Wednesday, 13 February 2013

उर्मिला पवार


आईकडून मिळाला 'आयदाना'चा वसा

उर्मिला पवारांच्या कथा आपल्याला माहीत आहेत. मराठीतल्या लिहित्या स्त्रियांमधलं हे एक उजळ नाव. पण उर्मिलाबाईंचं वळण वेगळं. मुख्य म्हणजे त्या मध्यमवर्गीय नाहीत. जन्माने आणि पुढे कर्मानेही. शहरात आल्यावर
 , लग्न झाल्यावर त्या अधिक शिकल्या आणि नोकरीबिकरी करू लागल्या तरी ते सुखवस्तू वा आपल्याच कोषात गुरफटून पडणारं मध्यमवर्गीयपण त्यांना चिकटलं नाही. याची साक्ष त्यांच्या कथाच देतात. काल परवा गहजब उडवून गेलेली त्यांची ' चोळीतले आंबे ' हीच कथा उदाहरणादाखल पाहा. बाईंनी उगाचच सेन्सेशन कधीही निर्माण केलं नाही. त्या ज्या बायकांबद्दल लिहीत होत्या , त्यांचं नेहमीचं जगणं हेच पांढरपेशा वर्गासाठी सेन्सेशन होतं. पण उर्मिलाबाईंसाठी त्यामागचा वेदनेचा पीळ महत्त्वाचा होता. मुलगा होईल का या तणावाखाली, इस्पितळात दाखल झालेल्या बाईने दुसऱ्या बाळंतिणीचं मूल पळवण्याचा आखलेला प्लॅन आणि त्यानंतरची तिची घुसमट एवढ्याशा घटनेला उर्मिला पवारांनी सामाजिक संदर्भचौकट देऊन कशी कलात्मक उंची दिली , हे ती कथा वाचूनच पडताळून घ्यावं. 

तर आता हे उर्मिलापुराण लावायचं कारण एवढंच की
 , या लेखिकेचं आत्मचरित्र येत्या आठवड्यात प्रसिद्ध होतंय. पाच डिसेंबरला ' ग्रंथाली ' आठ पुस्तकं एकदम प्रकाशित करतेय. त्यातलं उर्मिला पवारांचं ' आयदान ' हे आत्मकथन हे एक प्रमुख पुस्तक आहे. ' ग्रंथाली ' च्या पुस्तक प्रकाशनाच्या वाटचालीत त्याला आगळं महत्त्व आहे ते यासाठी की ज्या पुस्तकाने दलित आत्मकथनाचा प्रवाह मराठी साहित्यात रुजवला , त्या दया पवारांच्या ' बलुतं ' ला पंचवीस वर्षं होताहेत. दया पवार ते उर्मिला पवार असा दलित जीवनजाणिवांचा एक विस्तृत पट यानिमित्ताने पाहता येणार आहे. 

'
 आयदान ' म्हणजे सुपं , रोवळ्या विणणं. उर्मिला पवारांची आई सुपं , रोवळ्या बनवायची. उर्मिलाबाई म्हणतात , हे आयदान आईकडून माझ्याकडे आलं. माझी आई विणत होती ती वीण माझ्या लेखणीत आली. 

कथा-कादंबरी लिहिणारी माणसं सहसा चटकन आत्मचरित्राच्या वाटेला जात नाहीत. (कारण ते जे फिक्शन लिहितात
 , त्याचा कच्चा माल हा त्यांच्या जगण्यातल्या फॅक्टशीच तर निगडित असतो.) मग ' आयदान ' ची सुरुवात कुठून झाली ? उर्मिला पवार म्हणतात त्यानुसार सुमारे चौदाएक वर्षांपूर्वी त्यांनी ' अबब! हत्ती ' नावाच्या छोट्यांच्या दिवाळी अंकात एक भाग लिहिला होता. त्यात रत्नागिरीतलं आपलं बालपण , तिथल्या भारीवाल्या बायकांची परवड , झाडू कामगार असं काय काय होतं , तेही त्या बोलभाषेत. ते छापून आल्यावर बाईंना आणखीन लिहावसं वाटलं. 'चौथी भिंत ' या पुस्तकात 89 साली ' गोष्ट शैशवाची ' लिहिली. आधीच जात खालची , त्यात अठराविश्वे दारिद्य , सगळ्याचीच वानवा , वडील शिक्षक होते. पण लहानपणीच ते वारल्यामुळे आईला आयदान करीत चरितार्थ चालवावा लागलेला... 

हे सगळं लिहिल्यावर खंड पडला. काही वर्षं जावी लागली आणि मग बाईंनी पुन्हा लेखणी उचलली. कारण संघर्ष काही बालपणीचाच नव्हता
 , तो तर पाचवीला पुजल्याप्रमाणे आयुष्यभर साथीला होता. बाई रत्नागिरीच्या पण सासर कणकवलीचं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. तिथलं जगणं आलं. त्यातले कौटुंबिक ताण आले. उर्मिला पवारांचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालं होतं. लग्नानंतर त्या जिद्दीने पुढे शिकल्या. एम. ए. झाल्या. त्यांनी आंबेडकरी चळवळीत भाग घेतला , संघटना बांधल्या. व्यक्तिगत आयुष्यातही अनेक अडचणी येत होत्या. त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाचा अत्यंत नाट्यपूर्ण प्रसंग या पुस्तकात आहे. त्यावेळी बाईंनी दाखवलेली निर्णयक्षमता त्यांच्यातल्या वेगळ्याच पैलूवर प्रकाश पाडते. मुलींशी निर्माण झालेला विसंवाद आणि अंतिमत: मुलींना आपली आई हीच खरी आपली मैत्रीण आहे , ही झालेली जाणीव हे सगळं अतिशय ओघवत्या शैलीत कागदावर उतरलं. 

आयदानाचा वसा आईकडून उर्मिलाबाईंकडे आला. आईचा जीवनसंघर्ष बाईंच्याही वाट्याला वेगळ्या पद्धतीने आला. पण बाई म्हणतात
 , ' या आयदानाला आई आणि माझ्यात समान असा एक दु:खाचाही पदर आहे. माझा मोठा भाऊ वारल्यावर आईला मोठा धक्का बसला आणि मग तिने आपलं सगळं लक्ष आयदानात घातलं. माझ्याही बाबतीत तसंच घडलं. मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेला माझा मुलगा अचानक गेला. मी हादरून गेले. पण त्यावेळी स्वत:ला सावरण्यासाठी मी लिहीत राहिले. मी काय लिहिते आहे हे माझं मलाही कळत नव्हतं , पण मनाला बांधून ठेवायला काहीतरी हवं होतं. ही वेदनेची वीणही आहे. आईजवळ येऊन थांबलेले क्षण माझ्यापाशी आले आहेत असं मला वाटलं. ' 

उर्मिलाबाईंचं जगणं म्हणजे एक सामाजिक दस्तऐवज आहे.
 ' ग्रंथाली ' चे दिनकर गांगल म्हणतात , ' कोकणातल्या दलित स्त्रीचं जगणं यात दिसतं. पण आंबेडकरांचं धर्मांतर पोचण्यापूर्वी ही दलित जाणीव तिथे नव्हती. कोकणातल्या कुठल्याही गरीब बायकांसारखंच त्यांचं जगणं होतं. पण नंतर आपल्या दलितत्वाची झालेली जाणीव आणि त्याच्याही पुढे आयुष्याला सामोरं जाताना आपल्या स्त्रीत्वाची झालेली जाणीव अत्यंत प्रगल्भपणे , थेट आणि अतिशय छान शब्दांत या पुस्तकात व्यक्त झाली आहे. ' 

-
 जयंत पवार

No comments:

Post a Comment