदी साधा असतो. ह्या संप्रदायात फड (प्रत्येक महंताच्या वा वारकरी साधूच्या भोवती असलेला त्याच्या शिष्यमंडळींचा समुदाय) असतात. दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याला अशा एखाद्या फडप्रमुखाकडून तुळशीच्या १०८ मण्यांची माळ घालून घ्यावी लागते. दीक्षेची पद्धत अशी : ही माळ आणून दीक्षा देणाऱ्या साधूकडे वा फडप्रमुखाकडे जावयाचे. तो ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याकडून घेतो. वर म्हटल्याप्रमाणे पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे. तसेच आळंदीची वारीही केलीच पाहिजे. संप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचारधर्माची कल्पनाही दीक्षा घेणाऱ्याला फडप्रमुख देतो. हे नियम असे आहेत : १. सत्य बोलावे. २. परस्त्रीला मातेसमान मानावे. ३. कांदालसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा. ४. मद्यपान वर्ज्य करावे. ५. रोज हरिपाठ करावा, तसेच 'रामकृष्णहरी' ह्या मंत्राचा जप करावा. ६. प्रपंचातील कर्मे श्रीविठ्ठलस्मरण करीत पार पाडावी. हे सर्व नियम पाळण्याचे कबूल करून ज्ञानेश्वरीवर ठेवलेली तुळशीच्या मण्यांची माळ तो भक्त उचलतो आणि 'पुंडलीक वरदा हरिविठ्ठल' ह्या गजरात गळ्यात घालतो. दीक्षाविधीच्या वेळी गळ्यात घातलेली ही तुळशीची माळ काही कारणाने तुटल्यास ती पुन्हा गुंफून गळ्यात घालीपर्यंत वारकऱ्याला अन्नसेवन करता येत नाही. वारकऱ्याच्या आचारधर्माचा आणखी एक भाग, म्हणजे त्याने गो पी चंदनाचा ऊर्ध्व पुंड्र लावून मुद्रा लावल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे द्वादश टिळेही लावले पाहिजेत. प्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून किमान एकदा तरी करतोच, तथापि ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर कार्तिक वद्य एकादशीसही वारकरी आळंदीला जाऊ लागले हा उल्लेख वर आलाच आहे. संत ⇨नामदेवांच्या (१२७० - १३५०) काळातच ही आळंदीवारी सुरू झाली. सासवड,त्र्यंबकेश्वर, एदलाबाद, पैठण, देहू, पिंपळनेर, आळबेल्हे इ. ठिकाणीही वारकऱ्यांची यात्रा भरते. त्या त्या स्थळी झालेल्या विशिष्ट संतांच्या वास्तव्यामुळे ही ठिकाणे पवित्र मानली गेली आहेत. तथापि विठ्ठलाच्या सर्व वाऱ्या शुद्ध पक्षातल्या असून भक्तांशी संबंधित असलेल्या स्थानी होणाऱ्या वाऱ्या वद्य पक्षातल्या आहेत. पंढरीची वारी : पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक मोटारीने वा आगगाडीसारख्या वाहनानेही जातात. एरव्ही ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटू शकतात. लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच; परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. पंढरपूरला आल्यानंतर सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करून श्रीपांडुरंगाचे व पुंडलिकाचे दर्शन घेतात. पंढरपुरात आल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी भक्तराज पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मग गावप्रदक्षिणा होते. उरलेला वेळ भजन-कीर्तनात जातो. इतर तीर्थांच्या तुलनेत पंढरपूरचे एक वैशिष्ट्य, म्हणजे इथे तीर्थोपवास करीत नाहीत, श्राद्ध, मुंडण हेही नाही. आषाढी आणि कार्तिकीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे शुद्ध दशमीपासून प्रत्येक फडावर भजन-कीर्तनांचा कार्यक्रम असतो. रात्री हरिजागर होतो. प्रत्येक वारकरी आपापल्या फडावर कीर्तनासाठी जात असला, तरी इतर फडांवरचे कीर्तन वा भजन ऐकायला कोणालाच मज्जाव नसतो. दशमीपासून चतुर्दशीपर्यंत असे कार्यक्रम चालु असतात. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पंढरपूरच्या दक्षिणेस, पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूर येथे काल्याचा कार्यक्रम असतो. गोपाळपूर हे एक वाडीवजा गाव आहे. तेथे गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. सतराव्या शतकात (१६६६) त्याचे बांधकाम सुरू झाले होते. शामजी अनंत नांदिवरेकर व त्यांचे आप्त ह्यांनी हे मंदिर बांधावयास आरंभ केला आणि गजेंद्र यशवंत नावाच्या व्यक्तीने ते बांधकाम पूर्ण केले. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाला काला दिला जातो. काल्याच्या लाह्या वारकरी परस्परांच्या मुखांत घालतात आणि त्यानंतर वारीची सांगता होते. घरी गेल्यावर कानवल्यांचे (मुरडीव) भोजन करतात. इतके झाले म्हणजे यात्रा संपते. विठ्ठलाच्या उपासनेत ह्या गोपाळकाल्याचे महत्त्व फार आहे. हा गोपाळकाला आणि वैदिक काळी पूषन् ह्या देवाच्या उपासनेसाठी बनविण्यात येणारा करंभ ह्यांच्यांत काही अभ्यासकांना एक निकटचे नाते जाणवलेले आहे. सातूचे पीठ आणि दही एकत्र करून हा करंभ तयार करीत. पंढरपूरचा विठ्ठलही ताकपिठाने संतुष्ट होतो. पंढरपूर येथील विठोबाच्या देवळाच्या पश्चिमेस एका बोळातल्या देवळात असलेला ताकपिठ्या विठोबा प्रसिद्धच आहे. पूषन् ह्या वैदिक देवाची दंतहीनता सोडली, तर त्याचे वर्णन गोपवेषधारी कृष्णाची आठवण करून देते. वृषभमुखाची काठी त्याच्या हातात असते. त्याने कांबळे परिधान केलेले असते. तो गाईगुरांची खिल्लारे राखतो आणि गोपजनांना वाट दाखवतो . वारीच्या कार्यक्रमात कीर्तने होत असतात, हे वर म्हटलेच आहे. श्रोत्यांच्या मनांत भक्तिरसाचा परिपोष करणे, तसेच संप्रदायाचा प्रसार करणे हे कीर्तनाचे महत्त्वाचे हेतू आहेत. थोर संत आणि वारकरी नामदेव हे आद्य कीर्तनकार मानले जातात. ' नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ' ही नामदेवांची भूमिका होती. भजनकीर्तनांच्या योगे विठ्ठलाची किर्ती त्यांनी भारतात अनेक ठिकाणी हिंडून पोहोचविली. सु.५४ वर्षे ते पंथप्रचारासाठी झटले. पंजाबात तर अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. नामदेवांनी हिंदी भाषेत रचले ली ६१ पदे शिखांच्या ⇨ ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत. वारकरी कीर्तन हरिदासी कीर्तनापेक्षा वेगळे असते. त्यात गाण्यापेक्षा भजनावर अधिक भर असतो. वारकरी कीर्तनाचीही पुर्वीची पद्धत आणि आजची पद्धत ह्यांत थोडा फरक आहे. राउळात जाऊन विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर देवाला पाठ न दाखविता भजन करीत मागेमागे जाऊन चंद्रभागेच्या वाळवंटात यायचे आणि मग कीर्तनास आरंभ करायचा, ही जुनी पद्धत होती. वारकरी संप्रदायातील विख्यात कीर्तनकार विष्णुबुवा जोग ह्यांनी ही पद्धत बदलली, कारण अशी कीर्तनपद्धती गावोगावी अवलंबिणे शक्य नव्हते. वारकरी कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तर रंग, असे दोन भाग विष्णुबुवा जोगांनीच केले. मुळात वारकरी कीर्तने नदीच्या वाळवंटात होत, ह्याचे पुरावे संतांच्या अभंगांतून मिळतात. कीर्तनात निरूपण असल्यामुळे त्या कीर्तनास कीर्तन म्हणण्याऐवजी निरूपण म्हणण्याची पद्धत वारकरी संप्रदायात आहे. वारकरी कीर्तन प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी मृदंगाच्या साथीवर टाळकऱ्यांचे भजन चालू असते. हातात वीणा घेतलेला एक वारकरी निरनिराळ्या संतांचे अभंग सांगतो आणि इतर ते म्हणतात. कीर्तनकार बुवा आल्यानंतर ते वीणेकऱ्याला व श्रोत्यांना नमस्कार करून वीणा स्वतःच्या गळ्यात घालतात. नंतर'जयजय रामकृष्ण हरी' च्या घोषात कीर्तन चालू होते. नमनाला ज्ञानदेवांचा 'रूप पाहतां लोचनी। सुख जालें वो साजणी' हा किंवा संत तुकारामांचा 'सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी' हा अभंग घेतात. त्यानंतर निरूपणाचा अभंग सुरू होतो. ज्ञानोबांपासून निळोबांपर्यंत झालेल्या संतांचेच अभंग निरूपणासाठी घ्यायचे, असा दंडक आहे. तथापि संत रामदासांचे अभंग निरूपणासाठी कधीही घेतले जात नाहीत. त्याचप्रमाणे जेथे कीर्तन करायचे, तेथे अन्न घ्यायचे नाही, असाही दंडक आहे. निरूपणाचा अभंग म्हणून झाल्यानंतर एखादा वारकरी बुवांच्या सांगण्यावरून तोच अभंग रागदारीत गातो. हे अभंगगायन चालू असताना कीर्तनकार बुवांनी आरंभी ज्याच्या हातून वीणा घेतलेली असते, तो वीणेकरी बुवांच्या हातून वीणा घेऊन आपल्या गळ्यात घालतो. कीर्तनाच्या गादीचा मान म्हणून वीणा देताघेताना बुवा व वीणेकरी एकमेकांच्या पाया पडतात. वारकरी कीर्तनात वीणेचे महत्व विशेष आहे. भजन संपल्यानंतर 'पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय' असा घोष करतात. शेवटी निरूपणाच्या अभंगाचा भावार्थ बुवा सांगतात. येथे कीर्तनाचा पूर्वरंग संपतो. उत्तररंगात निरूपणाच्या अभंगाचे सखोल आणि सविस्तर विवेचन केले जाते. नारदीय कीर्तनातील उत्तररंगात आख्यान लावण्याची पद्धत आहे, तशी ती वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात नाही. सोनोपंत दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर आणि बाबामहाराज सातारकर, हे थोर वारकरी कीर्तनकारांपैकी काही होत. वारकरी संप्रदायातील फडांचा उल्लेख पूर्वी येऊन गेला आहे. एकनाथ व तुकोबा ह्यांच्या पूर्वी फड असावेत; परंतु वारकरी संप्रदायातील एक संत विठोबा पिंपळनेरकर ह्यांच्या शिष्याचे शिष्य, वाशीचे मल्लाप्पा वासकर (१६३१-१७२१) ह्यांनी फडांना प्रथम संघटित स्वरूप दिले. ह्या फडाला वारकरी पहिला मान देतात. त्यानंतर देहूकरांचा फड निघाला. अझरेकर, बेलापूरकर, ठाकरबुवा, गंगूकाका शिरवळकर, धोंडोपंतदादा कऱ्हाडकर, दादामहाराज सातारकर, बंकटस्वामी इत्यादींचेही फड आहेत. वारकरी संप्रदायात पालख्यांचा सोहळा असतो. एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या हैबतरावबाबा आरफळकर ह्यांनी तो वाढविला. त्यांच्या पूर्वी ज्ञानदेवांच्या पादुका गळ्यात घालून दिंडी पंढरपूरला नेली जाई. आरफळकर हे सातारा जिल्ह्यातले.वारकऱ्यांत प्रसिद्ध असलेली भजनीमालिका ह्यांचीच. हैबतरावबाबांना खंडोजीबाबा नावाच्या एका सज्जनाची खूपच मदत होत असे. त्यांची समाधी पुण्याला आहे. ज्ञानदेवांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जाणाऱ्या अन्य संतसज्जनांच्या पालख्या अशा (त्या त्या संताची वा सत्पुरुषाची पालखी कोठून निघते हे त्या त्या संताच्या वा सत्पुरुषाच्या नावासमोर कंसात दिलेले आहे) : निवृत्तिनाथ (त्र्यंबकेश्रर), तुकाराम महाराज (देहू), एकनाथ (पैठण),सोपानकाका (सासवड), मुक्ताबाई (एदलाबाद), नामदेव(पंढरपूर), नरहरी सोनार(पंढरपूर), जनार्दनस्वामी (औरंगाबाद), जयरामस्वामी (वडगाव), शेकूबोवा (शिरसावडी), घाडगेबोवा (कोळे), तपकिरीबोवा (चिंचगाव), मच्छिंद्रनाथ (मच्छिंद्रगड), रोहिदास (पंढरपूर), संताबाई (पंढरपूर), चोखोबा (पंढरपूर), चोखोबा बंका (मेहुणपुरा), दामाजी (मंगळवेढे), रुकमाबाई (कोंडणपूर-अमरावती), शंकर महाराज (माहुली-अमरावती), गोरखनाथ(शिराळा) इत्यादी. वारकरी संप्रदायाचा इतिहास : हा संप्रदाय नेमका केव्हा उगम पावला, हे सांगता येत नाही. ⇨संत बहिणाबाईनी (१६२८-१७००) 'संतकृपा जाली । इमारत फळा आली' ह्या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे, ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत तुका जालासे कळस । भजन करा सावकाश तथापि पंढरपूरची वारी ही ज्ञानदेवांच्या पूर्वीही चालू होती, असे दिसते. ज्ञानदेवांचे वडील बरीच वर्षे पंढरीची वारी करीत असत, असे म्हटले जाते. पंढरपूर येथे विठ्ठलाचे देवस्थान केव्हापासून अस्तित्वात आले ह्याचा निश्चित निर्णय होऊ शकला, तर ती बाब वारकरी सप्रंदायाच्या आरंभाचा काल निश्चित करण्यास साहाय्यभूत होऊ शकेल, आईवडिलांची परमभक्ती करणाऱ्या पुं डलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव पंढरपूरला आला, तेव्हा पुं डलिक आईवडिलांची चरणसेवा करीत होता, ती पुर्ण होईतो देवाने थांबावे, अशी विनंती त्याने केली आणि देवाला उभे राहण्यासाठी एक विट फेकली. ह्याच विटेवर कटी कर ठेवून देव विठ्ठलरूपाने उभा राहिलेला आहे, अशी सर्व संतांची श्रद्धा आहे. श्रीविठ्ठलाच्या कमरेवर हात ठेवण्याचे स्पष्टीकरण असे देतात, की भवसागर हा कमरेइतक्या पाण्यातून तरून जाता येईल इतका सोपा आहे, असे आश्वासन पांडुरंग आपल्या भक्तांना देत आहे. श्रीविठ्ठल पंढरपुरात कसा प्रकट झाला, ह्यासंबंधीची पुंडलिकाशी संबंधित अशी कथा हेमाद्रीपूर्व स्कांद पांडुरंगमाहात्म्यात आलेली आहे, परंतु अभ्यासकांनी खूप धडपड केल्यानंतरही हा पुं डलिक त्यां ना इतिहासात सापडलेला नाही. त्यामुळे विठ्ठलमंदिराच्या उभारणीचा कालनिर्णय करण्यासाठी पुंडलिकाची कथा उपयोगी पडत नाही . पंढरपूरची तीन संस्कृत स्थळपुराणे आज उपलब्ध आहेत: (१)स्कंद पुराणांतर्गत असल्याचा दावा सांगणारे पांडुरंगमाहात्म्य (स्कांद पांडुरंगमाहात्म्य), (२) पद्मपुराणांतर्गत असल्याचा दावा सांगणारे पांडुरंगमाहात्म्य (पाद्म पांडुरंगमाहात्म्य) आणि विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा सांगणारे पांडुरंगमाहात्म्य, ह्या तीन स्थळपुराणांपैकी स्कांद पांडुरंगमाहात्म्य हे निवृत्ति-ज्ञानदेवादी संतांच्या उदयापूर्वी आणि काटेकोरपणे सांगायचे, तर हेमाद्री पंडितापूर्वी रचिले गे लेले आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरचा विठ्ठलप्रधान पावित्र्यसंभार प्रथमतः ह्याच ग्रंथामुळे स्थिर पायावर उभा झाला आहे, असे दिसते. देवगिरीचा राजा श्रीरामदेवराव यादव ह्याचा करणाधिप हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत ह्याने रचिलेल्या ⇨चतुर्वर्गचिंतामणी (रचनाकाल १२६० ते १२७० च्या दरम्यान) ह्या ग्रंथाच्या 'तीर्थखंडा'त स्कांद पांडुरंगमाहात्म्यातील श्लोक अंतर्भूत होते. चतुर्वर्गचिंतामणीचा तीर्थखंड आज अनुपलब्धच असला, तरी हे श्लोक हेमाद्रीने त्यात उद्धृात केले होते, हे दाखविणारा पुरावा मिळतो. त्याचा विचार करून म. म. काणे ह्यांनी आपल्या धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या चौथ्या खंडात पंढरपूरविषयी चर्चा करताना म्हटले आहे, की १२६० पूर्वी अनेक शतके पंढरपूरचा तीर्थमहिमा गाजत होता आणि भक्त पुंडलिकाची कथा तेव्हाही प्रसिद्ध होती. ह्यावरून हे मंदिर फार पुरातन असले पाहिजे आणि वारकरी पंथही बराच प्राचीन असला पाहिजे, असा निष्कर्ष निघतो. ह्या पार्श्वभूमीवर'ज्ञानदेवे रचिला पाया' ह्या ओळीचा अर्थ पाहिला, तर ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, ह्याचा अर्थ ह्या संप्रदायाला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाचे अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले, तसेच त्यांच्या रूपाने ह्या संप्रदायाला चैतन्याचा एक महास्त्रोत येऊन मिळाला, असा घेता येईल. वर्णाश्रमधर्माच्या चिवटपणाचा अत्यंत कटू अनुभव ज्ञानेश्वरांना, त्यांच्या आईवडिलांना आणि भावं डांना आलेला होतो. समाजाने झिडकारणे किती दुःखद असते, ह्याचा अनुभव ह्या सर्वांनी घेतला होता आणि ह्यातूनच समाजातील शुद्रातिशूद्रांबद्दल त्यांच्या मनात अपार करूणा निर्माण झाली. वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत असलेला आणि 'ब्रह्यविद्येचा सुकाळू' करणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी सर्वांसाठी मराठी भाषेत लिहिला. अध्यात्मविद्या ही काही मूठभरांची मक्तेदारी नसून सामान्यांतला सामान्य माणूसही ती आत्मसात करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांनी पारंपरिक समाजव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या माणसांतही निर्माण केला. ज्ञानेश्वरांची गुरूपरंपरा नाथपंथीय होती. अद्वयानंदाचे वैभव, अष्टांगयोग, दलितांच्या उद्धाराची प्रेरणा आणि देशी-मराठी-भाषेचा पुरस्कार, हा नाथपंथाचा प्रभावशाली वारसा होय. शांकर वेदान्त आणि काश्मिरी शैवमताचे संस्कारही त्यांच्यावर होते. तथापि ह्या संस्कारांतून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र जीवनाविषयक दृष्टिकोण निर्माण केला. ज्ञानदेवांचेच समकालीन नामदेव हे वारकरी पंथाचे आद्य प्रचारक होत. पंथप्रचारासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली. महाराष्ट्राबाहेरही त्यांचा शिष्यपरिवार निर्माण झाला. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानाचा भक्कम पाया मिळवून दिला. नामदेवांची भूमिका तत्वचिंतकाची नसली, तरी लडिवाळ लेकराने मातेवर प्रेम करावे, तशी ईश्वरभक्ती करण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. ज्ञानदेव-नामदेवांनी बहुजनसमाजा च्या आध्यात्मिक आकांक्षांना जागे केले. त्या समाजातील माणसांना आत्माविष्काराची वाट मोकळी करून दिली. विठ्ठलभक्तिने भारलेले विविध जातींचे लोक विठ्ठलभक्तिने भारा वलेल्या रचना करू लागले. ⇨गोरा कुंभार (१२६७-१३१७), ⇨सावतामाळी (१२५०-९५), ⇨ नरहारी सोनार (मृ.१३१३), ⇨ चोखामेळा (मृ.१३३८), ⇨ सेना न्हावी (तेरावे शतक) इ. संतांची एक मालिकाच उभी राहिली. वेगवेगळ्या व्यवसायांतले हे संत होते आणि त्यांनी आपल्या अभंगरचनेसाठी आपापल्या व्यवसायातली परिभाषा वापरली वा आपापल्या व्यवसायांचे संदर्भ दिले. उदा, केशवाचे ध्यान धरूनि अंतरी । मृत्तिकेमाझारी नाचतसे विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ । नेत्री वाहे जळ सद्गदीत कुलालाचे वंशी जन्मले शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त (गोराकुंभार) कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा (सांवता माळी) देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने त्रिगुणाची करूनी मूस । आत ओतिला ब्रह्मरस जीव शीव करूनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी विवेक हातवडा घेऊन । काम क्रोध केला चुर्ण मनबुद्धिची कातरी । रामनाम सोने चोरी ज्ञान ताजवा घेउन हाती। दोन्ही अक्षरे जोखिती खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस (नरहरी सोनार) आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत (सेना न्हावी) संतश्रेष्ट चोखामेळा जातीने महार. त्यांचे सारे कुटुंब-पत्नी सोयरा, बहिण निर्मला, मुलगा कर्ममेळा व मेहूणा बंका-विठ्ठलभक्त होते. तथापि चोखामेळा ह्यांच्या अभंगांतून सामाजिक विषमतेमुळे त्यांना बसत असलेले चटके स्पष्टपणे दिसुन येतात. उदा., हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा । मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटू कवण्या रीती ।। चातुर्वर्ण्य, जातपात, सोवळेओवळे, विटाळ ह्यांतून पदरी येणारी मानहानी सोसत असतानाच त्यांनी त्याबद्दल आपला निषेधही व्यक्त केला. ज्यालात्याला लाभलेला जड देह आणि चैतन्यमय आत्मा हे मुळातच भिन्न आहेत. पंचभूतात्मक देहामुळे विटाळ निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या देहात जन्मापासून मरेपर्यत विटाळच साचून राहिलेला असताना 'सोवळा वोवळा तो कोण?' आणि ‘विटाळापरते आहे कोण ?’ असा मार्मिक प्रश्न त्यांनी एका अभंगात विचारला आहे. 'आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध । देहाचा विटाळ देहीच निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ।।' असे उद्‌गार चोखामेळ्यांच्या पत्नी सोयराबाई ह्यां नीही एका अभंगात काढले आहेत. वारकरी संतां नी चातुर्वर्ण्याच्या आणि जातिव्यवस्थेच्या चौकटीविरुद्ध बंड उभारले नाही. तथापी आध्यात्मिक समता निश्चितपणे प्रस्थापित केली . देवाला सर्व भक्त सारखे, हीच शिकवण दिली. 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।। ' ह्या तुकोबांच्या उक्तीमध्ये ही अभेदभावाची भूमिकाच स्पष्ट झालेली आहे. चोखोबांच्या समाधी पुढे संत एकनाथ नतमस्तक झाले, तसेच अन्य वारकरीही होतात. वर्णाश्रमधर्माच्या कठोर चौकटीचा जाच ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांनाही सोसावा लागला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना सामाजिक प्रतिष्ठा दिली नाही; ब्राह्मणही मानले नाही . तथापि त्या काळातील परिस्थितीचे भान ठेवून ज्ञानेश्वरांनी केवळ धार्मिक जीवनातच समता आणण्याचा प्रयत्न केला . बौद्ध-जैनांनी चातुर्वर्ण्याविरुद्ध केलेले बंड अयशस्वी झाल्याचेही त्यां ना दिसले होते. समाजरचनेशी निगडीत असलेली तत्कालीन अर्थव्यवस्थाही केवळ विचारांच्या परिवर्तनाने मुळापासुन बदलता येणे शक्य नव्हते. त्यामुळे फक्त धार्मिक क्षेत्रातील भेदभाव नष्ट करण्याची भूमिका घेऊन बहुजनसमाजाच्या आध्यात्मिक विकासासाठी त्यां नी वारकरी पंथाला वेगळे वळण दिले. ज्ञानदेव-नामदेवांनंतर मात्र जवळपास अडीचशे वर्षाचा काळ एखाद्या तमोयुगासारखा गेला. देवगिरीच्या यादवांचे राज्य गेले आणि इस्लामी सत्तेचा अंमल सुरू झाला. बहमनी राज्य आणि विजयानगरचे राज्य ह्यांच्यात सतत चाललेल्या लढायांमुळे शांतता आणि स्वास्थ्य मिळेनासे झाले. ह्याचा परिणाम वारकरी संप्रदायावरही झाला. ज्ञानदेव-नामदेवांनी चालविलेल्या कार्याची आध्यात्मिक धुरा समर्थपणे खांद्यावर घेऊन ते पुढे नेईल, असा महान संत ह्या काळात झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे नाव घेण्यासारखा थोर ग्रंथही रचिला गेला नाही, तथापि विजयानगरचे साम्राज्य लयाला गेल्यानंतर आणि बहमनी राज्याचे विघटन होऊन पाच वेगवेगळ्या शाह्या निर्माण झाल्यानंतर परिस्थितीत बदल घडून आला. ह्या शाह्यांतील वैमनस्यामुळे मराठे जहागिरदार आणि मुत्सद्दी ह्यांचे सहकार्य मिळविण्याची गरज त्यांना वाटू लागली. त्यामुळे मराठ्यांच्या पराक्रमास वाव मिळाला. त्यां चा आत्मविश्वास वाढला. वातावरणात झालेल्या ह्या परिवर्तनामुळे धर्माच्या क्षेत्रातही उत्साहाचे वारे वाहू लागले. एकनाथांच्या कार्याला ह्या परिस्थितीची पार्श्वभूमी होती. श्रीज्ञानदेवांची गुरूपरंपरा जशी नाथपंथाची, तशीच एकनाथांची दत्तसंप्रदायाची होती. त्यांचे गुरू जनार्दनस्वामी हे दत्तोपासक होते, परंतु विठ्ठलभक्त्तीची कौटुंबिक परंपराही त्यांच्या पाठीशी होती. एकनाथांचे पणजे संत भानुदास (१४४५-१५५३) हे विठ्ठलभक्त होते. 'आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ।। ' असे उद्‌गार त्यांनी आपल्या एका अभंगात काढले आहेत. भानुदासांच्या बाबतीत एक आख्यायिका अशी आहे, की विजयानगरचा राजा कृष्णराय ह्याने पंढरपूरची विठ्ठलमूर्ती विजयानगरला नेली होती; परंतु संत भानुदासांनी ती परत आणली. स्वतः एकनाथांनी भानुदासांविषयी जी माहिती दिली आहे, तीत विजयानगरहून विठ्ठलमूर्ती परत आणल्याची हकिकत नाही, पण भानुदासांच्या जवळजवळ समकालीन असा राजा कृष्णराय ह्याची वृत्ती निरनिराळ्या ठिकाणांहून देवमूर्ती आणून त्यांची विजयानगरात स्थापना करण्याची होती, ह्याबद्दल विपुल पुरावा मिळतो. कदचित भानुदासांना त्याने त्या मूर्तीसारखीच दुसरी मूर्ती तयार करुन दिली असणे शक्य आहे, असे मत ग. ह. खरे ह्यांच्यासारख्या इतिहास संशोधकानी व्यक्त केले आहे. विठ्ठलभक्तीची पार्श्वभूमी पाठीशी असल्यामुळे, एकनाथां च्या हातून वारकरी संप्रदायाच्या संदर्भातही भरीव कामगिरी घडून आली. गीतेचा अर्थ मराठीत सांगून तो सर्वसामान्यांपर्यं त पोहोचविण्याची कामगिरी ज्ञानेश्वरांनी केली. त्याचप्रमाणे नाथांनी भागवतपुराण मराठीत आणण्याचा उद्योग केला. ह्या उद्योगास पैठणच्या तसेच काशीच्या सनातनी विद्वानांचा असलेला विरोध नाहीसा करून नाथांनी एकनाथी भागवत काशीतच पुर्ण केले. हे देशभाषा वाणी । उघडिली परमार्थाची खाणी । हे टीका तरी मराठी । ज्ञानदाने होईल लाठी ।। असे उद्‌गार नाथांनी एकनाथी भागवतात काढलेले आहेत. त्याचप्रमाणे 'संस्कृत भाषा देवे केली । तरी प्राकृत काय चोरापासोनी झाली?' असा सवालही त्यांनी विचारला आहे. तथापि एकनाथांनी संस्कृतचा अनादर कधीच केला नाही. उलट त्या भाषेतील शब्दांचे ऐश्वर्य मराठीला श्रीमंत आणि भारदस्त करण्यासाठी त्यांनी उपयोगात आणले कटुता आणणारा अभिनिवेश न बाळगता नव्याजुन्यांचा मेळ घालण्याची जी शक्ती नाथांच्या ठायी होती, तिच्यामुळेच सनातन्यांना न दुखविता ते त्यांच्या सद्भामवनेस हात घालू शकले. एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधीचा जीर्णोद्वार केला, तसेच ज्ञानेश्वर-नामदेवांच्या काळानंतर आलेल्या तमोयुगात अनेक अशुद्धे शिरलेली ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली. ह्या संदर्भात एक आख्यायिका अशी आहे, की ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी असलेल्या अजानवृक्षाची मुळी समाधिस्थ ज्ञानेश्वरांच्या गळ्याशी अडकली आहे, असा दृष्टांत एकनाथांना ते आळंदीस असताना स्वप्नात झाला. जागे होऊन ते समाधीजवळ गेले तेव्हा स्वप्नात जे दिसले, ती वस्तुस्थितीच असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळेच ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्वार करण्याची, तसेच ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध करण्याची प्रेरणा त्यां ना मिळाली. ह्या आख्यायिकेतील अजानवृक्ष म्हणजे एकनाथांच्या काळी ज्ञानेश्वरीबाबत जनतेत पसरलेले अज्ञान होय, असा अर्थ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी लाविला आहे. ज्ञानेश्वरीच्या मूळ संहितेत पुन्हा कोणी बदल करण्यास धजावू नये, म्हणून एकनाथांनी इशारा देऊन ठेविला,की'ज्ञानेश्वरीपाठी । जो वोवी करील मऱ्हाठी । तेणे रत्नखचिताचिया ताटी । जाण नरोटी ठेविली ।। ' लोकाभिमुखता हे वारकरी संप्रदायाचे एक फार मोठे वैशिष्टय होय. एकनाथांच्या जीवनातूनही ह्याचा प्रत्यय येतो. परमार्थविचाराच्या व्यापक प्रसारासाठी देशी भाषेतून ग्रंथरचना करणे, हा ज्ञानेश्वरांप्रमाणेच एकनाथांच्याही लोकाभिमुखतेचाच आविष्कार होता. तथापि एकनाथ हे केवळ एकनाथी भागवत रचून थांबले नाहीत, तर परमार्थविचार जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी त्यांनी कथात्मक रचनाही केली, ⇨भारूडासारख्या लोककाव्याचेही पुनरूज्जीवन केले. त्यातून लोकशिक्षण आणि मनोरंजन ह्यांची उत्तम सांगड घातली. विनोदाचाही वापर केला. कोल्हाटी डोंबारी, भुत्या, वाघ्या, चोपदार, कुंटीण, वंजारीण इ. समाजाच्या विविध थरांतील लोकांच्या दैनदीन कर्मांच्या वा व्यवसायांच्या परिभाषेतही त्यांनी आपली रचना केली. स्त्री-शूद्रांचा त्यांनी कैवार घेतला. सर्वांवर प्रेम करणे आणि दुःखितांची कणव करणे, हे त्यांनी आयुष्यभर केले. महाराच्या मुलास कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचविणे, महाराच्या घरी जेवावयास जाणे, दोनचार भुकेले महार दिसताच वडिलांच्या श्राद्धासाठी केलेला स्वयंपाक त्यांना खाऊ घालणे, काशीहून आणलेली गंगा तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाच्या मुखी घालणे इ. अनेक कथा त्यांच्यासंबंधी प्रचलित आहेत. परमार्थ साधण्यासाठी प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही, हे एकनाथांनी स्पष्ट केले आहे. ‘प्रपंचपरमार्थी सावधान । उभयता दीसो नेदी न्यून ’ असं त्यांनी म्हटले. समाधीबद्दलचीही त्यांची कल्पना वैशिष्टयपूर्ण आहे. ताटस्थ्य म्हणजे समाधी नसून ती नुसती मूर्च्छा आहे. धकाधकीच्या जीवनात जी भंग पावत नाही, ती खरी समाधी होय, अशी त्यांची धारणा होती. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे वर्णन करीत असताना संत बहिणाबाईंनी ‘तुका झालासे कळस ’ असे सार्थ उद्‌गार काढले आहेत. कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची परिपूर्ती तुकारामांच्या जीवनात आणि साहित्यात झालेली होती. अनन्य भक्ती आणि पारमार्थिक समता ह्यांच्या मुशीत भागवत धर्माने ओतलेली सुवर्णमुर्ती म्हणजे तुकाराम, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी म्हटले आहे. तुकारामांच्या जीवनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे ते हळूहळू, आध्यात्मिक प्रवासाचा एकेक टप्पा पार करीत'अणुरणीया थोकडा । तुका आकाशाएवढा।। ' अशी प्रचीती घेण्याइतके मोठे झाले. अभंगाच्या द्वारे आपल्या अनुभवांचे खडे बोल ऐकवीत त्यांनी सामान्यांना परमार्थबोध केला. त्यांच्या अभंगातून वारकरी संप्रदायाचीच भूमिका व्यक्त झालेली आहे : भरणी आली मुक्त पेठा । करा लाटा व्यापार । उधार घ्यारे उधार घ्यारे। अवघे या रे जातीचे । येथे पंक्ति भेद नाही। मोठे काही लहान । तुका म्हणे माल घ्यावा । मुद्दल भावा जतन ।। उत्तम चारित्र्य, धर्मनिष्ठा, भूतदया, सदाचार आणि नीती ह्यांचाच वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव आहे. तुकोबांनी आपल्या अभंगातून तेच संस्कार जनमानसावर केले. तुकोबांच्या अनुयायांत अनेक जातींचे लोक होते आणि त्यांचे शिष्य म्हणविणाऱ्या प्रमुख सोळाजणांत नऊ ब्राह्मण होते, ही बाबही लक्षणीय आहे. निळोबा पिपंळनेरकर (मृ. सु. १७५३) हे तुकारामांचे परमभक्त होत. ह्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूरचा, परंतु अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर ह्या गावी ते स्थायिक झाल्यामुळे पिं पळनेरकर म्हणून ओळखले जाऊ लागले. तुकारामांना त्यानी प्रत्यक्ष पाहिले नव्हते. परंतु त्यानी तुकोबांची परंपरा पुढे चालविली. त्यानी लिहिलेल्या अभंगां ची संख्या सु. १,३०० भरेल. वारकरी पंथातले शेवटचे अधिकारी संतकवी म्हणून ते मानले जातात. महीपती बोवा ताहराबादकर ऊर्फ ⇨महीपती (१७१५-९०) हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे ग्रंथकार होत. संतांच्या आणि भक्तांच्या चरित्राचे लेखन त्यांनी केले. कुलकर्णी, अ. र. तत्त्वज्ञान : वारकरी संप्रदाय हा मूलतः भक्तिपंथ आहे; म्हणून त्याला आधारभूत असलेल्या तत्त्वज्ञानात पांडित्याचा प्रपंच नाही. भक्तिरसात न्हालेल्या संतांचा अनुभव, हेच त्या तत्त्वज्ञानाचे अंतिम प्रमाण होय. सकृद्दहर्शनी असे वाटते, की भक्तीचे समर्थन करणारे तत्वज्ञान मध्वाचार्यांच्या मतासारखे द्वैतवादी असावयास हवे. देव हा भक्ताहून वेगळा असल्याशिवाय त्याची भक्ती करावयाची कशी ? केवलाद्वैत वेदान्ताच्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्याच केवळ सत्य असले आणि मीच ब्रह्मा असेन, तर भक्ती करावयाची कोणी आणि कुणाची? ही अडचण वारकरी संतांस वाटली नाही. त्यांना स्वसंवेद्न आत्मतत्वाचे अद्वैत मान्य होते. भक्ती हा केवळ त्या अद्वैताचा अनुभव घेण्याचा मार्ग होता असे नाही, तर त्या अनुभवाच्या मुक्कामाला पोहोचल्यावरसुद्धा भक्तीसुखाचा सोहळा त्यांना हवा होता. 'मोक्ष तुमचा देवा । दुर्लक्ष तो तुम्ही ठेवा । मज भक्तीची आवडी ।' असे तुकारामांनी म्हटले आहे. भक्ती हा पाचवा पुरषार्थ आहे आणि तो परमपुरषार्थ आहे. 'चहू पुरूषार्थाचे माथा । भक्ती सर्वथा मज पढियंती ' असे नाथांनी म्हटले आहे (एकनाथी भागवत ११.६६७). ज्ञानेश्वरीत (१८.८६७) म्हटले आहे, 'चहू पुरूषार्था शिरी । भक्ती जैसी ' तेव्हा ह्या परमपुरूषार्थाचे समर्थन करणे, हे वारकरी तत्त्वज्ञानाचे प्रधान प्रयोजन आहे, अनुभवामृतात ज्ञानेश्वरांनी अशा आशयाची ओवी लिहिली आहे की, एकच डोंगर कोरून त्यातून देव, देऊळ व परिवार निर्माण करतात, त्याच रीतीने एकाच आत्मतत्त्वाच्या विलासातून भक्तिचा व्यवहार होऊ शकतो. हा चिद्विलासवाद म्हणजेच वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान होय. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकारामांची गाथा हे तीन ग्रंथ म्हणजे, या तत्त्वज्ञानाची प्रस्थानत्रयी होय असे सांप्रदायिक म्हणतात, पण हा उपचार आहे. या ग्रंथांतून ते तत्त्वज्ञान अनुस्यूत आहे, असे म्हणता येईल, पण युक्तिवादपूर्वक, थोडासा पूर्वोत्तरपक्ष करून त्याची पद्धतशीर मांडणी ज्ञानेश्वरांनी अनुभवामृतात केलेली आहे. सारांशाने ते तत्त्वज्ञान असे : सर्वत्र केवळ एका आत्मतत्त्वाचे-म्हणजे चैतन्याचे-स्फुरण आहे. ते स्वसंवेद्य आहे.म्हणजे त्याच्या अस्तित्वाला कोणताही बाह्य पुरावा लागत नाही. त्यास ‘असत् ’ असे म्हणताच येणार नाही. कारण जो म्हणणारा तेच आत्मतत्त्व होय. त्याच्या अभावाचे भान होणार नाही. कारण भान (चित्) हेच त्याचे स्वरूप होय. हे चैतन्य आनंदरूप आहे, असा संतांचा अनुभव आहे. पण कापरामध्ये ज्याप्रमाणे शुभ्रता, सुगंध व मृदुता ही एकमेकांहून विलग नसतात, त्याच रीतीने चैतन्य, असतेपणा व आनंद ही आत्मतत्त्वात एकरूप असतात. हे आत्मतत्त्व एक असले, तरी क्रीडेसाठी देव आणि देवी या स्वरूपात ते आविष्कृत होते. जगताची ही मातापितरे आवडीमुळे एकमेकांत मिळतअसतात. त्यांच्यापासून जगाची निर्मिती होते. शंकराचार्याच्या अद्वैत वेदान्तात मानले आहे, की सच्चिदानंद-स्वरूपी ब्रह्मास अज्ञानाची उपाधी आहे आणि जगत् हे त्या भावरूप अज्ञानाचे कार्य आहे. पण ज्ञानेश्वरांनी या अज्ञानाचा 'धांडोळा' घेऊन त्याचे जगत्कारणत्व नाशाबीत केले आहे. अज्ञानाला कारण मानल्यास त्याचा आश्रय सांगावा लागेल. चैतन्य किंवा ज्ञान हा त्याचा आश्रय आहे, असे म्हणणे म्हणजे प्रकाशाला टेकून अंधार उभा आहे, असे म्हटल्यासारखे होईल. जगत् हे अज्ञानमुलक नसल्याने ते असत्य अथवा मिथ्या नाही. ते चैतन्याचा विलास आहे. स्वप्रीत्यर्थ ते नित्य नव्या रूपाने प्रगट होते. पाणी स्वतःमध्ये कल्लोळ निर्माण करून खेळत असते. तो कल्लोळ मिथ्या नव्हे अथवा पाण्याहून अन्य नव्हे. पाणी पाण्यास पिऊ शकत नाही. तृष्णेचे समाधान करण्याचे सामर्थ्य अंगी असूनही पाण्यास ते समाधान अनुभवता येत नाही. द्वैताची अपेक्षा आहे. चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या सुखाचा अथवा प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी जीवरूपाने ते प्रकट होते. जीवाला अहंभाव टाकून तद्रूप झाल्याशिवाय ते प्रेमसुख मिळत नाही. राजा असल्यानेच राजेपण उपभोगता येते. भक्ति हा बाह्य संबंध नाही. सुगंधच घ्राणेद्रिय झाले, असे उत्कट भक्तिचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. भक्तीचा हा अनुभव म्हणजे परमपुरूषार्थ होय. या भक्तिची गोडी एकांतात नसून संतांच्या संगतीत आहे. 'नलगे मुक्ती, धनसंपदा । संतसंग देई सदा । ' ही तुकारामांची उक्ती सर्वपरिचित आहे. 'झणी मुक्तीपद देशी पांडूरंगा । मग या संतसंगा कोठे पाहू । ' असे नामदेवांनी म्हटले आहे. लोकप्रियता : वारकरी संप्रदायाला जी अमाप लोकप्रियता मिळाली, तिची काही स्पष्ट कारणे आहेत. सर्वसामान्यांशी ह्या पंथाने अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जोडले उत्कट भक्ति, सदाचार, नीती ह्यांवर आधारलेला सरळमार्गी आचारधर्म ह्या संप्रदायाने सांगितला. कर्मकांडांना थारा दिला नाही. वारकऱ्यांची विठ्ठलभक्ती ही प्रवृत्तिपर आहे. समाजधारणेला पोषक होणारी कर्मे सोडण्याचा उपदेश ह्या संप्रदायाने आपल्या अनुयायांना कधीच केला नाही. कर्मबंधनाची यातायात टाळण्यासाठी प्रत्यक्ष कर्माचा त्याग केला पाहिजे, अशी ज्ञानेश्वरांचीही भूमिका नव्हती. नैष्कर्म्य आणि निष्क्रियता ह्यांत त्यांनी भेद केला. 'जे चालणे वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्यालागी ।।' असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे (ज्ञानेश्वरी १८.१५३). वाटसरूने चालताना जलद पाऊल ऊचलले, तर त्यामुळेच तो मुक्कामी लवकर पोहोचतो आणि त्याला विश्रांती मिळू शकते. त्याचप्रमाणे कर्माचे भरपूर आचरण नैष्कर्म्याच्या कामी येते. असा ह्या ओवीचा अर्थ आहे. जनाबाईच्या दळणकांडणादी नित्यकर्मात प्रत्यक्ष विठ्ठलाने येऊन त्यांना मदत करावी किंवा एकनाथांच्या दारी पांडूरंगाने श्रीखंड्या होऊन राहावे, ह्या आख्यायिका ह्या संदर्भात बोलक्या आहेत. वारकरी संप्रदायाने ज्ञानाचे महत्व कमी आहे, असे कधीच मानले नाही, परंतु भक्तीला अग्रस्थान दिले. केवळ नामसंकीर्तनानेही ईश्वराच्या जवळ जाता येते, हे आत्मविश्वासाने प्रतिपादिले. 'नलगे सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण।' असे तुकोवांनी म्हटले आहे. वारकरी संप्रदायाने अग्रस्थान दिलेल्या भक्तिभावनेचा अत्यंत उत्कट आविष्कार संत नामदेवांच्या रूपाने पहावयास मिळतो. एखाद्या लडिवाळ लेकरासारखे ते ईश्वराजवळ जाऊ पाहतात. देवावर रुसणे, त्याच्याकडे हट्ट धरणे, पुन्हा त्याची करुणा भाकणे, अशा अनेक भावावस्था त्यांच्या अभंगांतून आपल्याला दिसतात. एकनाथांनी प्रपंच आणि परमार्थ ह्यांचा समन्वय साधण्यावर भर दिला. वारकरी संप्रदायाने संकुचित सांप्रदायिकतेला थारा न देता सर्वसंग्राहक वृत्ती जोपासली. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत जे विठ्ठल, तेच एका महासमन्वयाचे प्रतीक आहे आणि संतांनी शैव, वैष्णव, बौद्ध, जैन इ. विविध धर्मधारांचा विठ्ठलाच्या ठायी संगम साधला आहे. असे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा नाथपंथीयांची होती, पण लोकांना सांगण्यासाठी त्यांनी नाथपंथाचे तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ निवडला नाही, तर गीतेची निवड केली. वारकरी संप्रदायाच्या प्रवक्त्यांमध्ये विचारांची आणि भावनेची श्रीमंती होती, त्याचप्रमाणे त्याग, निष्ठा, सहिष्णुता, औदार्य असे गुणही होते. ज्ञानेश्वरादी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकण्यात आले होते. तुकोबांचाही अनेक प्रकारे छळ झाला होता. पण त्यामुळे समाजापासून फटकून राहण्याची वृत्ती त्यांनी कधीही धारण केली नाही. ' तुका म्हणे तोचि संत। सोशी जगाचे आघात ' ही तुकारामांची उक्ती प्रसिद्ध आहे. तुकारामांच्या आधी होऊन गेलेल्या एकनाथांनीही सनातन्यांना न दुखावता त्यांच्या सद्भा वनेला हात घालण्याची धडपड केली. वारकरी संतांनी राजाश्रयाची आस कधीही धरली नाही. शिवाजी महाराजांचे आमंत्रण येताच ' दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यात न पडे ' आणि 'राजगृहा यावे मानाचिये आसे । तेथे काय वसे समाधान ? अशी प्रतिक्रिया तुकारामांनी अभंगां तून दिली. सामान्य माणूस हाच ह्या पंथाचा कायम आधार राहिला. लोकसंग्रह हे ह्या पंथाचे वैशिष्ट्य राहिले. प्रत्येक वारकरी आपापली कामे करूनच उदरनिर्वाह करीत असल्यामुळे भिक्षावृत्तीला ह्या पंथात थारा नाही. ह्या पंथाने तत्त्वचर्चेकडे पाठ फिरवली नाही आणि अंधश्रद्धेवरही आघात केले. अज्ञानावर आधारलेल्या उपासनेचा त्यांनी निषेध केला. वारकरी पंथाने देशी भाषेला जे महत्त्व दिले, ते महानुभाव पंथीयांनीही दिले होते. बौद्ध, जैन, लिंगायत ह्यांनीही देशी भाषेचा पुरस्कार केला होता. तथापि आपल्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वारकरी पंथीयांनी मराठी भाषेच्या जोडीला स्वतःचे असे एक तंत्र उपयोगात आणले. श्रोत्यांबद्दलचा आदरभाव त्यांनी कायम मनात बाळगला. ज्ञानेश्वरी हे गीतेवरील भाष्य असले, तरी तो एक श्रोतृसंवादही आहे. श्रोत्यांमुळे आपले वक्तृत्व फुलते, हीच भूमिका ज्ञानेश्वर घेऊन आहेत. ' प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती ' असे त्यांनी एके ठिकाणी श्रोत्यांना उद्देशून म्हटले आहे. अन्य वारकरी संतांनीही श्रोत्यांशी समरस होण्यात धन्यता मानली. त्यामुळे इतर पंथीयांच्या तुलनेत वारकरी संतसाहित्य लोकांपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचले. ज्ञानेश्वरीत अपपाठ शिरले होते, ह्याचाच एक अर्थ असा, की ज्ञानेश्वरी गावोगावी अनेकांपर्यंत पोहोचली होती. वारकरी पंथाची ही सारी वैशिष्ट्ये त्या पंथाला जे सर्व थरांतील संतांचे असमान्य आध्यात्मिक नेतृत्व वेळोवेळी लाभत गेले त्यातून निर्माण झाली. ह्या संप्रदायाच्या अलीकडच्या काळातील थोर सेवेकऱ्यांमध्ये नानामहाराज साखरे, शं. वा. दांडेकर ऊर्फ सोनोपंत दांडेकर, भाऊसाहेब काटकर, विष्णुबुवा जोग, केशवराव देशमुख, बंकटस्वामी, धुंडामहाराज देगलूरकर, बाबामहाराज सातारकर अशा अनेकांचा समावेश होतो. प्रवचने, कीर्तने, ग्रंथप्रकाशन अशा विविध मार्गांनी त्यांनी ह्या संप्रदायाची सेवा केली. नानामहाराजांनी सार्थ ज्ञानेश्वरी प्रसिद्ध केली, तर विष्णुबुवा जोगांनी तुकारामबोवांच्या अभंगांची सार्थ आवृत्ती काढली. विष्णुबुवांनी आळंदी येथे वारकरी शिक्षणसंस्थाही काढली (१९१७). संदर्भ : १. खरे, ग. ह. श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, आवृ. ३ री, पुणे, १९६३. २. ढेरे, रा. चिं. श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पुणे, १९८४. ३. दांडेकर, शं. वा. वारकरी संप्रदायाचा इतिहास, १९२७. ४. नेमाडे, भालचंद्र, ' वारकरी चळवळीची आविष्कारशैली ', टीकास्वयंवर, औरंगाबाद, १९९०. ५. पाठक, यशवंत, नाचू कीर्तनाचे रंगी, पुणे, १९८०. ६. सरदार, गं. बा. मराठी संतसाहित्याची सामाजिक फलश्रुती, आवृ. ४ थी, पुणे, १९५२. कुलकर्णी, अ. र.