आंबेडकरी चळवळीच्या व्यापकतेचा छोटेखानी दस्तावेज:
खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ
- गणेश सूर्यवंशी
भारतीय समाज व्यवस्थेच्या उतरंडीत पिचलेला सर्वहारा घटक आणि एकूणच सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक व राजकीयदृष्ट्या मागासलेल्या जनसमूहाच्या विकासाचा अजेंडा घेऊन त्यांच्या विकासासाठी बाबासाहेब हयातभर लढत राहिले. त्यासाठी विविध समित्यांवर काम करत असतांना त्यांनी अभावग्रस्तांचे प्रश्न समोर ठेवून लढा दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचे व एकंदरीतच आंबेडकरी चळवळीचे व्यापकत्व समजून घेण्यासाठी ही पुस्तिका पूरक आहे. बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेच्या पलीकडे रानावनात राहणाऱ्या आदिवासी जमातींच्या उत्थानासाठी आखलेल्या व्युव्हरचनेचा उलगडा या माध्यमातून वाचकाला होतो.लेखिका सुनीता सावरकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधक विद्यार्थी आहेत. शिवाय पुरोगामी चळवळीतही त्या सक्रिय आहेत. चळवळीच्या निमित्ताने त्यांनी अनेक ठिकाणी दिलेल्या भेटी व संशोधनवृत्तीतून संकलित केलेले संदर्भ ही त्यांच्या लेखनाची जमेची बाजू आहे.
जातीव्यवस्थेचे बळी ठरलेला मागास समूह, भटके विमुक्त आणि आदिवासी जनसमूहाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक, समता ,जनता ,बहिष्कृत भारत ही नियतकालिके चालवली. या माध्यमातून या समूहांच्या मागासलेल्या स्थितीवर व त्याच्या अभावग्रस्ततेच्या कारणांवर त्यांची लेखणी कडाडून प्रहार करत होती. या जनसमूहाच्या सर्वंकष विकासाच्या कार्यक्रमावरही त्यांनी वृत्तपत्रीय लेख व आपल्या ग्रंथामधून व भाषणांमधून वेळोवेळी प्रकाश टाकलेला आहे. या सर्व संदर्भ साधनांचा आधार घेत सुनीता सावरकर यांनी 'खान्देशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ' या छोटेखानी पुस्तिकेची निर्मिती केलेली आहे. बाबासाहेबांचा विषमता विरहित समाज निर्मितीचा विचार, सामाजिक पुनर्बांधणीचा लढा आणि एकूणच आंबेडकरी चळवळ ही कशी सर्वव्यापी आहे, याविषयीचे चिंतन करण्यास भाग पाडणारी ही पुस्तिका आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जनता’ साप्ताहिकातून आदिवासींच्या स्थितीवर लिहिलेले लेख व केलेले कार्य इथे केंद्रस्थानी आहेत. या लेखांमध्ये त्यांनी आदिवासी जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजना, आदिवासींना धान्य पुरवठा करणे,शेती कसणाऱ्या आदिवासी जनसमूहांना बियाणे मिळवून देणे , त्यांच्या उत्थानाकरिता फंड उभारणे इ. तसेच तत्सम कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे याबाबतचा तपशील इथे येतो. तसेच आंबेडकरी चळवळीची स्वातंत्र्य, समता,बंधुता, या तत्वांशी बांधिलकी आहे. चळवळीने समाजातील सर्वहारा घटकाच्या उत्थानासाठी सातत्याने भूमिका घेतलेली आहे. हा या पुस्तिकेचा गाभा आहे. याशिवाय चळवळ पुढे घेऊन जाण्यास दलित,अस्पृश्य घटकांसोबतच आदिवासींचेही योगदान तितकेच महत्वपूर्ण आहे, हा विचारही लेखिका मांडतांना दिसते. त्या म्हणतात की, 'आंबेडकरी चळ्वळीतील आदिवासींचे योगदान व चळवळीची भूमिका हा आंबेडकरी चळवळीचाच नव्हे, तर आदिवासींच्या इतिहास लेखनाचा एक महत्वाचा भाग आहे.'
याशिवाय त्यांनी या पुस्तिकेत महाराष्ट्रातील आदिवासी जमातींविषयीचा धावता आढावा घेत खान्देशातील आदिवासी भिल्ल समुदायाचा परिचय करून दिलेला आहे. त्यांच्या सामाजिक जीवनाचा परिचय व ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडत ब्रिटिशांविरोधात भिल्ल समुदायाने दिलेल्या लढ्याचा देखील त्यांनी याठिकाणी वेध घेतलेला आहे. सोबतच ब्रिटिश काळात सामाजिक व राजकीयदृष्टया पिचलेल्या जमातींना प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा स्तर उंचावण्यासाठी गठीत झालेल्या ओ एच बी स्टार्ट समितीच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेबाबतचा तपशील लेखिकेने दिलेला आहे. त्यासाठी लेखिकेने जनता , बहिष्कृत भारत ही नियतकालिके व चांगदेव खैरमोडे लिखित डॉ .भीमराव रामजी आंबेडकर चरित्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि ओ बी एच स्टार्ट कमिटी (अनिल शिनगारे), महाराष्ट्रातील आदिवासी (गोविंद गारे ), महाराष्ट्र राज्य गॅझेटीयर महाराष्ट्र :भूमी वलोक,(संपा.वि.का चौधरी ) इत्यादी संदर्भ साहित्याचा आधार घेत लेखन केलेले आहे.
खान्देश परिसरातील सातपुडा पर्वत रांगेत वास्तव्याला असलेली भिल्ल जमात, गडद तपकिरी वर्ण, गोल गरगरीत चेहरा , रुंद व मोठा जबडा, अंगापिंडाने मजबूत शरीरयष्टी या शरीर विशेषांसोबतच त्यांचे सांस्कृतिक वेगळेपणही सांगायला त्या विसरल्या नाहीत. ब्रिटिशकाळात त्यांच्यावर झालेले आरोप व तसेच सुधारणांबाबत झालेला विचारही याठिकाणी आलेला आहे. पेशवाईतील घटनांचाही आढावा पुस्तिकेत येतो.
भिल्ल समाजाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी भारत सेवक समाजाचे सभासद अमृतलाल ठक्कर यांनी भिल्ल सेवक समाज स्थापन केला. त्यासाठी त्यांनी मुंबईत फंड उभारून धान्य पुरवठा करण्याबाबत आखलेल्या योजनेची 'जनता' मुखपत्राने घेतलेली दखल आणि त्याकार्यास मदतीचे केलेले आवाहन येथे ससंदर्भ आलेले दिसते. त्यात स्पष्ट म्हटले की , 'धनिकांनी व ज्यांना माणुसकीविषयी प्रेमाचा उमाळा वाटत असेल अशा लोकांनी आपल्या शक्तीप्रमाणे या अशा पवित्र कार्याला हातभार लावणे अत्यावश्यक झाले आहे. ' भिल्लांच्या सामाजिक प्रश्नांची आंबेडकरी चळवळीस असलेली जाणीव व आदिवासी भिल्लांचा आंबेडकरी चळवळीतील सहभाग याबाबतचा उहापोह अनेक संदर्भांसह पुस्तिकेत आलेला आहे. जसे- दलित परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनातील भिल्ल समूहातील स्त्री -पुरुषांचा सक्रिय सहभाग, स्वतंत्र मजूर पक्षाला त्यांचा असलेला पाठींबा, आघाडी चले भीमराजा , पिछाडी दलितोकी फौजा ., यांसारख्या घोषणा , बाबासाहेबांच्या प्रेरणेने पुढे आलेले नेतृत्व , सभेत झालेले ठराव आदी गोष्टी तपशिलासह लेखिकेने मांडलेल्या दिसतात. आमदार दौलतराव जाधव, भाई पुनाजी लळींगकर , संपत सुरका पाटील, आदी व्यक्तींचे दिले आहेत. याशिवाय तळोदे जवळील ‘बहुरूपी’ गावातील राधीबाई, पोखीबाई,गुणाबाई,काशीबाई,नौकाबाई इत्यादी भिल्ल स्त्रियांनी एक-एक आणा वर्गणी जमा करून 'जनता' वृत्तपत्रास एक रुपया खास देणगी दिल्याचा संदर्भही इथे वाचावयास मिळतो.
तसेच खान्देशातील धनजी बिऱ्हाडे, गुणाजी मास्तर, मेढे गुरुजी यांचेही संदर्भ येतात. पुनाजी लळींगकरांसारख्या चळवळीतील कार्यकर्त्याबद्दल वाचकास माहिती व अण्णा नेतकरांनी 'भिल्ल समाजाची रास्त तक्रार' या शीर्षकाखाली दलित भारत मध्ये लिहिलेला लेख वाचकास पुढील संदर्भ चाळण्यास प्रवृत्त करतो. एकनानेक दाखले असलेली ही छोटेखानी पुस्तिका डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने मानवी मूल्ये जोपासण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या आंबेडकरी चळवळीस तिच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त अर्पण केलेली आहे. डॉ पुष्पा गायकवाड यांची प्रस्तावनेने या पुस्तिकेस आणखी मोल प्राप्त झाले. अभ्यासकांसाठी हा एक वैचारिक दस्तावेज ठरावा, यासाठी शुभेच्छा.
ग्रंथ परिचय : गणेश सूर्यवंशी ,जळगाव
पुस्तकाचे नाव : खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ
लेखिका :सुनीता सावरकर
प्रकाशक :लोकवाङ्मय गृह
पृष्ठ संख्या :३५
किंमत : ३० रुपये
येणाऱ्या अनेक पिढ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणा देत राहतील.खूप अभ्यासपूर्ण परिचय. असेच नवनवीन लेख आम्हाला वाचायला मिळू दे.
ReplyDeleteछान लेख आहे सरजी
ReplyDelete