वर्तमानातील दलित लेखिका
डॉ.बाबासाहेब
आंबेडकराच्या मानवमुक्ती संग्रामानंतरच खर्या अर्थाने दलित स्त्री-बोलती व लिहिती
झाली. हीच मानवमुक्ती चळवळ खर्या अर्थाने दलित स्त्रियांची उध्दारक ठरली!
त्यामुळे पांढरपेशा स्त्री-मुक्ती चळवळीचा व दलित स्त्रियांच्या अस्तित्वाच्या
लढाईचा कालखंड तसा दुरान्वयानेही एक होऊ शकत नाही. स्त्री-मुक्ती चळवळीवाले
सिमॉनच्या विचार प्रणालीला नेहमीच अधोरेखित करतात की, स्त्री जन्माला येत नाही, ती
घडविली जाते. समाजमान्य बाईपणाच्या अंगाने सिमॉनचा विचार निश्चितच व्यापक आहे,
परंतु भारतातल्या दलित स्त्रीचा विचार अस्पृश्यतेच्या, जातीयतेच्या अनुषंगानेच
करावा लागतो. मुळात स्त्री आणि त्यातही दलित स्त्री असल्यावर तिच्या जगण्यातलं
दुहेरी दु:ख पडताळून पाहताना दलित साहित्यात दलित स्त्रीने केलेलं लिखाण हे अनेक
अंगाने निश्चितच तपासून पाहण्यासारखे आहे. दलित साहित्यात सुरूवातीच्या कालखंडात
कथा, कविता आत्मकथांनी जो काही प्रखर विद्रोह नोेंदविला तो इथल्या सामाजिक-
सांस्कृतिक बुरूजांना हादरवूनच टाकणारा होता. दलित पुरूषांनी तर वेशीबाहेरील सारंच
उघडं-नागडं आयुष्य बेधडकपणे मांडायला सुरूवात केली होती. एक प्रकारचा हजारो
वर्षांच्या विद्रोहाचा तो स्फोटही होता व पुरूषी बेदरकारपणाही त्या जोडीला होता.
या सार्या झंझावातात दलित स्त्रीलाही आपल्या आंतरिक वेदना मंाडाव्याशा वाटल्या
नसत्या तर नवलच! पण या नव्याने लेखणीचं शस्त्र हाती घेऊन दलित साहित्याच्या चळवळीत
उतरलेल्या दलित लेखिकंाना सुरूवातीला दडपण येणे स्वाभाविकच होते. पण या दडपणाची
फारशी तमा न बाळगता त्याही लिहित्या झाल्या आणि दलित स्त्री जाणिवेच्या अंत:स्थ
अनेक वेदना कथा-कविता आत्मकथांमधून अभिव्यक्त होऊ लागल्या. ‘आत्मकथन’ हा वाङ्मय
प्रकार दलित लेखिकंानी मोठ्याा ताकदीने हाताळला. एकीकडे मराठी साहित्यात व जागतिक
पातळीवर दलित पुरूषांच्या आत्मकथनांनी प्रचंड वेगळेपण साहित्यात आणलं होतं. त्याच
जोडीला आपली वेगळी स्त्रीसुलभ सौम्य विद्रोहाची भाषा घेऊन बेबी कांबळे यांचं ‘जिणं
आमुचं’, शांताबाई कांबळे याचं ‘माज्या जल्माची चित्तरकथा’, मुक्ता सर्वगोड यांच
‘मिटलेली कवाडे’, शांताबाई दाणी यांच ‘रात्रंदिन आम्हा’, उर्मिला पवार यांच
‘आयदान’ व यशोधरा गायकवाड याच ‘माझी मी’ ही आत्मकथने येऊन धडकली. या आत्मकथनाचा
कालखंड १९८७ ते २००७ असा व्यापक आहे. परंतु या स्त्रियांच्या आठवणींचा सारा कालखंड
मात्र एकच आहे. जो अस्पृश्यतेसंदर्भातल्या अनुभवांना घेऊन आलेला आहे. डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरूवातीच्या मानवमुक्ती संग्रामातल्या उलथा-पालथीने
व्यापलेला, दारिद्रय- भ्ाुकेचा, उच्चवर्णीयांच्या माजोरडया उन्मादाचा व या सार्यात
माणूसपण संपूर्णत: गमावलेल्या एका मोठ्या समूहाचा माणूसपणाच्या दिशेने होत गेलेला
प्रवास, दलित स्त्रियांनी मोठ्या बारकाईने नोंदविला आहे. यात उर्मिला पवार यंाच्या
‘आयदान’ या आत्मकथेने खर्या अर्थाने दलित स्त्री जाणिवेच्या कक्षा आता विस्ताराने
रूंदावत आहे, हे खूप स्पष्टपणे अधोरेखित केले. दलित कवितेतून खर्या अर्थाने दलित
कवियत्रींना आपली लय सापडलेली दिसते. सुरूवातीच्या काळात ज्योती लांजेवार, हिरा
बनसोडे, सुरेखा भगत, मीना गजभिये, आशा थोरात यासारख्या अनेक कवयत्रिंनी आपल्या
प्रखर जाणिवा नोंदविल्या आणि त्यानंतर जागतिकीकरणांच्या सार्या पडझडींसोबत, व
देशांतर्गतल्या बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर भगव्या दहशतीचा नवा चेहरा बघत दलित
स्त्री कवीयत्री अधिक व्यापक व विस्तारत गेली. या नव्या घडामोडींचं समाजकारण व
राजकारण उमगलेल्या कवयत्रीत सर्वप्रथम प्रज्ञा पवार यांचा अवर्जून उल्लेख करावा
लागेल. ‘अंत:स्थ’, ‘मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा’ मधल्या कविता असतील किंवा
त्यांच्या अनेक वेगवेगळ्याा कवितांमधून सतत बदलत्या भोवतालवर करडी नजर ठेवू
पाहणारी ही कवीयत्री खूप जबाबदारीने अभिव्यक्त होत गेली. त्याचबरोबर प्रतिभा अहिरे
यांच्या ‘मला हवी असलेली पहाट’ मधल्या कविता असतील, ज्या नव्वदनंतरच्या बदलत्या
स्त्रीजाणिवंाना नव्या अंाबेडकरी विचारांच्या निकषावर सतत पडताळून पाहत होत्या.
नव्या स्त्रीवादाची स्वत:ची परिभाषा मांडू पाहणारी प्रतिभा अहिरे म्हणूनही
महत्वाचीच! संध्या रंगारी या कवियत्रीचं ‘संध्यारंग’ हा कवितासंग्रहही दलित
स्त्रियांच्या मुक्तीसंदर्भात नव्या भ्ाूमिका घेऊन आलेला दिसतो. निसर्ग, त्यातली
स्त्री-सुलभता व तिच्यातली स्वअस्तित्वाची जाणीव आपल्या अलवार लयीसोबत सौम्य
भाषेतला तीव्र विद्रोह मोठ्या खुबीने नोंदवित जाते. दलित स्त्रियांनी कवितेला खर्या
अर्थांने एखादी माहेरवाशीण घरी आल्याप्रमाणे खूप प्रेमाने जपलं, हे निर्विवादपणे
मान्यच करावे लागेल. दलित कथेच्या संदर्भात पुन्हा ऊर्मिला पवार यांच्या ‘सहावं
बोट’ या कथासंग्रहाचा उल्लेख करणे गरजेचे आहे. तर दलित लेखिकांनी नाटक हा
साहित्यप्रकार फार प्रमाणात हाताळला नसला तरी प्रज्ञा पवार यांच्या ‘धादांत
खैरलांजी’ या नाटकाचा उल्लेख याठिकाणी महत्वाचा आहे. ‘वैचारिक’ वाङ्मयाच्या
संदर्भात खूप कमी व सातत्य नसलेलं लिखाण होत गेलं असलं तरी प्रा. कुमुद पावडे,
प्रा. सुशील मूल जाधव, प्रा. अरूणा लोखंडे, प्रा. अभिनया कांबळे इ.नी महत्वाचं
लिखाण केलं आहे व करत आहेत. परंतु चळवळीच्या अंगाने एक अत्यंत महत्वाचं काम
उर्मिला पवार व मीनाक्षी मून यांनी करून ठेवलंय, ते म्हणजे ‘आम्हीही इतिहास घडवला’
हे पुस्तक. आंबेडकरी चळवळीत सहभागी झालेल्या स्त्रियांचा सहभाग व त्यांच्या
कार्याची योग्य ती घेतलेली दखल या पुस्तकात घेतली गेली. ही खरोखरच येणार्या
पिढ्याांसाठी खूप महत्त्वपूर्ण अशीच बाब आहे. हा एक दलित स्त्री चळवळीचा महत्वाचा
दस्ताऐवजही आहे. आज दलित स्त्रियांना आपल्या अस्तित्वाची जाणीव व्यक्त करण्यासाठी
घसा फोडून ओरडण्याची तशी गरज उरलेली नाही. मोजकं आणि नेटाने लिहिणार्या लिहित्या
लेखिका जागतिकीकरण या शब्दाला पदराखाली घेऊन पाजण्याइतपत छोटं व रांगतं बाळ समजू
लागल्या आहेत. स्त्रीत्वातलं मातृत्व व भोवतालचा फुगवटा जेव्हा कुठल्याही
चळवळीतल्या स्त्रीला समजू लागतो, तेव्हा तिच्यातली ही मातृत्वाच्या रूपातली
स्त्री- ऊर्जा इथल्या अनेक सनातनी प्रश्नांना वेगळ्याा अंगाने समजावून घेऊ पाहत
असते, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. याबाबत दलित स्त्री लेखिकेची या नव्या
प्रश्नांना समजून घेण्याची व्यापकता निश्चितच मोठी आहे. अर्थात त्यात फक्त अडचणी
येत जातात त्या वाड्:मयातले विविध वाड्:मयीन प्रकार हाताळण्या संदर्भात! उदा. दलित
लेखिकांनी सशक्त कादंबरी, ऐतिहासिक-सामाजिक गंभीर लिखाण, प्रवास वर्णने यासारख्या
बाबींच्या संदर्भातही येणार्या काळात लिखाण करणे गरजेचे आहे, असे वाटते. दलित
साहित्य हे चळवळीचं एक माध्यम असल्यामुळे सतत समष्टीचा विचार त्यातून जेवढा
जोरकसपणे पुढे येत जातो, तेवढेचं दलित स्त्रियांनी आपल्या अंत:स्थाचे कवडसे मोकळे
करणेही खूप गरजेचे आहे. संकोच, भीड या गोंष्टीपासून दूर जात बदलत्या भोवतालाचे
निर्लेप अनुभव त्यांनी थेटपणे मांडण्याची गरज आहे. आता धर्मांतरानंतरची तिसरी पिढी
स्थिरावली व चौथी पिढी या मोकळ्याा टेक्नोसॅवी जगात श्वास घेत आहे. दलित
जाणिवेच्या कक्षा आता जागतिक मानवतेच्या दाराशी येऊन उभ्या ठाकल्या आहेत. बेचिराख
होणार्या इराककडे व तिबेटीयन्सकडे करूणेने बघताना या पृथ्वीतलावरचा प्रत्येक सजीव
माणूस-प्राणी मोकळेपणाने जगला पाहिजे, जगवला गेला पाहिजे ही वैश्विक जाण दलित
स्त्रीलेखिक ांमध्ये जागृत झालेली आहे. येणार्या काळात देशार्ंतगत व भोवतालावर
करडी नजर ठेवत एका हातात लॅपटॉप व दुसर्या हातात भारतीय संविधानाचा मूलमंत्र जपत
या देशाच्या सार्वभौमत्वावर विश्वास ठेवणारी सशक्त दलित स्त्री लेखिका तयार होत
आहे. नव्या विद्रोहाची गाज नव्या अभिव्यक्तीसह प्रकटण्याची सुचिन्हे अनेक नव्याने
विचार करणार्या दलित स्त्रियांच्या विचारांमधून पुढे येत आहेत. यापुढे
साहित्यातलं योग्य माध्यम व साहित्यप्रकार निवडून दलित लेखिकांनी सातत्याने लिहितं
होण्याची गरज आहे. दलित स्त्री लेखिकांचा येणारा काळ अनेकानेक शक्यतांचा आहे, हे
निश्चितच!
No comments:
Post a Comment